यिर्मया ३४:१-२२

  • सिद्‌कीयाला न्यायाचा संदेश (१-७)

  • दासांना मुक्‍त करण्याचा करार मोडला जातो (८-२२)

३४  यिर्मयाला यहोवाकडून एक संदेश मिळाला. त्या वेळी बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर आणि त्याचं संपूर्ण सैन्य आणि त्याच्या अधिकाराखाली असलेली पृथ्वीवरची सगळी राज्यं, तसंच सगळी राष्ट्रं यरुशलेम नगरीविरुद्ध आणि तिच्या सगळ्या शहरांविरुद्ध लढत होती.+ यिर्मयाला मिळालेला संदेश असा: २  “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘जा आणि यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याला सांग: “यहोवा असं म्हणतो, ‘पाहा, मी हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती देतोय, आणि तो ते जाळून टाकेल.+ ३  तू त्याच्या हातून निसटणार नाहीस. कारण तुला पकडलं जाईल आणि त्याच्या हवाली केलं जाईल.+ तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील आणि तो प्रत्यक्ष तुझ्याशी बोलेल. तू बाबेलला जाशील.’+ ४  पण हे यहूदाच्या राजा सिद्‌कीया, यहोवा आणखी काय म्हणतो तेही ऐक. ‘तुझ्याविषयी यहोवा असं म्हणतो: “तू तलवारीने मरणार नाहीस. ५  तर तू शांतीने मरशील.+ आणि लोकांनी तुझ्या वाडवडिलांसाठी, म्हणजे तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी जसे सुगंधी मसाले जाळले, तसे ते तुझ्यासाठीही जाळतील. आणि ते तुझ्यासाठी शोक करत असं म्हणतील, ‘अरेरे! आमचे महाराज गेले!’ कारण यहोवा म्हणतो, ‘हे मी बोललोय.’”’”’” ६  मग यिर्मया संदेष्ट्याने या सगळ्या गोष्टी यहूदाच्या राजाला, सिद्‌कीयाला यरुशलेममध्ये सांगितल्या. ७  त्या वेळी, बाबेलच्या राजाचं सैन्य यरुशलेमविरुद्ध आणि यहूदाच्या उरलेल्या शहरांविरुद्ध, म्हणजे लाखीश+ आणि अजेका+ यांच्याविरुद्ध लढत होतं;+ कारण यहूदाच्या शहरांपैकी तटबंदी असलेली ही दोनच शहरं उरली होती. ८  यिर्मयाला यहोवाकडून आणखी एक संदेश मिळाला; त्याला हा संदेश सिद्‌कीया राजाने यरुशलेममधल्या लोकांसोबत गुलामांना मुक्‍त करण्याचा करार केल्यानंतर मिळाला.+ ९  या करारानुसार कोणीही आपल्या यहुदी सोबत्याला गुलाम म्हणून ठेवायचं नव्हतं; प्रत्येकाने आपल्या इब्री दास-दासींना मुक्‍त करायचं होतं. १०  तेव्हा सर्व अधिकाऱ्‍यांनी आणि लोकांनी या आज्ञेचं पालन केलं. त्यांनी हा करार मान्य केला, की प्रत्येक जण आपल्या दास-दासींना मुक्‍त करेल, आणि त्यांना यापुढे गुलाम म्हणून ठेवणार नाही. त्यांनी तसंच केलं आणि गुलामांना सोडून दिलं. ११  पण नंतर, ज्या दास-दासींना त्यांनी सोडून दिलं होतं, त्यांना त्यांनी परत आणलं आणि त्यांना पुन्हा गुलामी करायला लावली. १२  यामुळे यिर्मयाला यहोवाकडून हा संदेश मिळाला. यहोवा म्हणाला: १३  “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना गुलामगिरीच्या देशातून,* इजिप्तमधून बाहेर आणलं,+ त्या दिवशी मी त्यांच्यासोबत एक करार केला होता.+ मी म्हणालो होतो: १४  “तुमच्यापैकी प्रत्येकाने, तुम्हाला विकण्यात आलेल्या आणि सहा वर्षं तुमची सेवा केलेल्या तुमच्या इब्री बांधवाला सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्‍त करावं; तुम्ही त्याला मुक्‍त केलंच पाहिजे.”+ पण तुमच्या पूर्वजांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. १५  पण तुम्ही आज आपले मार्ग बदलले आणि माझ्या नजरेत जे योग्य ते केलं. तुम्ही तुमच्या सोबत्यांना मुक्‍त केलं आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिरात माझ्यासमोर एक करार केला. १६  पण नंतर, ज्या दास-दासींना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे मुक्‍त केलं होतं, त्यांना परत आणून आणि गुलामी करायला लावून तुम्ही पुन्हा आपल्या मार्गांपासून मागे वळलात आणि माझं नाव अपवित्र केलं.’+ १७  त्यामुळे यहोवा म्हणतो: ‘गुलामांना मुक्‍त करायची माझी आज्ञा तुम्ही पाळली नाही; तुम्ही आपल्या भावाला आणि सोबत्याला सोडून दिलं नाही.+ म्हणून आता मी तुम्हाला सोडून देईन,’ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुम्हाला तलवारीने, रोगराईने आणि दुष्काळाने मरण्यासाठी सोडून देईन.+ मी तुमची अशी अवस्था करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ १८  तसंच, ज्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले आणि त्या तुकड्यांमधून चालत जाऊन माझ्यासमोर करार केला;+ पण त्या करारातल्या अटी पाळल्या नाहीत आणि माझ्यासोबत केलेला करार मोडला, त्यांच्या बाबतीत १९  म्हणजे, यहूदाचे अधिकारी, यरुशलेममधले अधिकारी, राजदरबारी, याजक आणि देशातले सगळे लोक जे वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत गेले, त्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडेल: २०  मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन. त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांसाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्‍न होईल.+ २१  आणि मी यहूदाचा राजा सिद्‌कीया याला आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांना त्यांच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन.+ बाबलेच्या राजाचं जे सैन्य मागे निघून चाललंय त्यांच्या हवाली मी त्यांना करीन.’+ २२  यहोवा म्हणतो, ‘पाहा, मी आदेश देईन, आणि त्यांना परत या शहराकडे घेऊन येईन. ते या शहराविरुद्ध लढतील, त्यावर कब्जा मिळवतील आणि शहर जाळून टाकतील.+ आणि यहूदाच्या शहरांना मी ओसाड करून टाकीन; तिथे एकही माणूस राहणार नाही.’”+

तळटीपा

शब्दशः “घरातून.”