यिर्मया ४०:१-१६
४० रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने रामा+ इथे यिर्मयाला मुक्त केल्यावर, यहोवाकडून यिर्मयाला एक संदेश मिळाला; यरुशलेम आणि यहूदाच्या सर्व लोकांना नबुजरदान बंदी बनवून बाबेलला घेऊन चालला होता, तेव्हा त्याने त्यांच्यासोबत यिर्मयालाही बेड्या घालून रामा इथे आणलं होतं.
२ रक्षकांचा प्रमुख यिर्मयाला बोलावून म्हणाला: “तुझ्या देवाने, यहोवाने सांगितलं होतं, की तो या जागेवर संकट आणेल.
३ आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं. कारण, तुम्ही लोकांनी यहोवाविरुद्ध पाप केलंय आणि त्याचं ऐकलं नाही. म्हणून तुमच्या बाबतीत हे सगळं घडलंय.+
४ आता हे बघ! मी तुझ्या हातांतल्या बेड्या काढून तुला मोकळं करतोय. तुला माझ्यासोबत बाबेलला यायची इच्छा असेल, तर ये; मी तुझी चांगली काळजी घेईन. पण जर तुला माझ्यासोबत बाबेलला यायचं नसेल, तर येऊ नकोस. बघ, संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुला जिथे जायचंय तिथे जा.”+
५ यिर्मया अजून मागे गेलाही नव्हता, तोच नबुजरदान त्याला म्हणाला: “शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याच्याकडे तू परत जा. बाबेलच्या राजाने त्याला यहूदाच्या शहरांवर अधिकारी म्हणून नेमलंय. तेव्हा त्याच्याकडे जा आणि आपल्या लोकांसोबत राहा; किंवा मग तुला पाहिजे तिकडे जा.”
नंतर रक्षकांच्या प्रमुखाने त्याला काही अन्नसामग्री आणि भेटवस्तू देऊन पाठवून दिलं.
६ म्हणून मग यिर्मया, मिस्पा+ इथे अहीकामचा मुलगा गदल्या याच्याकडे गेला आणि त्याच्याबरोबर देशात उरलेल्या लोकांमध्ये राहिला.
७ काही काळाने, जे सेनाधिकारी आपल्या सैनिकांसोबत रानावनात राहत होते त्यांनी ऐकलं, की बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं आहे; ज्या गरीब लोकांना बाबेलला बंदी बनवून नेलं नाही त्या माणसांवर, स्त्रियांवर आणि मुलाबाळांवर त्याला अधिकारी म्हणून नेमलं आहे.+
८ तेव्हा ते मिस्पा इथे गदल्याकडे आले;+ त्यांची नावं अशी: नथन्याचा मुलगा इश्माएल,+ कारेहची मुलं योहानान+ आणि योनाथान, तन्हूमेथचा मुलगा सराया, नटोफा इथे राहणाऱ्या रफैची मुलं आणि एका माकाथी माणसाचा मुलगा यजन्या;+ हे सर्व आपल्या माणसांना घेऊन गदल्याकडे आले.
९ तेव्हा शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या त्या सेनाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या माणसांना शपथ घेऊन म्हणाला: “खास्दी लोकांची सेवा करायला घाबरू नका. या देशात राहा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचं भलं होईल.+
१० मी इथे मिस्पामध्ये राहीन आणि आपल्याकडे येणाऱ्या खास्दी लोकांशी तुमच्या वतीने बोलेन. पण तुम्ही मात्र द्राक्षारस, उन्हाळ्यातली फळं आणि तेल जमा करून भाड्यांमध्ये भरून ठेवा. आणि जी शहरं तुम्ही ताब्यात घेतलीत त्यांमध्ये राहा.”+
११ बाबेलच्या राजाने यहूदामध्ये काही लोकांना राहू दिलं आहे, आणि शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या याला त्यांच्यावर अधिकारी म्हणून नेमलं आहे ही गोष्ट मवाब, अम्मोन, अदोम आणि इतर सर्व देशांत राहणाऱ्या यहुदी लोकांनीही ऐकली.
१२ त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी यहुदी लोकांची पांगापांग झाली होती, तिथून ते सगळे यहूदाच्या प्रदेशात परत येऊ लागले. ते मिस्पा इथे गदल्याकडे आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षारस आणि उन्हाळ्यातली फळं जमा केली.
१३ कारेहचा मुलगा योहानान आणि रानावनात असलेले सगळे सेनाधिकारी मिस्पामध्ये गदल्याकडे आले.
१४ ते त्याला म्हणाले: “तुला माहीत नाही का, की अम्मोनी+ लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्माएल याला तुझा खून करायला पाठवलंय?”+ पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.
१५ मग, कारेहचा मुलगा योहानान हा मिस्पामध्ये गदल्याकडे येऊन त्याला एकांतात म्हणाला: “मी जाऊन नथन्याचा मुलगा इश्माएल याला मारून टाकतो. कोणालाही याची खबर लागणार नाही. त्याने तुझा जीव का घ्यावा? आणि तुझ्याकडे आलेल्या यहूदाच्या सगळ्या लोकांची पांगापांग का व्हावी? आणि यहूदात उरलेल्या लोकांचा नाश का व्हावा?”
१६ पण अहीकामचा मुलगा गदल्या+ कारेहच्या मुलाला, योहानानला म्हणाला: “असं अजिबात करू नकोस. कारण इश्माएलबद्दल तू जे काही म्हणतोस ते खोटंय.”