यिर्मया ४३:१-१३

  • लोक ऐकत नाहीत, ते इजिप्तला जातात (१-७)

  • यिर्मयाला इजिप्तमध्ये यहोवाकडून संदेश (८-१३)

४३  अशा प्रकारे यिर्मयाने सर्व लोकांना, त्यांचा देव यहोवा याच्याकडून मिळालेला संदेश सांगितला; त्यांच्या देवाने, यहोवाने यिर्मयाला जो संदेश सांगायला पाठवलं होतं, त्यातला एकूण एक शब्द त्याने त्या लोकांना सांगितला. २  तेव्हा, होशायाचा मुलगा अजऱ्‍या, कारेहचा मुलगा योहानान+ आणि इतर सगळी गर्विष्ठ माणसं यिर्मयाला म्हणाली: “तू जे सांगतोस ते साफ खोटंय! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन राहू नका,’ असं सांगायला आमच्या देवाने, यहोवाने तुला पाठवलं नाही. ३  खरंतर, आम्ही खास्द्यांच्या हाती पडून मरावं किंवा त्यांनी आम्हाला बाबेलला बंदिवासात न्यावं, म्हणून नेरीयाचा मुलगा बारूख+ हाच तुला आमच्याविरुद्ध चिथवतोय.”+ ४  असं बोलून कारेहचा मुलगा योहानान, त्याचे सगळे सेनाधिकारी आणि सगळे लोक यांनी यहूदा देशात राहण्याची यहोवाची आज्ञा पाळली नाही. ५  उलट, कारेहचा मुलगा योहानान आणि त्याचे सगळे सेनाधिकारी यांनी यहूदामध्ये उरलेल्या लोकांनाही, म्हणजे ज्यांची वेगवेगळ्या राष्ट्रांत पांगापांग झाली होती आणि जे परत यहूदा देशात राहायला आले होते, त्या सगळ्या लोकांनाही आपल्याबरोबर घेतलं.+ ६  त्यांनी आपल्यासोबत पुरुषांना, स्त्रियांना, मुलांना आणि राजाच्या मुलींना घेतलं. तसंच, रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने ज्यांना शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याच्या अधिकाराखाली दिलं होतं, त्या सगळ्या लोकांनाही त्यांनी आपल्यासोबत घेतलं. याशिवाय, त्यांनी यिर्मया संदेष्ट्याला आणि नेरीयाचा मुलगा बारूख यालाही आपल्यासोबत घेतलं. ७  मग ते इजिप्तला गेले. त्यांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही. आणि ते तहपन्हेस+ इथपर्यंत जाऊन पोहोचले. ८  मग तहपन्हेसमध्ये यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९  “मोठमोठे दगड घे, आणि तहपन्हेसमध्ये फारोच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ विटांनी बनवलेला जो ओटा आहे, तिथे सगळ्या यहुदी माणसांसमोर ते बांधकामाच्या चुन्यात लपव. १०  आणि त्या माणसांना असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! मी माझा सेवक, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला पाठवतोय.+ जे दगड मी लपवलेत त्यांवरच तो आपलं राजासन मांडेल, आणि त्यांवर तो आपला शाही तंबू पसरवेल.+ ११  तो येऊन इजिप्तवर हल्ला करेल.+ तेव्हा काही लोक तलवारीला बळी पडतील, काही जीवघेण्या रोगाने मरतील आणि काहींना बंदिवासात नेलं जाईल.+ १२  मी इजिप्तच्या देवांच्या मंदिरांना आग लावीन.+ तो राजा ती मंदिरं जाळून टाकेल आणि त्यांना बंदी बनवेल. मेंढपाळ जितक्या सहजपणे आपल्या अंगावर घोंगडी घेतो, तितक्याच सहजपणे तो संपूर्ण इजिप्तला काबीज करेल आणि विजयी होऊन परत जाईल. १३  तो इजिप्तमध्ये असलेल्या बेथ-शेमेशच्या* खांबांचा चुराडा करेल आणि इजिप्तमधल्या दैवतांची मंदिरं जाळून टाकेल.”’”

तळटीपा

किंवा “सूर्याच्या घराच्या (मंदिर),” म्हणजे हिलियोपोलीसच्या.