यिर्मया ५:१-३१

  • यहोवाने शिक्षा केली, पण लोकांनी त्यातून धडा घेतला नाही (१-१३)

  • नाश केला, पण पूर्णपणे नाही (१४-१९)

  • यहोवा लोकांकडून हिशोब घेतो (२०-३१)

 यरुशलेमच्या रस्त्यांवरून फिरा,आजूबाजूला लक्ष देऊन पाहा,तिच्या सगळ्या चौकांमध्ये शोधा,न्यायाने वागणारा आणि विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करणारा एकतरी माणूस तिच्यात सापडतो का ते पाहा;+एक जरी सापडला तर मी तिला माफ करीन.  २  “यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं जरी ते म्हणत असले,तरी त्यांची शपथ खोटीच आहे.+  ३  हे यहोवा, तुझे डोळे नेहमी विश्‍वासू लोकांना शोधत नाहीत का?+ तू तुझ्या लोकांना शिक्षा केलीस, पण त्यांना काहीच फरक पडला नाही.* तू त्यांचा जवळजवळ नाशच केला, तरी त्यांनी त्यातून धडा घेतला नाही.+ उलट त्यांनी आपली तोंडं खडकापेक्षा कठीण केली,+आणि ते आपल्या मार्गापासून फिरले नाहीत.+  ४  पण मी मनात म्हणालो: “हे सामान्य लोक आहेत. ते मूर्खांसारखे वागतात कारण त्यांना यहोवाचे मार्ग माहीत नाहीत;त्यांना आपल्या देवाचे नीती-नियम माहीत नाहीत.  ५  म्हणून मी प्रतिष्ठित माणसांकडे जाऊन त्यांच्याशी बोलतो,कारण त्यांनी नक्कीच यहोवाच्या मार्गाची दखल घेतली असेल;त्यांना देवाचे नीती-नियम नक्कीच माहीत असतील.+ पण, या सगळ्यांनी आपलं जोखड मोडून टाकलं होतं,आणि आपली बंधनं झुगारून दिली होती.”  ६  त्यामुळेच जंगलातला सिंह त्यांच्यावर हल्ला करतो,रानातला लांडगा त्यांना फाडत राहतो,आणि त्यांच्यावर हल्ला करायला चित्ता शहरांजवळ टपून बसतो. त्या शहरांतून बाहेर पडणाऱ्‍या प्रत्येकाचे तुकडे-तुकडे केले जातात. कारण त्यांनी खूप अपराध केले आहेत,आणि ते फार अविश्‍वासूपणे वागले आहेत.+  ७  या सगळ्यासाठी मी तुला कसं माफ करू? तुझ्या मुलांनी मला सोडून दिलंय,आणि जे मुळात देव नाहीत, त्यांच्या नावाने ते शपथ घेतात.+ मी त्यांच्या गरजा भागवल्या,पण ते व्यभिचार करत राहिले,आणि झुंडीने वेश्‍येच्या घराकडे जात राहिले.  ८  ते उत्तेजित झालेल्या घोड्यांसारखे,लैंगिक इच्छा तीव्र झालेल्या घोड्यांसारखे आहेत;प्रत्येक जण दुसऱ्‍याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.+  ९  “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का? या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का?” असं यहोवा म्हणतो.+ १०  “उतारांवरच्या तिच्या द्राक्षमळ्यांवर हल्ला करून त्यांची नासधूस करा,पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका.+ तिच्या कोवळ्या फांद्या छाटून टाका,कारण त्या यहोवाच्या नाहीत. ११  कारण इस्राएलच्या घराण्याने आणि यहूदाच्या घराण्याने,माझा खूप मोठा विश्‍वासघात केलाय,” असं यहोवा म्हणतो.+ १२  “त्यांनी यहोवाला नाकारलंय,आणि ते सारखं असं बोलत असतात: ‘तो काहीच करणार नाही,*+आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही,आपल्या वाट्याला कधीच युद्ध किंवा दुष्काळ येणार नाही.’+ १३  संदेष्ट्यांच्या हृदयात देवाचं वचन नाही,ते पोकळ गोष्टी बोलतात. त्यांच्या पोकळ गोष्टींसारखंच तेही नाहीसे होतील.” १४  म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “हे लोक असं बोलतात म्हणून पाहा! तुझ्या मुखातून निघणारे माझे शब्द मी आगीसारखे करतोय,+आणि या लोकांना मी लाकडासारखं बनवतोय. तुझ्या मुखातली आग त्यांना भस्म करून टाकेल.”+ १५  यहोवा म्हणतो, “हे इस्राएलच्या घराण्या, पाहा! मी एका दूरच्या राष्ट्राला तुझ्यावर हल्ला करायला आणतोय.+ ते बऱ्‍याच वर्षांपासून अस्तित्वात असलेलं एक प्राचीन राष्ट्र आहे. त्यांची भाषा तुला येत नाही,आणि त्यांची बोली तुला समजत नाही.+ १६  ते सगळे शूर योद्धे आहेत;त्यांच्या बाणांचा भाता उघड्या कबरेसारखा आहे. १७  ते तुझं सगळं पीक आणि भाकर खाऊन टाकतील.+ ते तुझ्या मुला-मुलींना मारून टाकतील. तुझ्या कळपांचा आणि गुराढोरांचा,तुझ्या द्राक्षवेलींचा आणि अंजिराच्या झाडांचा ते नाश करतील. ज्या तटबंदी शहरांवर तुझा भरवसा आहे, त्यांचाही ते तलवारीने नाश करतील.” १८  यहोवा म्हणतो, “पण तेव्हासुद्धा मी तुमचा पूर्णपणे नाश होऊ देणार नाही.+ १९  आणि जेव्हा ते असं विचारतील, की ‘आमचा देव यहोवा याने आमच्यासोबत हे सगळं का घडू दिलं?’ तेव्हा तू त्यांना सांग, ‘तुम्ही जसं मला सोडून तुमच्या देशात परक्या देवाची सेवा केली, तशी आता तुम्ही परक्या देशात विदेशी लोकांची सेवा कराल.’”+ २०  याकोबच्या घराण्यात ही गोष्ट जाहीर करा,आणि यहूदात अशी घोषणा करा: २१  “मूर्ख आणि अक्कलशून्य लोकांनो, ऐका!+ तुम्हाला डोळे आहेत, पण तुम्ही पाहू शकत नाहीत;+तुम्हाला कान आहेत, पण तुम्ही ऐकू शकत नाहीत.+ २२  यहोवा म्हणतो, ‘तुम्हाला माझी जराही भीती वाटत नाही का? खरंतर तुम्ही माझ्यासमोर थरथर कापायला हवं. मी वाळूला समुद्राची सीमा म्हणून नेमलंय,समुद्राने ती ओलांडू नये, म्हणून मी वाळूला कायम तिथे राहायचा नियम लावून दिलाय. समुद्राच्या लाटा कितीही उसळल्या, तरी त्यांचं काही चालत नाही,त्यांनी कितीही गर्जना केली, तरी त्या सीमा पार करू शकत नाही.+ २३  पण या लोकांचं मन हट्टी आणि बंडखोर आहे;त्यांनी मला सोडून दिलंय आणि ते स्वतःच्या मार्गाने चालत आहेत.+ २४  ते आपल्या मनात असं म्हणत नाहीत: “आता आपण आपला देव यहोवा याचं भय बाळगू या,तोच आपल्याला योग्य वेळी पाऊस देतो,पानझडीचा आणि वसंत ऋतूचा पाऊस तोच आपल्याला देतो. आणि तोच आपल्यासाठी कापणीचे आठवडे राखून ठेवतो.”+ २५  तुमच्या स्वतःच्या अपराधांमुळेच तुम्हाला या गोष्टी लाभल्या नाहीत. तुमच्या स्वतःच्या पापांनीच तुम्हाला चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवलंय.+ २६  कारण माझ्या लोकांमध्ये काही दुष्ट माणसं आहेत. टपून बसणाऱ्‍या फासेपारध्यांप्रमाणे ते नजर ठेवून असतात. ते जीवघेणा सापळा लावतात,आणि माणसांची शिकार करतात. २७  पक्ष्यांनी भरलेल्या पिंजऱ्‍यासारखी,त्यांची घरं लुटीच्या मालाने भरली आहेत.+ आणि त्यामुळे ते श्रीमंत आणि ताकदवान झाले आहेत. २८  ते खाऊनपिऊन लठ्ठ झाले आहेत आणि त्यांची त्वचा तुकतुकीत झाली आहे. दुष्टपणा त्यांच्यातून ओसंडून वाहतो. आपला फायदा व्हावा म्हणून,ते अनाथ मुलांना* न्याय देत नाहीत;+आणि गरिबांनासुद्धा ते न्याय नाकारतात.’”+ २९  यहोवा म्हणतो, “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का? या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का? ३०  देशात काहीतरी धक्कादायक आणि भयंकर घडलंय: ३१  संदेष्टे खोट्या भविष्यवाण्या करतात,+याजक इतरांवर अधिकार गाजवतात,आणि हे सगळं माझ्या लोकांना आवडतं.+ पण अंत येईल तेव्हा तुम्ही काय कराल?”

तळटीपा

शब्दशः “ते कमजोर झाले नाहीत.”
किंवा कदाचित, “तो अस्तित्वात नाही.”
किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”