यिर्मया ३६:१-३२

  • यिर्मया बारूखकडून गुंडाळी लिहून घेतो (१-७)

  • बारूख गुंडाळी मोठ्याने वाचतो (८-१९)

  • यहोयाकीम गुंडाळी जाळून टाकतो (२०-२६)

  • नवीन गुंडाळीवर संदेश पुन्हा लिहिला जातो (२७-३२)

३६  यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “एक गुंडाळी घे. आणि योशीयाच्या शासनकाळात मी पहिल्यांदा तुझ्याशी बोललो+ त्या दिवसापासून आजपर्यंत मी इस्राएलविरुद्ध, यहूदाविरुद्ध+ आणि सर्व राष्ट्रांविरुद्ध ज्या गोष्टी बोललो, त्या सगळ्या त्या गुंडाळीवर लिही.+ ३  मी यहूदाच्या घराण्यावर जी सर्व संकटं आणण्याचा विचार केलाय, त्यांबद्दल ऐकून कदाचित ते आपल्या दुष्ट मार्गांपासून वळतील. आणि मी त्यांच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करीन.”+ ४  तेव्हा, यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख+ याला बोलावून घेतलं. आणि यहोवाने यिर्मयाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी यिर्मयाने बारूखला सांगितल्या; यिर्मया जसं-जसं बारूखला सांगत गेला, तसं-तसं बारूख गुंडाळीवर लिहीत गेला.+ ५  मग यिर्मया बारूखला म्हणाला: “मी इथे कैदेत आहे. त्यामुळे मी यहोवाच्या मंदिरात जाऊ शकत नाही. ६  म्हणून तू जा, आणि यहोवाचा जो संदेश मी तुला सांगितलाय, आणि जो तू या गुंडाळीवर लिहिलाय तो तिथे मोठ्याने वाच. तो संदेश तू उपासाच्या दिवशी यहोवाच्या मंदिरात सर्व लोकांसमोर आणि यहूदाच्या इतर शहरांतून येणाऱ्‍या सर्व लोकांसमोर मोठ्याने वाच. ७  कदाचित ते यहोवाकडे दयेची भीक मागतील आणि त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गांपासून वळेल. कारण, यहोवा या लोकांवर आपल्या रागाचा आणि क्रोधाचा वर्षाव करण्याविषयी बोललाय, आणि तो क्रोध खूप भयंकर असेल.” ८  तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाचा मुलगा बारूख याने केलं. तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि गुंडाळीवर लिहिलेला यहोवाचा संदेश त्याने मोठ्याने वाचला.+ ९  यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात, यरुशलेममधल्या सगळ्या लोकांनी आणि यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सगळ्या लोकांनी यहोवासाठी उपास केला.+ १०  तेव्हा, बारूखने गुंडाळीत लिहिलेला यिर्मयाचा संदेश यहोवाच्या मंदिरात, शाफान+ शास्त्र्याचा* मुलगा गमरयाह+ याच्या खोलीत* सर्व लोकांसमोर मोठ्याने वाचून दाखवला. ही खोली, यहोवाच्या मंदिराच्या नवीन दरवाजाकडे असलेल्या वरच्या अंगणात होती.+ ११  शाफानचा नातू, म्हणजे गमरयाहचा मुलगा मीखाया याने जेव्हा गुंडाळीत लिहिलेला यहोवाचा संदेश ऐकला, १२  तेव्हा तो लगेच राजमहालातल्या सचिवाच्या खोलीत गेला. तिथे हे सगळे राजदरबारी बसले होते: सचिव अलीशामा,+ शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा+ मुलगा एलनाथान,+ शाफानचा मुलगा गमरयाह, हनन्याचा मुलगा सिद्‌कीया आणि इतर सर्व राजदरबारी. १३  गुंडाळीतला जो संदेश बारूखने लोकांसमोर वाचला होता आणि जो मीखायाने ऐकला होता, तो मीखायाने सगळ्या राजदरबाऱ्‍यांना सांगितला. १४  तेव्हा सर्व राजदरबाऱ्‍यांनी नथन्याचा मुलगा यहूदी याला बारूखकडे पाठवलं; यहूदी हा शलेम्याहचा नातू आणि कूशीचा पणतू होता. त्यांनी त्याच्या हातून बारूखला असा निरोप पाठवला: “जी गुंडाळी तू लोकांसमोर वाचून दाखवलीस ती घेऊन इकडे ये.” मग, नेरीयाचा मुलगा बारूख याने ती गुंडाळी आपल्या हातात घेतली आणि तो त्यांच्याकडे गेला. १५  राजदरबारी त्याला म्हणाले: “ये बस. कृपया तो संदेश आम्हाला वाचून दाखव.” तेव्हा बारूखने तो संदेश त्यांच्यासमोर वाचला. १६  तो संदेश ऐकताच ते फार घाबरले आणि एकमेकांकडे बघू लागले. मग ते बारूखला म्हणाले: “आम्हाला या सगळ्या गोष्टी राजाला सांगितल्याच पाहिजेत.” १७  त्यांनी मग बारूखला विचारलं: “कृपया आम्हाला सांग, तू या सगळ्या गोष्टी कोणाच्या सांगण्यावरून लिहिल्यास? यिर्मयाच्या?” १८  त्यावर बारूखने त्यांना उत्तर दिलं: “हो, यातली एकूण एक गोष्ट यिर्मयाने मला सांगितली आहे. आणि मी ती शाईने या गुंडाळीवर लिहून काढली.” १९  तेव्हा राजदरबारी बारूखला म्हणाले: “तू आणि यिर्मया, तुम्ही दोघं कुठेतरी जाऊन लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”+ २०  मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा सचिवाच्या खोलीत नेऊन ठेवली आणि ते अंगणात, राजाकडे गेले. त्यांनी जे काही ऐकलं होतं, ते सगळं त्यांनी राजाला सांगितलं. २१  तेव्हा, राजाने यहूदीला ती गुंडाळी आणायला पाठवलं.+ यहूदीने अलीशामा सचिवाच्या खोलीतून ती गुंडाळी आणली, आणि तो ती राजासमोर आणि राजाजवळ उभ्या असलेल्या सगळ्या राजदरबाऱ्‍यांसमोर वाचू लागला. २२  त्या वेळी वर्षातला नववा महिना* चालू होता. आणि राजा थंडीच्या दिवसांत ज्या महालात राहायचा तिथे बसला होता. आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती. २३  यहूदीने गुंडाळीतले तीन-चार भाग वाचले, की राजा लगेच सचिवाच्या सुरीने ते भाग कापून शेगडीतल्या आगीत टाकायचा. असं करत-करत ती संपूर्ण गुंडाळी आगीत जळून खाक झाली. २४  राजाने आणि त्याच्या सगळ्या सेवकांनी गुंडाळीतला संदेश ऐकला, पण ते घाबरले नाहीत किंवा दुःखाने त्यांनी आपले कपडेही फाडले नाहीत. २५  राजाने गुंडाळी जाळू नये अशी एलनाथान,+ दलाया+ आणि गमरयाह+ यांनी त्याला खूप विनंती केली, पण राजाने त्यांचं काहीएक ऐकलं नाही. २६  उलट राजाने, राजपुत्र यरहमेल याला, तसंच अज्रीएलचा मुलगा सराया आणि अब्देलचा मुलगा शलेम्याह यांना बारूख सचिवाला आणि यिर्मया संदेष्ट्याला पकडायचा हुकूम दिला. पण यहोवाने त्या दोघांना लपवून ठेवलं.+ २७  यिर्मयाने सांगितलेल्या गोष्टी बारूखने ज्या गुंडाळीवर लिहिल्या होत्या,+ ती गुंडाळी राजाने जाळून टाकल्यानंतर यिर्मयाला यहोवाकडून परत एक संदेश मिळाला. तो असा: २८  “दुसरी एक गुंडाळी घे आणि यहूदाचा राजा यहोयाकीम याने जी गुंडाळी जाळून टाकली+ त्या गुंडाळीतल्या सगळ्या गोष्टी या गुंडाळीवर परत लिहून काढ. २९  आणि यहूदाचा राजा यहोयाकीम याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “तू गुंडाळी जाळून टाकलीस आणि म्हणालास, ‘तू त्यावर असं का लिहिलंस, की “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करेल, आणि या देशात एकही माणूस किंवा प्राणी उरणार नाही”?’+ ३०  म्हणून आता, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी यहोवा असं म्हणतो, ‘दावीदच्या राजासनावर बसण्यासाठी त्याच्या वंशात कोणीही उरणार नाही.+ आणि त्याचं प्रेत दिवसाच्या उन्हात आणि रात्रीच्या थंडीत पडून राहील.+ ३१  मी त्याच्याकडून, त्याच्या वंशजांकडून आणि त्याच्या सेवकांकडून त्यांच्या अपराधांचा हिशोब घेईन. मी त्यांच्यावर, यरुशलेमच्या रहिवाशांवर आणि यहूदाच्या माणसांवर जी संकटं आणण्याविषयी बोललो होतो, ती सगळी संकटं मी त्यांच्यावर आणीन.+ कारण त्यांनी माझं ऐकलं नाही.’”’”+ ३२  यिर्मयाने मग दुसरी एक गुंडाळी घेतली आणि ती नेरीयाच्या मुलाला, म्हणजे बारूख सचिवाला दिली.+ यहूदाचा राजा यहोयाकीम याने जी गुंडाळी आगीत जाळून टाकली,+ त्यावर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी यिर्मया सांगत गेला आणि बारूख त्या लिहित गेला. शिवाय, यांसारख्या आणखीही काही गोष्टी गुंडाळीत लिहिण्यात आल्या.

तळटीपा

किंवा “प्रती तयार करणाऱ्‍याचा.”
किंवा “जेवणाच्या खोलीत.”
नोव्हेंबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या मध्यापर्यंत. अति. ख१५ पाहा.