यिर्मया ४४:१-३०

  • इजिप्तमधल्या यहुद्यांवर संकट येईल अशी भविष्यवाणी (१-१४)

  • लोक देवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करतात (१५-३०)

    • ‘स्वर्गाच्या राणीची’ उपासना (१७-१९)

४४  इजिप्त देशातल्या मिग्दोल,+ तहपन्हेस,+ नोफ*+ या ठिकाणी राहणाऱ्‍या, आणि पथ्रोस+ प्रदेशात राहणाऱ्‍या सर्व यहुदी लोकांसाठी+ यिर्मयाला असा संदेश मिळाला: २  “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी यरुशलेमवर आणि यहूदाच्या सगळ्या शहरांवर जी सर्व संकटं आणली, ती तुम्ही पाहिलीच आहेत.+ आजही ती शहरं उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून आहेत आणि तिथे कोणीही राहत नाही.+ ३  त्यांची ही अवस्था यामुळे झाली, कारण त्या लोकांनी वाईट कामं करून माझा क्रोध भडकवला; जी दैवतं तुम्हाला किंवा तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नव्हती, अशा परक्या दैवतांची त्यांनी सेवा केली+ आणि त्यांना बलिदानं अर्पण केली.+ ४  मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो, आणि सांगत राहिलो: “कृपा करून असलं घृणास्पद कृत्य करू नका. मला त्याचा तिरस्कार वाटतो.”+ ५  पण त्यांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी इतर दैवतांना बलिदानं अर्पण करण्याचा आपला दुष्टपणा सोडला नाही.+ ६  म्हणून माझा राग व माझा क्रोध भडकला, आणि त्यात यहूदाची शहरं व यरुशलेमचे रस्ते जळून खाक झाले. आणि त्यामुळेच ते आजही ओसाड आणि उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून आहेत.’+ ७  आणि आता इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही स्वतःवर इतकं भयंकर संकट का ओढवून घेताय, की यहूदाच्या लोकांमधल्या प्रत्येक माणसाचा, स्त्रीचा, मुलाचा आणि तान्ह्या बाळाचा नाश होऊन कोणीही उरणार नाही? ८  ज्या इजिप्त देशात तुम्ही राहायला गेलात, तिथे तुम्ही इतर दैवतांना बलिदानं अर्पण करून माझा क्रोध का भडकवताय? यामुळे तुमचा नाश होईल, आणि पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं तुम्हाला शिव्याशाप देतील आणि तुमची बदनामी करतील.+ ९  यहूदाच्या प्रदेशात आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर तुमच्या वाडवडिलांनी, यहूदाच्या राजांनी+ आणि त्यांच्या बायकांनी जी दुष्ट कामं केली;+ शिवाय, तुम्ही आणि तुमच्या बायकांनीही जी दुष्ट कामं केली, ती सगळी तुम्ही विसरलात का?+ १०  आजपर्यंत त्यांनी स्वतःला नम्र केलं नाही* आणि माझं भय बाळगलं नाही.+ मी त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना जे नियम व कायदे दिले होते त्याप्रमाणेही ते चालले नाहीत.’+ ११  म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘पाहा, मी तुमच्यावर संकट आणायचं ठरवलंय, मी यहूदाचा नाश करून टाकायचं ठरवलंय. १२  यहूदाच्या ज्या उरलेल्या लोकांनी इजिप्तमध्ये जाऊन राहायचा पक्का निश्‍चय केला होता, त्यांना मी धरीन. आणि इजिप्तमध्येच त्या सगळ्यांचा नाश होईल.+ त्यांच्यातले लहानमोठे सगळे लोक तलवारीने आणि दुष्काळाने मरतील. ते शापित होतील आणि त्यांची अवस्था पाहून लोकांना दहशत बसेल. लोक त्यांना शिव्याशाप देतील आणि त्यांची बदनामी करतील.+ १३  मी जशी यरुशलेमच्या लोकांना शिक्षा केली, तशी इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या लोकांना तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने शिक्षा करीन.+ १४  यहूदाचे जे उरलेले लोक इजिप्तमध्ये राहायला गेलेत, ते यहूदामध्ये परत यायला वाचणार नाहीत किंवा जिवंत राहणार नाहीत. त्यांना यहूदाच्या प्रदेशात परत येऊन राहायची आस लागेल, पण ते परत येऊ शकणार नाहीत. त्यांच्यातले फक्‍त काही जण वाचतील आणि परत मागे येतील.’” १५  तेव्हा, ज्या माणसांना माहीत होतं, की त्यांच्या बायका इतर दैवतांना बलिदानं अर्पण करतात ती सगळी माणसं, आणि तिथे उभ्या असलेल्या सगळ्या बायकांचा मोठा घोळका; तसंच इजिप्तमधल्या पथ्रोस+ या ठिकाणी राहणारे सगळे लोक+ यिर्मयाला म्हणाले: १६  “तू यहोवाच्या नावाने आम्हाला जे काही सांगितलंस ते आम्ही ऐकणार नाही. १७  याउलट, आमच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे आम्ही करू. आम्ही ‘स्वर्गाच्या राणीला’* बलिदानं अर्पण करू आणि तिच्यासमोर पेयार्पणं ओतू.+ आम्ही, आमच्या वाडवडिलांनी, आमच्या राजांनी आणि अधिकाऱ्‍यांनी यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर जशी बलिदानं दिली आणि पेयार्पणं ओतली, तसं आम्ही करत राहू. त्या वेळी आम्हाला खाण्यापिण्याची कसलीच कमी नव्हती, आमची परिस्थिती चांगली होती, आणि आमच्यावर कोणतंही संकट येत नव्हतं. १८  पण जेव्हापासून आम्ही ‘स्वर्गाच्या राणीला’* बलिदानं अर्पण करायचं आणि तिच्यासाठी पेयार्पणं ओतायचं बंद केलं, तेव्हापासून आम्हाला सगळ्या गोष्टींची कमी पडायला लागली. आणि तलवारीमुळे व दुष्काळामुळे आमचा नाश व्हायला लागला.” १९  स्त्रिया पुढे म्हणाल्या: “आम्ही ‘स्वर्गाच्या राणीसाठी’* बलिदानं द्यायचो, पेयार्पणं ओतायचो आणि तिच्या प्रतिमेच्या पोळ्या बनवायचो, हे सगळं काय आम्ही आमच्या नवऱ्‍यांना विचारल्याशिवाय करायचो का?” २०  तेव्हा यिर्मया त्याच्याशी बोलणाऱ्‍या सर्व माणसांना, त्यांच्या बायकांना आणि लोकांना म्हणाला: २१  “यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर तुम्ही, तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या राजांनी, अधिकाऱ्‍यांनी आणि देशातल्या लोकांनी जी बलिदानं अर्पण केली+ ती सगळी यहोवाच्या लक्षात आहेत, तो ती विसरलेला नाही! २२  शेवटी, तुमची दुष्ट कामं आणि घृणास्पद कृत्यं यहोवाला सहन झाली नाहीत. आणि म्हणून तुमचा देश उद्ध्‌वस्त झाला. त्याची भयानक अवस्था झाली, तो शापित आणि ओसाड झाला; आणि आजही तो तसाच आहे.+ २३  तुम्ही ही बलिदानं दिल्यामुळे आणि यहोवाविरुद्ध पाप केल्यामुळेच असं घडलंय. तुम्ही यहोवाचं ऐकलं नाही. तुम्ही त्याचे नियम, कायदे आणि त्याच्या स्मरण-सूचना* पाळल्या नाहीत; म्हणूनच आज हे संकट तुमच्यावर ओढवलंय.”+ २४  पुढे यिर्मया सर्व लोकांना आणि सर्व स्त्रियांना म्हणाला: “इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या सगळ्या लोकांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका. २५  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही आणि तुमच्या बायकांनी जे नवस केले होते, ते तुम्ही पूर्ण केलेत. तुम्ही म्हणाला होता: “‘स्वर्गाच्या राणीसाठी’* बलिदानं अर्पण करण्याचे आणि पेयार्पणं ओतण्याचे जे नवस आम्ही केलेत, ते आम्ही नक्की फेडू.”+ तुम्ही आणि तुमच्या बायका नक्की तुमचा नवस फेडाल.’ २६  पण इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या लोकांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका: यहोवा म्हणतो, “पाहा, मी स्वतःच्या महान नावाची शपथ घेऊन सांगतो, की यापुढे इजिप्तमध्ये राहणारा यहूदातला एकही माणूस शपथ घेताना, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा याच्या जीवनाची शपथ!’+ असं म्हणून माझं नाव घेणार नाही.+ २७  पाहा, आता मी त्यांचं भलं करायला नाही, तर त्यांच्यावर संकट आणायला त्यांच्यावर नजर ठेवून असेन.+ इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या सगळ्या माणसांचं नामोनिशाण मिटेपर्यंत त्यांचा तलवारीने आणि दुष्काळाने नाश होईल.+ २८  फक्‍त थोडेफार लोकच तलवारीपासून वाचतील आणि इजिप्तमधून परत यहूदाच्या प्रदेशात जातील.+ त्या वेळी, इजिप्तमध्ये राहायला आलेल्या यहूदाच्या उरलेल्या लोकांना कळेल, की कोणाचा शब्द खरा ठरला, माझा की त्यांचा!”’” २९  “यहोवा म्हणतो, ‘मी याच ठिकाणी तुम्हाला शिक्षा करीन, हे दाखवायला मी तुम्हाला एक चिन्ह देतोय; म्हणजे तुम्हाला कळून येईल, की तुमच्यावर संकट आणण्याविषयी मी जे बोललोय ते नक्की घडेल. ३०  यहोवा म्हणतो: “पाहा, मी इजिप्तच्या राजाला, फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या आणि त्याच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन. मी जसं यहूदाचा राजा सिद्‌कीया याला त्याच्या जिवावर टपलेल्या शत्रूच्या, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती दिलं, तसं त्याच्या बाबतीत करीन.”’”+

तळटीपा

किंवा “मेम्फिस.”
किंवा “त्यांना वाईट वाटलं नाही.”
देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.
देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.
देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.
देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.