यिर्मया ३५:१-१९

  • आज्ञा पाळण्याच्या बाबतीत रेखाबी लोकांचं चांगलं उदाहरण (१-१९)

३५  यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळात यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “रेखाबी लोकांच्या+ घराण्याकडे जा, आणि त्यांच्याशी बोलून त्यांना यहोवाच्या मंदिरातल्या एका जेवणाच्या खोलीत ने आणि द्राक्षारस प्यायला दे.” ३  तेव्हा मी हबसिन्याच्या नातवाला, म्हणजे यिर्मयाचा मुलगा याजन्या याला, त्याच्या भावांना, त्याच्या सगळ्या मुलांना आणि रेखाबी लोकांच्या संपूर्ण घराण्याला ४  यहोवाच्या मंदिरात घेऊन गेलो. मी त्यांना इग्दल्याहचा मुलगा, म्हणजे खऱ्‍या देवाचा माणूस हानान याच्या मुलांच्या जेवणाच्या खोलीत घेऊन गेलो. ही खोली, द्वारपाल शल्लूम याचा मुलगा मासेया याच्या जेवणाच्या खोलीच्या वर असलेल्या अधिकाऱ्‍यांच्या जेवणाच्या खोलीला लागून होती. ५  मग, मी रेखाबी लोकांच्या घराण्यातल्या माणसांसमोर द्राक्षारसाने भरलेले प्याले आणि कटोरे ठेवले आणि त्यांना म्हणालो: “द्राक्षारस प्या.” ६  पण ते म्हणाले: “आम्ही द्राक्षारस पिणार नाही. कारण आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा यहोनादाब,*+ याने आम्हाला अशी आज्ञा दिली आहे, की ‘तुम्ही आणि तुमच्या मुलांनी कधीच द्राक्षारस पिऊ नये. ७  तुम्ही स्वतःसाठी घरंदारं बांधू नये, बी पेरू नये, द्राक्षमळे लावू नयेत किंवा ते विकत घेऊ नयेत. याउलट, तुम्ही नेहमी तंबूंमध्ये राहावं, म्हणजे ज्या देशात तुम्ही विदेशी म्हणून राहताय तिथे तुम्ही बरीच वर्षं जिवंत राहाल.’ ८  म्हणून आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा यहोनादाब याने आम्हाला जे काही सांगितलं, ते आम्ही आजपर्यंत पाळत आलोय. आम्ही, आमच्या बायका, आमची मुलं किंवा आमच्या मुली कोणीही द्राक्षारस पीत नाही. ९  तसंच, आम्ही स्वतःसाठी घरंदारं बांधत नाही, आणि आमच्याकडे द्राक्षमळे, शेतीवाडी, बियाणं वगैरे काहीच नाही. १०  आम्ही तंबूंमध्येच राहतो आणि आमचा पूर्वज यहोनादाब* याने आम्हाला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या सगळ्या आम्ही पाळतो. ११  पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर देशावर हल्ला करायला आला,+ तेव्हा आम्ही म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला जाऊ, म्हणजे आपण खास्दी लोकांच्या आणि सीरियाच्या सैन्यापासून वाचू शकू. आणि म्हणून आता आम्ही यरुशलेममध्ये राहतोय.’” १२  मग, यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १३  “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘जा आणि यहूदाच्या लोकांना आणि यरुशलेमच्या रहिवाशांना असं सांग: यहोवा म्हणतो, “माझ्या आज्ञा पाळा असं मी तुम्हाला वारंवार आर्जवलं नाही का?+ १४  रेखाबचा मुलगा यहोनादाब याने त्याच्या वंशजांना ‘द्राक्षारस पिऊ नका’ अशी आज्ञा दिली होती. त्याप्रमाणे आजपर्यंत ते द्राक्षारस प्यायले नाहीत. अशा प्रकारे ते आपल्या पूर्वजाने दिलेली आज्ञा पाळत आहेत.+ मी तर वारंवार तुमच्याशी बोलत राहिलो, पण तुम्ही माझं ऐकलं नाही.+ १५  मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो+ आणि सांगत राहिलो, ‘कृपा करून आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळा+ आणि चांगलं ते करा! इतर दैवतांच्या नादी लागू नका आणि त्यांची सेवा करू नका. म्हणजे जो देश मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलाय, त्यात तुम्ही कायम राहाल.’+ पण, तुम्ही माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. १६  रेखाबचा मुलगा यहोनादाब याच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजाने दिलेली आज्ञा पाळली.+ पण, या लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.”’” १७  “म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! मी यहूदाला आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांना ज्या संकटाबद्दल इशारा दिला होता, ते संकट मी त्यांच्यावर आणतोय.+ कारण मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मी त्यांना हाक मारत राहिलो, पण त्यांनी उत्तर दिलं नाही.’”+ १८  मग यिर्मया रेखाबी लोकांच्या घराण्याला म्हणाला: “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तुम्ही तुमचा पूर्वज यहोनादाब याची आज्ञा पाळली. त्याने तुम्हाला जे काही सांगितलं होतं त्याचं तुम्ही काटेकोरपणे पालन करत आहात, १९  म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्यासमोर सेवा करायला रेखाबचा मुलगा यहोनादाब* याच्या वंशजांपैकी एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.”’”

तळटीपा

शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.