यिर्मया ३८:१-२८

  • यिर्मयाला कोरड्या विहिरीत टाकलं जातं (१-६)

  • एबद-मलेख यिर्मयाला सोडवतो (७-१३)

  • सिद्‌कीयाने शरण जावं अशी यिर्मया त्याला विनंती करतो (१४-२८)

३८  यिर्मया लोकांना जो संदेश सांगत होता, तो संदेश मत्तानचा मुलगा शपत्याह, पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याहचा मुलगा युकाल+ आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर+ यांनी ऐकला. यिर्मया असं सांगत होता: २  “यहोवा म्हणतो, ‘जो कोणी या शहरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरेल.+ पण जो कोणी खास्दी लोकांना शरण जाईल तो आपला जीव वाचवेल; तो मरणार नाही, तर जिवंत राहील.’+ ३  यहोवा असं म्हणतो, ‘हे शहर नक्की बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती दिलं जाईल, आणि तो त्यावर कब्जा मिळवेल.’”+ ४  तेव्हा अधिकारी राजाला म्हणाले: “या माणसाला मारून टाका.+ कारण असल्या गोष्टी सांगून, तो या शहरात उरलेल्या सैनिकांचं आणि सगळ्या लोकांचं मनोबल खचवतोय. हा माणूस लोकांच्या भल्याचा नाही, तर वाइटाचा विचार करतोय.” ५  त्यावर सिद्‌कीया राजा म्हणाला: “बघा! तो तुमच्या हाती आहे. कारण राजा तुम्हाला रोखू शकत नाही.” ६  म्हणून त्यांनी यिर्मयाला धरलं आणि ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ असलेल्या राजपुत्र मल्कीया याच्या विहिरीत टाकलं. त्यांनी त्याला दोरांनी विहिरीत सोडलं. त्या विहिरीत पाणी नव्हतं, फक्‍त चिखल होता. आणि यिर्मया त्या चिखलात रुतू लागला. ७  यिर्मयाला त्यांनी विहिरीत टाकलं आहे, ही गोष्ट एबद-मलेख+ राजदरबाऱ्‍याला,* जो मूळचा इथियोपियाचा होता त्याला कळली. त्या वेळी राजा ‘बन्यामीनच्या फाटकाजवळ’+ बसला होता. ८  म्हणून एबद-मलेख राजमहालातून निघाला आणि राजाकडे गेला. तो त्याला म्हणाला: ९  “हे राजा, माझ्या प्रभू! बघा, या लोकांनी यिर्मया संदेष्ट्यासोबत किती वाईट केलं! त्यांनी त्याला विहिरीत फेकलंय. तो तिथे उपासमारीने मरून जाईल, कारण शहरात खायला अन्‍न उरलेलं नाही.”+ १०  तेव्हा राजाने इथियोपियाच्या एबद-मलेखला अशी आज्ञा दिली: “इथून ३० माणसं घेऊन जा आणि यिर्मया संदेष्टाला तो मरायच्या आधी बाहेर काढ.” ११  मग एबद-मलेखने आपल्यासोबत माणसं घेतली आणि ते सगळे महालात, राजभांडाराच्या खाली असलेल्या एका खोलीत गेले.+ त्यांनी तिथून काही जुनीपुराणी फडकी आणि चिंध्या घेतल्या. आणि दोरांच्या साहाय्याने त्या यिर्मयाकडे विहिरीत खाली सोडल्या. १२  मग इथियोपियाचा एबद-मलेख यिर्मयाला म्हणाला: “ही फडकी आणि चिंध्या तुझ्या काखेत दोरांखाली धर, म्हणजे दोर तुला रुतणार नाहीत.” तेव्हा यिर्मयाने तसंच केलं. १३  मग त्यांनी यिर्मयाला दोरांच्या साहाय्याने विहिरीतून ओढून बाहेर काढलं. त्यानंतर तो ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातच’ राहिला.+ १४  सिद्‌कीया राजाने यिर्मयाला निरोप पाठवून यहोवाच्या मंदिराच्या तिसऱ्‍या प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेतलं. मग राजा त्याला म्हणाला: “मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. माझ्यापासून काहीच लपवू नका.” १५  त्यावर यिर्मया सिद्‌कीयाला म्हणाला: “मी जर तुला सांगितलं, तर तू मला नक्कीच मारून टाकशील. आणि मी जर तुला सल्ला दिला, तर तू माझं ऐकणार नाहीस.” १६  तेव्हा सिद्‌कीया राजा एकांतात यिर्मयाला शपथ घेऊन म्हणाला: “ज्या देवाने आपल्याला जीवन दिलंय त्या यहोवाच्या जीवनाची शपथ, मी तुम्हाला मारून टाकणार नाही किंवा तुमच्या जिवावर टपलेल्या माणसांच्या हातीही तुम्हाला देणार नाही.” १७  त्यावर यिर्मया सिद्‌कीयाला म्हणाला: “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तू बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांना शरण गेलास, तर तुझा जीव वाचेल आणि हे शहरही जाळून टाकलं जाणार नाही. तुझा आणि तुझ्या घराण्याचा बचाव होईल.+ १८  पण जर तू बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांना शरण गेला नाहीस, तर हे शहर खास्दी लोकांच्या हाती दिलं जाईल. ते हे शहर जाळून टाकतील+ आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.’”+ १९  तेव्हा सिद्‌कीया यिर्मयाला म्हणाला: “जे यहुदी लोक खास्द्यांना जाऊन मिळालेत, त्यांची मला भीती वाटते. कारण मला जर त्यांच्या हाती दिलं गेलं, तर ते माझ्याशी क्रूरपणे वागतील.” २०  पण यिर्मया त्याला म्हणाला: “तुला त्यांच्या हाती दिलं जाणार नाही. मी यहोवाचा जो संदेश तुला सांगतोय, कृपा करून त्याप्रमाणे कर; म्हणजे तुझं भलं होईल आणि तुझा जीव वाचेल. २१  पण तू जर त्यांना शरण गेला नाहीस, तर यहोवाने मला काय प्रकट केलंय, ते ऐक: २२  पाहा! यहूदाच्या राजाच्या महालात उरलेल्या सगळ्या स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांकडे+ बाहेर नेलं जातंय. आणि त्या म्हणत आहेत,‘ज्या माणसांवर तुम्ही भरवसा ठेवला,त्यांनी तुम्हाला फसवलंय आणि ते वरचढ ठरलेत.+ त्यांच्यामुळे तुमचा पाय चिखलात रुतलायआणि ते तुम्हाला सोडून मागे निघून गेलेत.’ २३  ते तुझ्या सगळ्या बायकांना आणि मुलांना बाहेर खास्दी लोकांकडे घेऊन जात आहेत. तूही त्यांच्या हातून निसटणार नाहीस. बाबेलचा राजा तुला नक्की धरेल+ आणि तुझ्यामुळे हे शहर जाळून टाकलं जाईल.”+ २४  मग सिद्‌कीया यिर्मयाला म्हणाला: “यातलं काहीही कोणाला सांगू नका, नाहीतर तुमचा जीव जाईल. २५  मी तुमच्याशी बोललोय ही गोष्ट जर अधिकाऱ्‍यांना कळली आणि त्यांनी येऊन तुम्हाला असं विचारलं, की ‘तुम्ही राजाला काय सांगितलं ते आम्हाला सांगा. आमच्यापासून काही लपवू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला ठार मारणार नाही.+ राजा तुमच्याशी काय बोलला ते आम्हाला सांगा.’ २६  तर तुम्ही असं उत्तर द्या: ‘मी राजाला विनंती करत होतो, की त्याने मला परत यहोनाथानच्या घरी पाठवू नये, नाहीतर मी मरून जाईन.’”+ २७  काही काळाने सगळे अधिकारी यिर्मयाकडे आले आणि चौकशी करू लागले. तेव्हा राजाने आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी यिर्मयाला आणखी काही विचारलं नाही. कारण त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं कोणीही ऐकलं नव्हतं. २८  यरुशलेमवर कब्जा होईपर्यंत, यिर्मया ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातच’ राहिला;+ यरुशलेम काबीज करण्यात आलं तेव्हाही तो तिथेच होता.+

तळटीपा

शब्दशः “षंढ.” शब्दार्थसूचीत “षंढ” पाहा.