यिर्मया ५०:१-४६

  • बाबेलच्या विरोधात भविष्यवाणी (१-४६)

    • बाबेलमधून पळ काढा ()

    • इस्राएलला परत आणलं जाईल (१७-१९)

    • बाबेलचे जलाशय सुकून जातील (३८)

    • बाबेलमध्ये कोणीच राहणार नाही (३९, ४०)

५०  यहोवाने बाबेलबद्दल, म्हणजे खास्दी लोकांच्या देशाबद्दल यिर्मया संदेष्ट्याकडून दिलेला संदेश असा:+  २  “राष्ट्रांमध्ये घोषणा करा आणि जाहीर करा;निशाणी म्हणून झेंडा उभारा आणि जाहीर करा. काहीही लपवू नका! असं म्हणा, ‘बाबेलवर कब्जा करण्यात आलाय.+ बेल दैवताला लज्जित करण्यात आलंय.+ मरोदख दैवताचा थरकाप उडालाय. बाबेलमधल्या मूर्तींना लज्जित करण्यात आलंय. तिच्यातल्या घृणास्पद मूर्तींचा* भीतीने थरकाप उडालाय.’  ३  कारण उत्तरेकडच्या एका राष्ट्राने तिच्यावर हल्ला केलाय.+ त्याने तिच्या देशाची अशी अवस्था केली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते;तिच्यात कोणीही वस्ती करत नाही. माणसांनी आणि प्राण्यांनी तिथून पळ काढलाय;ते सगळे पळून गेले आहेत.” ४  यहोवा म्हणतो: “त्या दिवसांत आणि त्या काळात, इस्राएलचे लोक आणि यहूदाचे लोक एकत्र जमून येतील.+ ते सगळे रडत येतील+ आणि सोबत मिळून आपला देव यहोवा याला शोधतील.+ ५  ते सीयोनकडे तोंड करतील आणि तिकडे जायचा रस्ता विचारतील.+ ते म्हणतील, ‘चला, आपण यहोवासोबत एक करार करून त्याला जडून राहू; एक असा करार करू जो कायम राहील आणि कधीही विसरला जाणार नाही.’+ ६  माझे लोक हरवलेल्या मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत.+ त्यांच्या मेंढपाळांमुळेच ते भरकटले आहेत.+ त्यांनी त्यांना दूर डोंगरांमध्ये नेलं; कधी डोंगरांवर, तर कधी टेकड्यांवर भटकायला लावलं. ते आपलं विसाव्याचं ठिकाण विसरून गेलेत. ७  ज्या कोणाला ते सापडले त्यांनी त्यांना फाडून खाल्लं.+ आणि त्यांचे शत्रू म्हणाले, ‘यात आमची काही चूक नाही. त्यांनीच यहोवाविरुद्ध पाप केलंय. त्यांनी त्यांचं नीतिमत्त्वाचं निवासस्थान आणि त्यांच्या पूर्वजांची आशा असलेल्या यहोवाविरुद्ध पाप केलंय.’”  ८  “बाबेलमधून पळ काढा,खास्दी लोकांच्या देशातून बाहेर निघा,+कळपापुढे चालणारे बकरे आणि एडके यांच्यासारखे व्हा.  ९  कारण उत्तरेकडच्या देशातून मी मोठमोठ्या राष्ट्रांचा एक जमाव उभारतोय,आणि त्यांना बाबेलवर हल्ला करायला आणतोय.+ सैन्यदल रचून ते तिच्यावर हल्ला करतील;तिथून ते तिला काबीज करतील. त्यांचे बाण योद्ध्यांच्या बाणांसारखे आहेत,त्यांमुळे मुलं आईवडिलांपासून हिरावली जातील;+त्यांचा नेम कधीच चुकत नाही. १०  खास्दी लोकांचा देश लुटला जाईल.+ तिला लुटणारे सगळे तृप्त होतील,”+ असं यहोवा म्हणतो. ११  “कारण माझा वारसा, माझा देश लुटताना,+तुम्ही आनंदोत्सव आणि जल्लोष करत होता;+तुम्ही तरण्या गाईसारखं* गवतावर आनंदाने बागडत होता,आणि घोड्यांसारखे खिंकाळत होता. १२  तुमची आई लज्जित झाली आहे.+ तुम्हाला जन्म देणारी निराश झाली आहे. पाहा! राष्ट्रांमध्ये तिची किंमत सगळ्यात कमी आहे,ती पाणी नसलेल्या ओसाड रानासारखी आणि वाळवंटासारखी आहे.+ १३  यहोवाचा क्रोध तिच्यावर भडकल्यामुळे तिच्यात कधीही लोकवस्ती होणार नाही;+ती पूर्णपणे उजाड होईल.+ बाबेलजवळून जाणारा प्रत्येक जण तिची अवस्था पाहून चकित होईल,आणि तिच्यावर आलेल्या सगळ्या पीडांमुळे तो शिट्टी वाजवून तिची थट्टा करेल.+ १४  धनुष्य चालवणाऱ्‍यांनो,सैन्यदल रचून चारही बाजूंनी बाबेलवर हल्ला करा. तिच्यावर बाणांचा मारा करा, एकही बाण राखून ठेवू नका.+ कारण तिने यहोवाविरुद्ध पाप केलंय.+ १५  चारही बाजूंनी तिच्याविरुद्ध युद्धाच्या घोषणा करा. तिने हार मानली आहे. तिचे खांब कोसळून पडलेत आणि तिच्या भिंती पाडण्यात आल्यात.+ कारण यहोवाने तिच्यावर सूड उगवलाय.+ तुम्ही तिचा बदला घ्या,ती तुमच्याशी जसं वागली, तसंच तिच्याशी वागा.+ १६  बाबेलमधून पेरणी करणाऱ्‍याचा,आणि कापणीच्या वेळी विळा चालवणाऱ्‍याचा नाश करा.+ त्या क्रूर तलवारीमुळे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे परत जाईल,प्रत्येक जण आपल्या देशात पळून जाईल.+ १७  इस्राएलचे लोक भरकटलेली मेंढरं आहेत.+ सिंहांनी त्यांची पांगापांग केली आहे.+ आधी अश्‍शूरच्या राजाने त्यांना फाडून खाल्लं,+ मग बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने त्यांची हाडं चावून खाल्ली.+ १८  म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘मी अश्‍शूरच्या राजाला जशी शिक्षा केली,+ तशीच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशालाही करीन. १९  आणि इस्राएलला मी परत त्याच्या कुरणात घेऊन येईन.+ तो कर्मेल आणि बाशानवर चरेल.+ एफ्राईम+ आणि गिलादच्या डोंगरांवर+ त्याचा जीव तृप्त होईल.’” २०  यहोवा म्हणतो, “त्या दिवसांत आणि त्या काळात,इस्राएलमध्ये दोष आणि यहूदामध्ये पाप शोधूनसुद्धा सापडणार नाही. कारण ज्यांना मी जिवंत राहू देईन, त्यांना मी क्षमा करीन.”+ २१  यहोवा म्हणतो, “मराथाईमच्या देशावर आणि पकोडच्या+ रहिवाशांवर हल्ला कर. त्यांची कत्तल करून त्यांचा समूळ नाश कर. मी तुला सांगितलंय ते सगळं कर. २२  देशात युद्धाचा, एक भयंकर संकट कोसळल्याचा आवाज येतोय. २३  पाहा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांचा चुराडा करणारा हातोडा कसा मोडून-तोडून टाकण्यात आलाय!+ पाहा! सगळ्या राष्ट्रांमध्ये बाबेलची कशी दशा झाली आहे! ती बघून सगळ्यांना दहशत बसते.+ २४  हे बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि त्यात तू अडकलीस. तुला ते कळलंसुद्धा नाही. तू यहोवाचा विरोध केलास,म्हणून तुला शोधून पकडण्यात आलं.+ २५  यहोवाने आपल्या शस्त्रांचं भांडार उघडलंय. त्यातून त्याने आपल्या क्रोधाची शस्त्रं बाहेर काढलीत.+ कारण सर्वोच्च प्रभूला, सैन्यांचा देव यहोवा याला,खास्दी लोकांच्या देशात एक काम पूर्ण करायचंय. २६  दूरदूरच्या ठिकाणांहून तिच्यावर हल्ला करायला या.+ तिची धान्यांची कोठारं उघडा,+धान्यांच्या ढिगाऱ्‍यासारखा तिचा ढिग लावा. तिचा पूर्णपणे नाश करा.+ तिच्यातल्या एकालाही सोडू नका. २७  तिच्या सगळ्या तरण्या बैलांना मारून टाका,+त्या सगळ्यांना कत्तल होण्यासाठी पाठवून द्या. त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांच्याकडून हिशोब घ्यायचा दिवस जवळ आलाय. २८  बाबेलमधून पळून जाणाऱ्‍यांचा आवाज येतोय,तिथून निसटून जाणाऱ्‍यांचा आवाज कानी पडतोय;आपला देव यहोवा याने सूड उगवलाय,त्याने आपल्या मंदिरासाठी बदला घेतलाय,+ही गोष्ट सीयोनमध्ये जाहीर करण्यासाठी पळणाऱ्‍यांचा आवाज ऐकू येतोय. २९  बाबेलवर हल्ला करायला तिरंदाजांना बोलावून घ्या,धनुष्य चालवणाऱ्‍या सगळ्यांना बोलावून घ्या.+ तिला चारही बाजूंनी घेरा; तिच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका. तिने केलेल्या कामांची तिला परतफेड करा.+ तिने जसं केलं, तसंच तिचंही करा.+ कारण ती इस्राएलच्या पवित्र देवाविरुद्ध,यहोवाविरुद्ध मगरूरपणे वागली आहे.+ ३०  म्हणून तिचे सगळे तरुण चौकांत मरून पडतील,+तिच्या सगळ्या सैनिकांचा त्या दिवशी नाश होईल,” असं यहोवा म्हणतो. ३१  सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “हे बंडखोर बाबेल!+ बघ, मी तुझ्या विरोधात आहे.+ कारण तुझा न्याय करण्याचा दिवस येईल;मी तुझ्याकडून हिशोब घेईन ती वेळ नक्की येईल. ३२  हे बंडखोर बाबेल, तू अडखळून पडशील,आणि तुला उचलायला कोणीही नसेल.+ मी तुझ्या शहरांना आग लावीन,आणि त्यात तुझ्या आजूबाजूला असलेलं सगळं काही जळून खाक होईल.” ३३  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “इस्राएल आणि यहूदाच्या लोकांवर जुलूम होत आहेत,ज्यांनी त्यांना बंदी बनवून नेलंय, त्यांनी त्यांना अजूनपर्यंत सोडलेलं नाही.+ ते त्यांना जाऊ द्यायला तयार नाहीत.+ ३४  पण, त्यांचा सोडवणारा शक्‍तिशाली आहे.+ सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.+ तो नक्कीच त्यांच्या बाजूने खटला लढेल,+म्हणजे त्यांच्या देशाला विश्रांती मिळेल,+आणि बाबेलच्या रहिवाशांमध्ये खळबळ माजेल.”+ ३५  यहोवा म्हणतो, “खास्दी लोकांवर तलवार चालवली जाईल;बाबेलचे रहिवासी, तिचे अधिकारी आणि तिचे बुद्धिमान लोक या सगळ्यांवर,तलवार चालवली जाईल.+ ३६  पोकळ गोष्टी बोलणाऱ्‍यांवर* तलवार चालवली जाईल आणि ते वेड्यांसारखे वागतील. तिच्या योद्ध्यांवर तलवार चालवली जाईल आणि ते भीतीने थरथर कापतील.+ ३७  त्यांच्या घोड्यांवर, युद्ध-रथांवर आणि तिच्यात राहणाऱ्‍या सर्व विदेश्‍यांवर तलवार चालवली जाईल. ते सगळे एखाद्या घाबरलेल्या स्त्रीसारखे होतील.+ तिच्या खजिन्यांवर तलवार चालेल आणि ते सगळे लुटले जातील.+ ३८  तिचे सगळे जलाशय नष्ट होतील, आणि त्यांचं पाणी आटून जाईल.+ कारण बाबेल देश कोरीव मूर्तींनी भरून गेलाय,+आणि भयभीत करणारे दृष्टान्त बघितल्यामुळे तिथले लोक वेड्यांसारखे वागतात. ३९  म्हणून, तिथे वाळवंटातले प्राणी आणि ओरडणारे प्राणी सोबत राहतील,आणि शहामृग तिच्यात वस्ती करतील.+ पुन्हा कधीच तिच्यामध्ये लोकवस्ती होणार नाही,पिढ्या न्‌ पिढ्या कोणीही तिच्यात राहणार नाही.”+ ४०  यहोवा म्हणतो, “सदोम, गमोरा आणि त्याच्या आसपासच्या नगरांचा+ देवाने नाश केल्यावर जसं घडलं,+ तसंच बाबेलच्या बाबतीतही घडेल. तिथे कोणीही राहणार नाही, एकही माणूस तिथे वस्ती करणार नाही.+ ४१  पाहा! उत्तरेकडून लोक येतील;पृथ्वीच्या सगळ्या दुर्गम भागांतून,+एक मोठं राष्ट्र आणि महान राजे उठतील.+ ४२  ते धनुष्य आणि बरची* चालवणारे आहेत.+ ते क्रूर आहेत आणि कोणावरही दयामाया करत नाहीत.+ ते घोड्यांवर स्वार होऊन येतात, तेव्हा त्यांचा आवाज खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेसारखा वाटतो.+ हे बाबेलच्या मुली! ते सगळे एक होऊन, सैन्यदल रचून तुझ्यावर हल्ला करायला सज्ज आहेत.+ ४३  बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल ऐकलंय,+आणि ते ऐकून त्याचे हातपाय गळून गेले आहेत.+ तो भीतीने आणि चिंतेने ग्रासून गेलाय,बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीसारख्या त्याला वेदना होत आहेत. ४४  पाहा! यार्देनजवळ असलेल्या दाट जंगलातून जसा सिंह येतो, तसा कोणीतरी येईल. तो येऊन बाबेलच्या सुरक्षित कुरणांवर हल्ला करेल. आणि एका क्षणात मी त्यांना तिच्यापासून दूर पळायला लावीन. मग ज्याला निवडण्यात आलंय, त्याला मी तिच्यावर नेमीन.+ कारण माझ्यासारखा दुसरा कोण आहे, आणि कोण मला आव्हान देऊ शकतो? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहू शकतो?+ ४५  म्हणून, अहो माणसांनो! यहोवाने बाबेलच्या विरोधात काय निर्णय घेतलाय,+ आणि खास्दी लोकांच्या देशाविरुद्ध त्याने कोणता विचार केलाय, तो ऐका: कळपातून छोट्या-छोट्या कोकरांना नक्कीच ओढून नेलं जाईल. त्यांचं राहण्याचं ठिकाण बाबेलच्या लोकांमुळे, खास्दी लोकांमुळे उद्ध्‌वस्त केलं जाईल.+ ४६  बाबेलवर कब्जा करण्यात येईल, तेव्हा इतका मोठा आवाज होईल, की त्यामुळे पृथ्वी हादरून जाईल,आणि राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये तिच्या किंकाळ्या ऐकू येतील.”+

तळटीपा

इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
किंवा “कालवडीसारखं.”
किंवा “खोट्या संदेष्ट्यांवर.”
म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.