यिर्मया ३७:१-२१

  • खास्दी लोक काही काळासाठी वेढा काढतात (१-१०)

  • यिर्मयाला तुरुंगात टाकलं जातं (११-१६)

  • सिद्‌कीया यिर्मयाला भेटतो (१७-२१)

    • यिर्मयाला भाकर पुरवली जाते (२१)

३७  योशीयाचा मुलगा, म्हणजे सिद्‌कीया+ राजा हा यहोयाकीमच्या मुलाच्या, म्हणजे कोन्याच्या*+ जागी राज्य करू लागला. कारण बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने त्याला यहूदावर राजा म्हणून नेमलं होतं.+ २  पण, यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं त्याकडे सिद्‌कीया राजाने, त्याच्या सेवकांनी आणि देशातल्या लोकांनी लक्ष दिलं नाही. ३  सिद्‌कीया राजाने शलेम्याहचा मुलगा यहूकल+ आणि मासेया याजकाचा मुलगा सफन्या+ यांना यिर्मया संदेष्ट्याकडे असं सांगून पाठवलं: “कृपा करून आपला देव यहोवा याच्याकडे आपल्यासाठी प्रार्थना करा.” ४  यिर्मयाला अजूनपर्यंत तुरुंगात टाकण्यात आलं नव्हतं,+ म्हणून तो लोकांमध्ये मोकळेपणे फिरत होता. ५  त्या वेळी, खास्दी लोकांनी यरुशलेमला वेढा घातला होता. पण, फारोचं सैन्य इजिप्तमधून इकडे यायला निघालं आहे,+ हे ऐकून खास्दी लोक यरुशलेमपासून निघून गेले.+ ६  तेव्हा यिर्मया संदेष्ट्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ७  “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला माझा सल्ला घ्यायला माझ्याकडे पाठवलंय, त्याला असं सांगा: “बघ! फारोचं जे सैन्य तुम्हाला मदत करायला येतंय, त्याला परत आपल्या देशात, इजिप्तला जावं लागेल.+ ८  आणि खास्दी लोक पुन्हा येऊन शहराविरुद्ध लढतील. ते त्यावर कब्जा मिळवून त्याला जाळून टाकतील.”+ ९  यहोवा म्हणतो, “असं म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, की ‘खास्दी लोक निघून गेलेत, ते परत येणार नाहीत.’ कारण ते नक्की परत येतील. १०  तुम्ही तुमच्याशी लढणाऱ्‍या खास्दी लोकांच्या सगळ्या सैन्याला जरी संपवून टाकलंत आणि त्यांचे फक्‍त जखमी सैनिक जरी उरले, तरी ते आपल्या छावणीतून बाहेर येतील आणि हे शहर जाळून टाकतील.”’”+ ११  फारोच्या सैन्यामुळे जेव्हा खास्दी लोकांचं सैन्य यरुशलेमपासून निघून गेलं,+ १२  तेव्हा यिर्मया त्याच्या लोकांमधला त्याचा हिस्सा मिळवायला यरुशलेमहून बन्यामीनच्या प्रदेशात जायला निघाला.+ १३  पण, जेव्हा तो ‘बन्यामीनच्या फाटकाजवळ’ पोहोचला, तेव्हा पहारेकऱ्‍यांचा अधिकारी इरीया याने त्याला धरलं; इरीया हा शलेम्याहचा मुलगा आणि हनन्याचा नातू होता. तो यिर्मया संदेष्ट्याला म्हणाला: “तू दगाबाजी करतोयस! तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला चाललायस!” १४  पण यिर्मया त्याला म्हणाला: “नाही, मी दगाबाजी करत नाही! मी खास्द्यांकडे नाही चाललो.” इरीया मात्र त्याचं काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याने यिर्मयाला अटक केली आणि तो त्याला अधिकाऱ्‍यांकडे घेऊन गेला. १५  अधिकारी यिर्मयावर खूप भडकले.+ त्यांनी त्याला बेदम मारलं आणि यहोनाथान सचिवाच्या घरात डांबलं;+ कारण त्याच्या घरालाच तुरुंग बनवण्यात आलं होतं. १६  यिर्मयाला तिथे तळघरात, अंधार कोठडीत टाकण्यात आलं आणि तो बरेच दिवस तिथे राहिला. १७  मग सिद्‌कीया राजाने यिर्मयाला आपल्या महालात बोलावून घेतलं आणि त्याने एकांतात त्याला काही प्रश्‍न विचारले.+ तो म्हणाला, “यहोवाकडून काही संदेश आहे का?” त्यावर यिर्मया म्हणाला, “हो आहे!” यिर्मया पुढे म्हणाला, “तुला बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल!”+ १८  यिर्मया सिद्‌कीया राजाला असंही म्हणाला: “मी तुझ्याविरुद्ध, तुझ्या सेवकांविरुद्ध आणि तुझ्या लोकांविरुद्ध असं काय पाप केलंय, की तुम्ही लोकांनी मला तुरुंगात टाकलंत? १९  तुमचे जे संदेष्टे तुम्हाला सांगायचे, की ‘बाबेलचा राजा तुमच्याविरुद्ध आणि या देशाविरुद्ध लढायला येणार नाही,’ ते आता कुठे गेले?+ २०  आता हे राजा, माझ्या प्रभू, कृपा करून माझी एक विनंती ऐक. माझ्यावर दया कर, कृपया मला परत यहोनाथान सचिवाच्या घरी पाठवू नकोस,+ नाहीतर मी तिथे मरून जाईन.”+ २१  म्हणून, सिद्‌कीया राजाने यिर्मयाला ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ कैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. शहरातली सगळी भाकर संपेपर्यंत+ यिर्मयाला दररोज भटारांच्या गल्लीतून एक भाकर दिली जायची.+ अशा प्रकारे, यिर्मया ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ राहिला.

तळटीपा

याला यहोयाखीन आणि यखन्या असंही म्हटलं आहे.