यिर्मया ४८:१-४७

  • मवाबच्या विरोधात भविष्यवाणी (१-४७)

४८  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा, मवाबविषयी+ असं म्हणतो: “अरेरे! पाहा नबोचा+ कसा नाश करण्यात आलाय! किर्याथाईमला+ काबीज करून कसं लज्जित करण्यात आलंय! सुरक्षित आश्रयस्थानाचा* चुराडा झालाय आणि ते लज्जित करण्यात आलंय.+  २  ते आता मवाबची प्रशंसा करत नाहीत. हेशबोनमध्ये+ त्यांनी तिच्या नाशाचा कट रचलाय. ते म्हणतात: ‘चला, आपण या राष्ट्राचं नामोनिशाण मिटवून टाकू.’ हे मदमेन! तूपण शांत बस. कारण तलवार तुझाही पाठलाग करत आहे.  ३  होरानाइममधून आक्रोश ऐकू येतोय.+ कारण त्या नगराचा नाश होऊन ते जमीनदोस्त झालंय.  ४  मवाबला उद्ध्‌वस्त करण्यात आलंय. तिची लहान मुलं रडत आहेत.  ५  लूहीथच्या चढावर चढून जाताना ते सतत अश्रू गाळत आहेत. होरानाइमहून खाली उतरताना त्यांना ओरडण्याचा,संकट कोसळल्यामुळे लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय.+  ६  पळा! आपला जीव वाचवा! ओसाड रानातल्या गंधसरूच्या झाडासारखे व्हा.  ७  हे मवाब! तुला तुझ्या कार्यांवर आणि तुझ्या खजिन्यांवर खूप भरवसा आहे,म्हणून तुलाही काबीज केलं जाईल. तुझा देव कमोश+ बंदिवासात जाईल,तो आपल्या पुजाऱ्‍यांसोबत आणि अधिकाऱ्‍यांसोबत बंदिवासात जाईल.  ८  नाश करणारा येऊन सगळ्या शहरांवर हल्ला करेल,त्याच्या हातून एकही शहर सुटणार नाही.+ खोऱ्‍याचा नाश होईल,आणि सपाट प्रदेशही उद्ध्‌वस्त केला जाईल,यहोवाने म्हटल्याप्रमाणेच घडेल.  ९  मवाबसाठी रस्त्यावर चिन्ह उभारा,कारण तिची शहरं उद्ध्‌वस्त होताच शहरातले लोक पळू लागतील. लोकांना दहशत बसेल अशी तिच्या शहरांची अवस्था होईल,त्यांत कोणीही राहणार नाही.+ १०  यहोवाने दिलेल्या कामात जो हलगर्जीपणा करतो, तो शापित आहे! जो आपली तलवार रक्‍त सांडण्यापासून आवरतो, तो शापित आहे! ११  मवाबी लोक आपल्या तरुणपणापासून सुखात आहेत,गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखे ते आहेत. त्यांना कधीही एका भांड्यातून दुसऱ्‍या भांड्यात ओतण्यात आलं नाही,आणि ते कधीच बंदिवासात गेले नाहीत. म्हणून त्यांची चव आहे तशीच आहे,आणि त्यांचा वासही बदललेला नाही. १२  पण यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा त्यांना उलथून टाकायला मी माणसं पाठवीन. ते त्यांना पालथं करून त्यांची भांडी रिकामी करतील, आणि त्यांच्या मोठमोठ्या मडक्यांचा चुराडा करतील. १३  तेव्हा मवाबचे लोक आपल्या कमोश दैवतामुळे लज्जित होतील; बेथेलमधल्या खोट्या उपासनेवर भरवसा ठेवल्यामुळे इस्राएलचं घराणं जसं लज्जित झालंय, तसं मवाबचे लोक लज्जित होतील.+ १४  तुमची अशी म्हणायची हिंमत तरी कशी झाली, की “आम्ही शूरवीर आहोत आणि युद्धासाठी तयार आहोत”?’+ १५  ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, तो राजा असं म्हणतो,+‘मवाबचा नाश झालाय,तिच्या शहरांवर हल्ला झालाय,+तिथल्या सगळ्यात चांगल्या तरुणांची कत्तल झाली आहे.’+ १६  मवाबच्या लोकांवर लवकरच संकट कोसळेल. त्यांचा नाश वेगाने जवळ येतोय.+ १७  त्यांच्या आसपासच्या लोकांना आणि त्यांचं नाव माहीत असलेल्या लोकांना, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. ते म्हणतील: ‘अरेरे! ही मजबूत छडी, सौंदर्याची काठी कशी मोडली गेली आहे!’ १८  हे दीबोनमध्ये+ राहणाऱ्‍या मुली! आपल्या वैभवावरून खाली उतर आणि तहानलेलीच* बसून राहा. कारण मवाबचा नाश करणारा तुझ्यावर हल्ला करायला आलाय,तो तुझे मजबूत किल्ले धुळीस मिळवेल.+ १९  अरोएरच्या+ रहिवाशा, रस्त्याच्या कडेला उभा राहा आणि बघ. पळून जाणाऱ्‍या माणसाला आणि निसटून जाणाऱ्‍या स्त्रीला विचार, ‘काय झालं?’ २०  मवाबला लज्जित करण्यात आलंय आणि तिला दहशत घालण्यात आली आहे. मोठ्याने रडा, आक्रोश करा. आर्णोनमध्ये+ घोषणा करा, की मवाबचा नाश करण्यात आलाय. २१  देवाने सपाट प्रदेशातल्या नगरांवरही न्यायदंड बजावलाय.+ त्याने होलोन, याहस,+ मेफाथ,+ २२  दीबोन,+ नबो,+ बेथ-दिबलाथाईम, २३  किर्याथाईम,+ बेथ-गामूल, बेथ-मौन,+ २४  करियोथ+ आणि बस्रा या नगरांवर; तसंच, मवाबच्या जवळच्या आणि दूरच्या सगळ्या शहरांवर न्यायदंड बजावलाय. २५  ‘मवाबचं शिंग* तोडण्यात आलंय;त्याचा हात मोडून टाकण्यात आलाय,’ असं यहोवा म्हणतो. २६  ‘मवाब स्वतःला यहोवापेक्षा मोठं समजतोय,+ म्हणून नशा येईपर्यंत त्याला दारू पाजा.+ तो स्वतःच्याच ओकारीत लोळतोय,आणि प्रत्येक जण त्याची थट्टा करतोय. २७  तू इस्राएलची थट्टा करायचास ना?+ तो काय चोरांच्या टोळीत सापडला होता का,म्हणून तू डोकं हालवून त्याची थट्टा करतोस आणि त्याच्याविरुद्ध बोलतोस? २८  मवाबच्या रहिवाशांनो! आपली शहरं सोडून द्या, आणि खडकांमध्ये जाऊन राहा. कडेकपारींमध्ये घरटी करून राहणाऱ्‍या कबुतरांसारखं व्हा.’” २९  “मवाबला किती गर्व आहे, याबद्दल आम्ही ऐकलंय. तो अतिशय घमेंडी आहे. तो किती उद्धट, गर्विष्ठ, मगरूर आणि अहंकारी आहे, याबद्दल आम्ही ऐकलंय.”+ ३०  “यहोवा म्हणतो, ‘मवाब किती रागीट आहे, हे मला माहीत आहे. तो बढाया मारतो, पण त्या पोकळ आहेत. मवाबी लोक काहीही करणार नाहीत. ३१  म्हणून मी मवाबसाठी आक्रोश करीन. मी संपूर्ण मवाबसाठी मोठ्याने रडीन,आणि कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करीन.+ ३२  हे सिब्माच्या+ द्राक्षवेली! मी तुझ्यासाठी रडीन,मी याजेरसाठी+ जितका रडलो, त्यापेक्षा जास्त तुझ्यासाठी रडीन. जोमाने वाढणाऱ्‍या तुझ्या फांद्या समुद्रापलीकडे गेल्या आहेत. त्या समुद्रापर्यंत, याजेरपर्यंत पोहोचल्या आहेत. तुझ्या उन्हाळी फळांची आणि कापणी केलेल्या द्राक्षांची नासधूस करायला नाश करणारा आलाय.+ ३३  फळबागांतून आणि मवाब देशातून,आनंदोत्सवाचा आणि जल्लोषाचा आवाज नाहीसा करण्यात आलाय.+ मी द्राक्षकुंडातून वाहणाऱ्‍या द्राक्षरसाचा प्रवाह बंद केलाय. पुन्हा कधीच कोणी आनंदोत्सव करत द्राक्षं तुडवणार नाही. तिथून आवाज ऐकू येईल, पण तो जल्लोषाचा नसेल.’”+ ३४  “‘हेशबोनपासून+ पार एलालेपर्यंत+ आक्रोश ऐकू येतोय. ते इतक्या मोठ्याने ओरडत आहेत, की त्यांचा आवाज याहसपर्यंत+ ऐकू येतोय. सोअरपासून पार होरानाइम+ आणि एगलाथ-शलि-शीया इथपर्यंत त्यांचा आवाज पोहोचलाय. निम्रीममधले पाण्याचे प्रवाहसुद्धा आटून जातील.’+ ३५  यहोवा म्हणतो, ‘मी मवाबची अशी दशा करीन, की तिथल्या उच्च स्थानावर अर्पणं वाहणारा,आणि आपल्या दैवतासाठी बलिदानं देणारा कोणीही उरणार नाही. ३६  म्हणून मवाबसाठी आणि कीर-हरेसच्या लोकांसाठी,माझं मन बासरीसारखं* शोक करेल.+ त्याने जमा केलेली सगळी धनसंपत्ती नष्ट होईल. ३७  प्रत्येकाने आपल्या डोक्याचं मुंडण केलंय,+आणि आपली दाढी कापून टाकली आहे. प्रत्येकाने आपल्या हातावर घाव केलेत,+आणि कमरेला गोणपाट गुंडाळलंय!’”+ ३८  “‘मवाबच्या सगळ्या घरांच्या छतांवर,आणि तिच्या सगळ्या चौकांमध्ये,फक्‍त शोक केला जातोय. कारण टाकून दिलेल्या मडक्यासारखा मी मवाबचा चुराडा केलाय,’ असं यहोवा म्हणतो. ३९  ‘बघा, ती कशी घाबरली आहे! तिच्यासाठी गळा काढून रडा! बघा, मवाबने कशी लज्जेने आपली पाठ फिरवली आहे! मवाब थट्टेचा विषय बनली आहे,तिची दशा पाहून आसपासचे सगळे लोक घाबरलेत.’” ४०  “कारण यहोवा म्हणतो: ‘पाहा! झडप घालणाऱ्‍या गरुडाप्रमाणे,+शत्रू आपल्या पंखांनी मवाबला झाकून टाकेल.+ ४१  तिच्या नगरांवर कब्जा केला जाईल,तिचे मजबूत किल्ले काबीज केले जातील. त्या दिवशी मवाबच्या शूरवीरांचं हृदय,प्रसूतीच्या वेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखं भीतीने धडधडू लागेल.’” ४२  “‘मवाबचा नाश होईल आणि तो राष्ट्र म्हणून उरणार नाही,+कारण तो स्वतःला यहोवापेक्षा मोठं समजतो.’+ ४३  यहोवा म्हणतो, ‘मवाबच्या रहिवाशांनो! तुमच्यापुढे दहशत, खड्डा आणि सापळा आहे. ४४  जो दहशतीपासून पळेल तो खड्ड्यात पडेल,आणि जो त्या खड्ड्यातून वर येईल, तो सापळ्यात अडकेल.’ यहोवा म्हणतो, ‘कारण मी ठरवलंय त्या वर्षी मी मवाबला शिक्षा करीन. ४५  हेशबोनच्या सावलीत आश्रयासाठी पळून जाणारे हतबल होतील. कारण हेशबोनमधून आग येईल,आणि सीहोनमधून ज्वाला भडकेल.+ ती मवाबचं कपाळ आणि दंगेखोरांच्या मुलांच्या कवट्या भस्म करून टाकेल.’+ ४६  ‘हे मवाब! तुझा धिक्कार असो! कमोशची+ उपासना करणाऱ्‍या लोकांचा नाश झालाय. आणि तुझ्या मुला-मुलींना बंदिवासात नेण्यात आलंय.+ ४७  पण शेवटच्या काळात मी मवाबच्या बंदिवानांना पुन्हा गोळा करीन,’ असं यहोवा म्हणतो. ‘मवाबबद्दलचा न्यायदंडाचा संदेश इथे संपतो.’”+

तळटीपा

किंवा “उंच ठिकाणाचा.”
किंवा कदाचित, “रुक्ष भूमीवरच.”
किंवा “मवाबची ताकद.”
म्हणजे, अंत्यविधीच्या वेळी शोक व्यक्‍त करायला वाजवली जाणारी बासरी.