यिर्मया ४१:१-१८
४१ मग सातव्या महिन्यात अलीशामाचा नातू, म्हणजे नथन्याचा मुलगा इश्माएल+ हा दहा माणसांना सोबत घेऊन मिस्पा इथे अहीकामचा मुलगा गदल्या याच्याकडे आला; इश्माएल हा राजवंशातला असून राजाच्या प्रमुख माणसांपैकी एक होता. मिस्पामध्ये+ ते एकत्र जेवण करत असताना,
२ नथन्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्यासोबत असलेली दहा माणसं उठली आणि त्यांनी शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या याला तलवारीने मारून टाकलं; बाबेलच्या राजाने ज्याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं होतं, त्याला इश्माएलने अशा प्रकारे ठार मारलं.
३ याशिवाय, त्याने मिस्पामध्ये गदल्यासोबत असलेल्या सगळ्या यहुदी लोकांना आणि खास्दी सैनिकांनाही मारून टाकलं.
४ मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे गदल्याचा खून झाल्यावर आणि या गोष्टीची कोणालाही खबर लागण्यापूर्वी असं झालं, की
५ शखेम,+ शिलो+ आणि शोमरोन+ इथून ८० माणसं आली. त्यांनी आपल्या दाढ्या कापल्या होत्या, कपडे फाडले होते आणि अंगावर जखमा करून घेतल्या होत्या.+ तसंच, यहोवाच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी त्यांच्या हातांत अन्नार्पणं आणि ऊद*+ होता.
६ तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल मिस्पामधून बाहेर रडत-रडत त्यांना भेटायला गेला. त्यांना भेटल्यावर तो त्यांना म्हणाला: “चला, आपण अहीकामच्या मुलाकडे, गदल्याकडे जाऊ.”
७ पण जेव्हा ते शहरात आले, तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल आणि त्याची माणसं यांनी त्या लोकांची कत्तल केली आणि त्यांना कोरड्या विहिरीत फेकून दिलं.
८ पण, त्यांच्यामधली दहा माणसं इश्माएलला म्हणाली: “आमचा जीव घेऊ नकोस. कारण आमच्याकडे गव्हाचा, तेलाचा, जवाचा आणि मधाचा साठा आहे, आणि आम्ही तो शेतामध्ये लपवून ठेवलाय.” म्हणून त्याने त्यांना सोडून दिलं; त्यांच्या भावांसोबत त्याने त्यांना ठार मारलं नाही.
९ इश्माएलने ज्या माणसांची कत्तल केली होती, त्यांची प्रेतं त्याने एका मोठ्या विहिरीत टाकून दिली; इस्राएलचा राजा बाशा+ याच्या भीतीमुळे आसा राजाने ही विहीर खणली होती. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ही विहीर कत्तल केलेल्या माणसांच्या प्रेतांनी भरून टाकली.
१० इश्माएलने मिस्पामध्ये उरलेल्या सगळ्या लोकांना,+ म्हणजे रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने अहीकामचा मुलगा गदल्या याच्या अधिकाराखाली दिलेल्या सगळ्या लोकांना बंदी बनवलं. या लोकांमध्ये राजाच्या मुली आणि मिस्पामध्ये उरलेले सगळे लोकही होते.+ या सर्व लोकांना बंदी बनवून नथन्याचा मुलगा इश्माएल पलीकडे अम्मोनी लोकांच्या प्रदेशाकडे जायला निघाला.+
११ नथन्याचा मुलगा इश्माएल याने जी सगळी दुष्ट कामं केली होती, त्यांबद्दल कारेहचा मुलगा योहानान+ आणि त्याचे सगळे सेनाधिकारी यांनी ऐकलं.
१२ तेव्हा ते आपल्यासोबत सगळ्या माणसांना घेऊन नथन्याचा मुलगा इश्माएल याच्याशी लढायला निघाले. आणि त्यांना तो गिबोनच्या मोठ्या जलाशयाजवळ* सापडला.
१३ इश्माएलने ज्या लोकांना बंदी बनवून नेलं होतं, त्यांनी जेव्हा कारेहचा मुलगा योहानान याला आणि त्याच्यासोबत त्याच्या सगळ्या सेनाधिकाऱ्यांना पाहिलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
१४ मग ते सगळे लोक, म्हणजे इश्माएलने मिस्पामधून+ बंदी बनवून नेलेले सगळे लोक, मागे फिरले आणि कारेहचा मुलगा योहानान याच्याकडे गेले.
१५ पण, नथन्याचा मुलगा इश्माएल आणि त्याची आठ माणसं मात्र योहानानच्या हातून निसटली, आणि ते अम्मोनी लोकांकडे पळून गेले.
१६ अहीकामचा मुलगा गदल्या याचा खून केल्यानंतर+ नथन्याचा मुलगा इश्माएल याने मिस्पामधून ज्या उरलेल्या माणसांना, सैनिकांना, स्त्रियांना, मुलांना आणि राजदरबाऱ्यांना बंदी बनवून नेलं होतं, त्या सगळ्या लोकांना कारेहचा मुलगा योहानान आणि त्याच्यासोबत असलेले सगळे सेनाधिकारी यांनी सोडवलं आणि गिबोनमधून परत आणलं.
१७ मग ते इजिप्तला जाण्याच्या उद्देशाने+ बेथलेहेमजवळ+ असलेल्या किम्हामच्या विश्रामगृहात थांबले.
१८ कारण त्यांना खास्दी लोकांची भीती वाटत होती. बाबेलच्या राजाने अहीकामच्या ज्या मुलाला, म्हणजे गदल्याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं होतं,+ त्याचा नथन्याच्या मुलाने, इश्माएलने खून केला होता. म्हणून त्यांना खास्दी लोकांची भीती वाटत होती.