यिर्मया ३९:१-१८

  • यरुशलेमचा नाश (१-१०)

    • सिद्‌कीया पळतो, पण पकडला जातो (४-७)

  • यिर्मयाचं संरक्षण (११-१४)

  • एबद-मलेखचा जीव वाचेल हे सांगितलं जातं (१५-१८)

३९  यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला, आणि त्याने येऊन शहराला वेढा घातला.+ २  मग सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी शहराच्या भिंतीला खिंडार पाडलं.+ ३  त्यानंतर बाबेलच्या राजाचे सगळे अधिकारी आत घुसले आणि ‘मधल्या दरवाजात’ जाऊन बसले.+ त्या अधिकाऱ्‍यांची नावं अशी: नेर्गल-शरेसर समगार,* नबो-सर्सखीम रबसारीस,* आणि नेर्गल-शरेसर रबमाग.* त्यांच्यासोबत बाबेलच्या राजाचे इतर अधिकारीही होते. ४  यहूदाचा राजा सिद्‌कीया आणि त्याचे सगळे सैनिक यांनी जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हा ते रातोरात शहराबाहेर पळून गेले;+ ते राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून अराबाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळाले.+ ५  पण, खास्दी लोकांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्यांनी सिद्‌कीयाला गाठलं.+ मग त्यांनी त्याला कैद करून हमाथ+ प्रदेशातल्या रिब्ला इथे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्याकडे आणलं.+ तिथे त्याने त्याला शिक्षा सुनावली. ६  बाबेलच्या राजाने रिब्ला इथे सिद्‌कीयासमोर त्याच्या मुलांना ठार मारलं. तसंच, त्याने यहूदाच्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांचीही कत्तल केली.+ ७  मग त्याने सिद्‌कीयाचे डोळे फोडले आणि बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला तांब्याच्या बेड्या घातल्या.+ ८  नंतर खास्दी लोकांनी राजाचा महाल आणि लोकांची घरं जाळून टाकली.+ तसंच, त्यांनी यरुशलेम शहराभोवती असलेली भिंतही पाडून टाकली.+ ९  रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने शहरात उरलेल्या लोकांना बाबेलला बंदी बनवून नेलं. तसंच, त्याच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि इतर उरलेल्या लोकांनाही त्याने बंदी बनवून नेलं. १०  पण, जे फार गरीब आणि कंगाल होते त्यांना मात्र रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने यहूदाच्या प्रदेशात मागे ठेवलं. त्या दिवशी त्याने त्यांना काम* करण्यासाठी द्राक्षमळे आणि शेतं दिली.+ ११  बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याला यिर्मयाविषयी असा हुकूम दिला: १२  “जा, त्याला शोध आणि त्याची काळजी घे. त्याला काही करू नकोस. तो तुझ्याकडे जे काही मागेल ते त्याला दे.”+ १३  तेव्हा रक्षकांचा प्रमुख नबुजरदान, रबसारीस* नबू-शजबान, रबमाग* नेर्गल-शरेसर आणि बाबेलच्या राजाचे सगळे प्रमुख लोक यांनी आपली माणसं पाठवली, १४  आणि यिर्मयाला ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातून’+ बाहेर काढलं. शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याने त्याला आपल्या घरी न्यावं, म्हणून त्यांनी यिर्मयाला त्याच्याकडे सोपवलं. अशा प्रकारे यिर्मया लोकांमध्ये राहिला. १५  यिर्मया जेव्हा ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ कैदेत होता,+ तेव्हा त्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १६  “जा, आणि इथियोपियाच्या एबद-मलेखला+ असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! मी या शहराचं भलं करण्याविषयी नाही, तर त्यावर संकट आणण्याविषयी जे बोललो होतो, ते मी पूर्ण करतोय. ज्या दिवशी हे घडेल, त्या दिवशी तू स्वतः ते पाहशील.”’ १७  ‘पण त्या दिवशी मी तुला वाचवीन. ज्या लोकांची तुला भीती वाटते, त्यांच्या हाती तुला दिलं जाणार नाही,’ असं यहोवा म्हणतो. १८  ‘मी नक्की तुला वाचवीन. तू तलवारीला बळी पडणार नाहीस. तू माझ्यावर भरवसा ठेवलास,+ म्हणून तुझ्या जिवाचं रक्षण केलं जाईल,’+ असं यहोवा म्हणतो.”

तळटीपा

समगार ही एक पदवी असावी असं दिसतं.
किंवा या हिब्रू लिखाणाचं असंही विभाजन करण्यात आलं आहे: “नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रबसारीस.”
किंवा “प्रमुख जादूगार (ज्योतिषी).”
किंवा कदाचित, “सक्‍तीची मजुरी.”
किंवा “प्रमुख राजदरबारी.”
किंवा “प्रमुख जादूगार (ज्योतिषी).”