यिर्मया ४६:१-२८

  • इजिप्तच्या विरोधात भविष्यवाणी (१-२६)

    • नबुखद्‌नेस्सर इजिप्तवर विजय मिळवेल (१३२६)

  • इस्राएलला दिलेली अभिवचनं (२७, २८)

४६  यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला वेगवेगळ्या राष्ट्रांविषयी संदेश दिला.+ २  इजिप्तबद्दल हा संदेश देण्यात आला;+ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी,+ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीश इथे इजिप्तच्या राजाच्या सैन्याला, म्हणजे फारो नखोच्या+ सैन्याला हरवलं होतं; त्या सैन्याविषयी असा संदेश देण्यात आला:  ३  “तुमच्या छोट्या ढाली* आणि मोठ्या ढाली तयार करा,आणि युद्ध करायला निघा.  ४  घोडेस्वारांनो, घोडे तयार करून त्यांच्यावर स्वार व्हा. डोक्यावर टोप घालून आपल्या जागी तैनात व्हा. भाले घासून चकचकीत करा आणि आपल्या अंगावर चिलखत चढवा.  ५  यहोवा म्हणतो, ‘ते इतके घाबरलेले का दिसत आहेत? ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे हरलेत. ते घाबरल्यामुळे पळून गेलेत. त्यांच्या शूरवीरांनी मागे वळूनही पाहिलं नाही. सगळीकडे दहशत पसरली आहे.  ६  चपळ असलेल्यांना पळून जाता येणार नाही, आणि योद्ध्यांना निसटून जाता येणार नाही. उत्तरेकडे, फरात नदीच्या किनाऱ्‍यावर,ते अडखळून पडले आहेत.’+  ७  नाईल नदीसारखा हा कोण येतोय? नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा हा कोण येतोय?  ८  नाईल नदीसारखा, नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा येणारा हा इजिप्त आहे.+ तो म्हणतोय: ‘मी चढाई करून जाईन आणि संपूर्ण पृथ्वी झाकून टाकीन. मी शहराचा आणि त्यात राहणाऱ्‍या लोकांचा नाश करून टाकीन.’  ९  घोड्यांनो! पळत सुटा! रथांनो, बेफाम धावा! योद्ध्यांनो, पुढे जा;ढाली हाताळणारे कूश आणि पूट पुढे जा,+धनुर्धारी आणि धनुष्य वाकवणारा+ लूदीम,+ तूसुद्धा पुढे जा. १०  तो दिवस सर्वोच्च प्रभूचा, सैन्यांचा देव यहोवा याचा आहे; त्याच्या शत्रूंचा बदला घेण्याचा, त्यांच्यावर आपला सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार त्यांना खाऊन तृप्त होईल आणि त्यांचं रक्‍त पिऊन ती आपली तहान भागवेल. कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा याने उत्तरेच्या देशात, फरात नदीजवळ बलिदान तयार केलंय.+ ११  हे इजिप्तची कुमारी,तू बाल्सम* घ्यायला गिलादला जा.+ खरंतर, तुझ्यासाठी कोणताही इलाज नाही,+तू उगीचच इतके औषधोपचार करतेस. १२  तुझ्या झालेल्या अपमानाबद्दल सगळ्या राष्ट्रांनी ऐकलंय,+तुझा आक्रोश देशभर ऐकू येतोय. कारण योद्धे एकमेकांमुळे अडखळत आहेत,आणि ते खाली पडत आहेत.” १३  बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर, इजिप्तवर हल्ला करायला येणार होता, त्याच्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+ १४  “इजिप्तमध्ये हे जाहीर करा, मिग्दोलमध्ये+ याची घोषणा करा,नोफ* आणि तहपन्हेस+ यांनाही कळवा. असं म्हणा, ‘आपापल्या जागी तैनात व्हा आणि सज्ज व्हा,कारण तुमच्या आसपासच्या सगळ्या लोकांना तलवार खाऊन टाकणार आहे. १५  तुझे शक्‍तिशाली पुरुष नाहीसे का झालेत? ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,कारण यहोवाने त्यांना ढकलून खाली पाडलंय. १६  त्यांच्यातल्या अडखळून पडणाऱ्‍यांची संख्या फार मोठी आहे. ते एकमेकांना म्हणत आहेत: “चला! या क्रूर तलवारीपासून आपण पळ काढू,आणि आपल्या देशात, आपल्या लोकांकडे परत जाऊ.”’ १७  तिथे ते असं म्हणत आहेत,‘इजिप्तचा राजा फारो, नुसता बाता मारणारा आहे,त्याने हाताशी आलेली संधी गमावली आहे.’+ १८  ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे तो राजा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, की तो* डोंगरांमधल्या ताबोरसारखा,+आणि समुद्राजवळच्या कर्मेलसारखा+ येईल. १९  हे इजिप्तमध्ये राहणारी कुमारी! बंदिवासात जाण्यासाठी आपलं सामान बांध. कारण, नोफची* अवस्था अशी होईल की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल;ते जाळून टाकलं जाईल,* आणि तिथे कोणीही उरणार नाही.+ २०  इजिप्त ही एका सुंदर तरण्या गाईसारखी* असली,तरी उत्तरेकडून डंख मारणाऱ्‍या माश्‍या तिच्याविरुद्ध येतील. २१  तिचे भाडोत्री सैनिक धष्टपुष्ट वासरांसारखे आहेत,पण तेसुद्धा पाठ दाखवून पळून गेले आहेत. ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,+कारण त्यांच्या संकटाचा दिवस त्यांच्यावर कोसळलाय,त्यांच्याकडून हिशोब घ्यायची वेळ आली आहे.’ २२  ‘तिचा आवाज सरसरत, पळून चाललेल्या सापासारखा आहे. कारण ते कुऱ्‍हाडी घेऊन तिच्या मागे येत आहेत;झाडं कापून टाकणाऱ्‍या माणसांसारखे ते पूर्ण ताकदीने तिच्या मागे येत आहेत.’ २३  यहोवा म्हणतो, ‘तिच्या दाट जंगलात कोणी घुसू शकत नसलं,तरी ते येऊन तिचं जंगल तोडून टाकतील. कारण त्यांची संख्या टोळांपेक्षा जास्त आहे;कोणीही ती मोजू शकत नाही. २४  इजिप्तच्या कुमारीला लज्जित केलं जाईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हवाली केलं जाईल.’+ २५  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘आता मी माझं लक्ष नोवरून*+ आमोनकडे+ वळवतोय. मी माझं लक्ष फारोकडे, इजिप्तकडे, तिच्या देवांकडे+ आणि तिच्या राजांकडे वळवतोय; हो, मी माझं लक्ष फारोकडे आणि त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या सगळ्यांकडे वळवतोय.’+ २६  ‘आणि मी त्यांना त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हवाली करीन; मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या आणि त्याच्या सेवकांच्या हवाली करीन.+ पण नंतर मात्र इजिप्तमध्ये पूर्वीसारखीच लोकवस्ती होईल,’ असं यहोवा म्हणतो.+ २७  ‘हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस. आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+ कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,मी तुझ्या वंशजांना* बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+ याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.+ २८  म्हणून हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे,’ असं यहोवा म्हणतो. ‘ज्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुझी पांगापांग केली, त्यांचा मी समूळ नाश करीन;+पण तुझा मात्र मी समूळ नाश करणार नाही.+ मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.*+ पण, मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.’”

तळटीपा

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.
किंवा “मेम्फिस.”
म्हणजे, इजिप्तवर विजय मिळवणारा.
किंवा “मेम्फिसची.”
किंवा कदाचित, “तो ओसाड होईल.”
किंवा “कालवडीसारखी.”
म्हणजे, थीब्ज.
शब्दशः “बीज.”
किंवा “सुधारीन.”