यिर्मया ४९:१-३९

  • अम्मोनच्या विरोधात भविष्यवाणी (१-६)

  • अदोमच्या विरोधात भविष्यवाणी (७-२२)

    • राष्ट्र म्हणून अदोमचं अस्तित्व नाहीसं होईल (१७, १८)

  • दिमिष्कच्या विरोधात भविष्यवाणी (२३-२७)

  • केदार आणि हासोरच्या विरोधात भविष्यवाणी (२८-३३)

  • एलामच्या विरोधात भविष्यवाणी (३४-३९)

४९  अम्मोनी लोकांबद्दल+ यहोवा असं म्हणतो: “इस्राएलला काय मुलं नाहीत का? त्याला कोणी वारस नाही का? मग मल्कामने+ गादचा ताबा का घेतला?+ आणि त्याचे लोक इस्राएलच्या शहरांमध्ये का राहत आहेत?”  २  “‘म्हणून पाहा!’ यहोवा म्हणतो, ‘असे दिवस येत आहेत,जेव्हा अम्मोनी लोकांच्या+ राब्बाविरुद्ध मी युद्धाची घोषणा करीन.*+ राब्बा उद्ध्‌वस्त झालेली टेकडी होईल,तिची आसपासची नगरं जाळून टाकली जातील. आणि इस्राएलचा जो प्रदेश त्यांनी बळकावला होता, तो प्रदेश इस्राएल त्यांच्याकडून परत मिळवेल.’+ असं यहोवा म्हणतो.  ३  ‘हे हेशबोन! गळा काढून रड. कारण, आय शहराचा नाश झालाय! राब्बाच्या आसपासच्या नगरांनो! मोठ्याने रडा, आणि गोणपाट घाला. आक्रोश करत दगडी मेंढवाड्यांमध्ये इकडे-तिकडे पळा. कारण मल्काम त्याच्या पुजाऱ्‍यांसोबत आणि अधिकाऱ्‍यांसोबत बंदिवासात जाणार आहे.+  ४  हे विश्‍वासघात करणाऱ्‍या मुली! तू तुझ्या खोऱ्‍यांबद्दल* फुशारक्या का मारतेस? भरपूर पाणी असलेल्या तुझ्या सपाट प्रदेशांबद्दल तू बढाया का मारतेस? तू तुझ्या खजिन्यांवर भरवसा ठेवतेस,आणि म्हणतेस: “माझ्या विरोधात कोण येईल?”’”  ५  “पण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो,‘बघ, मी तुझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांकडून तुझ्यावर भयंकर संकट आणतोय. तुझी चारही दिशांना पांगापांग केली जाईल,आणि पळून जाणाऱ्‍यांना कोणीही गोळा करणार नाही.’”  ६  “‘पण नंतर मी अम्मोनी लोकांच्या बंदिवानांना गोळा करीन,’ असं यहोवा म्हणतो.”  ७  अदोमबद्दल सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तेमानमध्ये+ आता कोणी बुद्धिमान राहिला नाही का? समंजस लोकांकडे चांगले सल्ले उरले नाहीत का? त्यांच्या बुद्धीला काय कीड लागली आहे का?  ८  हे ददानच्या+ रहिवाशांनो! मागे फिरा, पळून जा! खोल जागांमध्ये जाऊन राहा. कारण एसावला शिक्षा द्यायची वेळ येईल,तेव्हा मी एसाववर संकट आणीन.  ९  द्राक्षं गोळा करणारे तुझ्याकडे आले,तर ते काही द्राक्षं मागे सोडून जाणार नाहीत का? किंवा रात्री चोर आले, तर त्यांना हवं तेवढं मिळेपर्यंतच ते नासधूस करणार नाहीत का?+ १०  पण एसावचं मात्र मी सगळं काही काढून घेईन. त्याच्या लपण्याची सगळी ठिकाणं मी उघड करीन, म्हणजे तो कुठेही लपू शकणार नाही. त्याच्या सगळ्या मुलाबाळांचा, भाऊबंदांचा आणि शेजाऱ्‍यांचा नाश होईल,+आणि त्याचं नामोनिशाण मिटून जाईल.+ ११  तुझी अनाथ* मुलं माझ्याकडे सोडून दे,म्हणजे मी त्यांना जिवंत ठेवीन. आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवतील.” १२  यहोवा म्हणतो: “ज्यांना क्रोधाचा प्याला प्यायची शिक्षा झाली नाही, त्यांना जर तो प्यावा लागेल, तर मग तू कसा काय शिक्षा झाल्याशिवाय राहशील? तुला शिक्षा होईलच. तुला तो प्याला प्यावाच लागेल.”+ १३  यहोवा म्हणतो, “मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, बस्राची दशा अशी होईल की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ बस्रा उद्ध्‌वस्त होईल, तिची बदनामी होईल आणि ती शापित होईल. तिची सगळी शहरं कायमची उजाड होतील.”+ १४  मला यहोवाकडून एक बातमी मिळाली आहे,राष्ट्रांकडे एका राजदूताला पाठवण्यात आलंय. तो म्हणतो: “सगळे एकत्र या आणि अदोमवर हल्ला करा; युद्धाची तयारी करा.”+ १५  “कारण पाहा! मी तुला राष्ट्रांमध्ये कवडीमोल केलंय,लोक तुला तुच्छ समजतात.+ १६  हे खडकाच्या कपारींमध्ये राहणारी,सगळ्यात उंच टेकडीवर राहणारी, अदोम! तू पसरवलेल्या दहशतीमुळे तुझीच फसवणूक झाली आहे,तुझ्या गर्विष्ठ मनाने तुलाच फसवलंय. तू जरी गरुडासारखं उंच ठिकाणी आपलं घरटं बनवलंस,तरी मी तुला तिथून खाली पाडीन,” असं यहोवा म्हणतो. १७  “अदोमची दशा अशी होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ तिच्या बाजूने जाणारा प्रत्येक जण तिच्यावर आलेल्या पीडा बघून चकित होईल, आणि शिट्टी वाजवून तिची थट्टा करेल. १८  सदोम, गमोरा आणि त्याच्या आसपासच्या नगरांचा नाश झाल्यावर जसं घडलं,+ तसंच अदोमच्या बाबतीत घडेल. तिथे कोणीही राहणार नाही, एकही माणूस तिथे वस्ती करणार नाही,” असं यहोवा म्हणतो.+ १९  “पाहा! यार्देनजवळ असलेल्या दाट जंगलातून जसा सिंह येतो, तसा कोणीतरी येईल.+ तो येऊन अदोमच्या सुरक्षित कुरणांवर हल्ला करेल. आणि एका क्षणात मी त्यांना तिच्यापासून दूर पळायला लावीन. मग ज्याला निवडण्यात आलंय, त्याला मी तिच्यावर नेमीन. कारण माझ्यासारखा दुसरा कोण आहे, आणि कोण मला आव्हान देऊ शकतो? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहू शकतो?+ २०  म्हणून, अहो माणसांनो! यहोवाने अदोमच्या विरोधात काय निर्णय घेतलाय, आणि तेमानच्या+ रहिवाशांबद्दल त्याने कोणता विचार केलाय, तो ऐका: कळपातून छोट्या-छोट्या कोकरांना नक्कीच ओढून नेलं जाईल,त्यांचं राहण्याचं ठिकाण अदोम आणि तेमानच्या लोकांमुळे उद्ध्‌वस्त केलं जाईल.+ २१  त्यांच्या कोसळण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली आहे. सगळीकडे आरडाओरड होत आहे! आणि तो आवाज पार तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचलाय.+ २२  पाहा! गरुड जसा वर उडतो आणि झडप घालतो,+तसा शत्रू झडप घालेल आणि बस्राला आपल्या पंखांनी झाकून टाकेल.+ त्या दिवशी अदोमच्या शूरवीरांचं हृदय,प्रसूतीच्या वेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखं भीतीने धडधडू लागेल.” २३  दिमिष्कबद्दल संदेश:+ “हमाथ+ आणि अर्पाद लज्जित झालेत,कारण त्यांनी वाईट बातमी ऐकली आहे. भीतीने त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. समुद्रात खळबळ माजली आहे. तो शांत होऊ शकत नाही. २४  दिमिष्कचं धैर्य खचलंय. ती पळ काढायला मागे वळली, पण भीतीने तिला ग्रासून टाकलंय. बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीसारखं,दुःखाने आणि वेदनेने तिला घेरलंय. २५  लोक अजूनही स्तुतिपात्र शहर सोडून, आनंदोत्सवाचं नगर सोडून का गेले नाहीत? २६  कारण, त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चौकांमध्ये मरून पडणार आहेत. आणि तिच्या सगळ्या सैनिकांचा नाश होणार आहे,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. २७  “मी दिमिष्कच्या तटबंदीला आग लावीन. त्या आगीत बेन-हदादचे मजबूत बुरूज जळून खाक होतील.”+ २८  बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने केदारला+ आणि हासोरच्या राज्यांना हरवलं होतं, त्यांच्याबद्दल यहोवा असं म्हणतो: “उठा, केदारला जा,आणि पूर्वेकडच्या मुलांचा नाश करून टाका. २९  त्यांचे तंबू आणि कळप लुटा. त्यांच्या तंबूंचं कापड, त्यांचे उंट आणि त्यांचं सगळं सामानसुमान घेऊन जा. लोक म्हणतील, ‘सगळीकडे दहशत आहे!’” ३०  “अहो हासोरच्या रहिवाशांनो! पळून जा! दूर पळून जा! आणि खोल जागांमध्ये जाऊन राहा,” असं यहोवा म्हणतो. “कारण बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने तुमच्याविरुद्ध रणनीती आखली आहे. त्याने तुमच्यावर संकट आणायची योजना केली आहे.” ३१  “उठा, जे राष्ट्र सुखशांतीत आहे, सुरक्षित आहे त्यावर हल्ला करा,” असं यहोवा म्हणतो. “त्या राष्ट्राला दरवाजेही नाहीत आणि अडसरही नाहीत; तिथले लोक सगळ्यांपासून दूर एकटे राहतात. ३२  त्यांचे उंट आणि मोठमोठे कळप लुटले जातील. आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापणाऱ्‍यांची,+मी चारही दिशांना पांगापांग करीन,आणि सगळीकडून त्यांच्यावर संकट आणीन,” असं यहोवा म्हणतो. ३३  “हासोर कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनेल,ती कायमची ओसाड होईल. तिथे कोणीही राहणार नाही,एकही माणूस तिच्यात वस्ती करणार नाही.” ३४  यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला, यिर्मया संदेष्ट्याला एलामबद्दल+ यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३५  “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी एलामच्या शक्‍तीचा स्रोत, त्यांचं धनुष्य मोडून टाकतोय.+ ३६  मी एलामवर आकाशाच्या चार टोकांमधून चार वारे आणीन. आणि या वाऱ्‍यांच्या दिशेने मी एलामच्या लोकांची पांगापांग करीन. असं एकही राष्ट्र उरणार नाही जिथे एलामचे लोक विखुरले जाणार नाहीत.’” ३७  “एलामच्या लोकांचा मी त्यांच्या शत्रूंपुढे आणि त्यांच्या जिवावर टपलेल्या लोकांपुढे चुराडा करून टाकीन. मी त्यांच्यावर संकट आणीन, माझा जळजळीत क्रोध त्यांच्यावर भडकेल,” असं यहोवा म्हणतो. “जोपर्यंत मी त्यांचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत मी त्यांच्यामागे तलवार पाठवीन.” ३८  “मी एलाममध्ये माझं राजासन मांडीन,+ आणि तिथल्या राजाचा आणि अधिकाऱ्‍यांचा नाश करीन,” असं यहोवा म्हणतो. ३९  “पण, शेवटच्या काळात मी एलामच्या बंदिवानांना पुन्हा गोळा करीन,” असं यहोवा म्हणतो.

तळटीपा

किंवा कदाचित, “त्यांना युद्धाची घोषणा ऐकायला लावीन.”
किंवा “वडील नसलेली.”
किंवा “कल्ले.”