यिर्मया ५२:१-३४
५२ सिद्कीया+ राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्या यिर्मयाची मुलगी होती.
२ यहोयाखीनप्रमाणेच सिद्कीया यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+
३ यरुशलेममध्ये आणि यहूदामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता; आणि शेवटी त्याने त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करून टाकलं.+ पुढे सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+
४ सिद्कीया राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला. त्यांनी येऊन शहरासमोर छावणी दिली आणि वेढा घालण्यासाठी शहराभोवती भिंत उभारली.+
५ शहराला पडलेला हा वेढा, सिद्कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षापर्यंत राहिला.
६ मग चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी,+ शहरातला दुष्काळ भयंकर वाढला होता आणि लोकांकडे खायला काहीही उरलं नव्हतं.+
७ शेवटी, शहराच्या भिंतीचा काही भाग पाडण्यात आला. आणि खास्दी लोकांनी शहराला वेढा घातलेला असताना, शहरातले सर्व सैनिक राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून रातोरात पळून गेले. ते अराबाकडे जाणाऱ्या रस्त्याने पळाले.+
८ पण खास्दी लोकांच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्याला गाठलं.+ तेव्हा राजाचे सर्व सैनिक त्याला सोडून इकडे-तिकडे पळून गेले.
९ मग त्यांनी राजाला कैद करून हमाथ देशातल्या रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आणलं; तिथे त्याने त्याला शिक्षा सुनावली.
१० मग बाबेलच्या राजाने रिब्लामध्ये सिद्कीयासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं. तसंच, त्याने यहूदाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचीही तिथे कत्तल केली.
११ नंतर बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे फोडले+ आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला आणलं. तिथे सिद्कीया मरेपर्यंत कैदेतच राहिला.
१२ मग पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या शासनकाळाच्या १९ व्या वर्षी, नबुजरदान यरुशलेममध्ये आला;+ तो बाबेलच्या राजाचा सेवक असून त्याच्या रक्षकांचा प्रमुख होता.
१३ त्याने यरुशलेममधलं यहोवाचं मंदिर, राजाचा महाल आणि तिथली सगळी घरं जाळून टाकली.+ तसंच, त्याने तिथल्या प्रत्येक प्रतिष्ठित माणसाचं घरही जाळून टाकलं.
१४ मग रक्षकांच्या प्रमुखासोबत असलेल्या खास्द्यांच्या सैन्याने यरुशलेमभोवती असलेली तटाची भिंत पाडून टाकली.+
१५ रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने काही गोरगरिबांना आणि शहरात उरलेल्या लोकांना बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने बाबेलच्या राजाच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि शहरात उरलेल्या कुशल कारागिरांनाही बंदी बनवून नेलं.+
१६ पण देशात उरलेल्या काही गरीब व कंगाल लोकांना मात्र त्याने द्राक्षमळ्यांत काम करण्यासाठी आणि सक्तीची मजुरी करण्यासाठी मागे ठेवलं.+
१७ खास्दी लोकांनी यहोवाच्या मंदिरात असलेले तांब्याचे स्तंभ+ फोडून त्यांचे तुकडे-तुकडे केले. तसंच, त्यांनी यहोवाच्या मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्या+ आणि तांब्याचा गंगाळ-सागर+ यांचेही तुकडे-तुकडे करून टाकले. त्यानंतर हे सगळं तांबं घेऊन ते बाबेलला गेले.+
१८ याशिवाय, मंदिरात वापरले जाणारे प्याले,+ फावडी, आग विझवायच्या कातरी, कटोरे,+ राख काढायच्या बादल्या आणि सर्व तांब्याची भांडी ते घेऊन गेले.
१९ तसंच, गंगाळं,+ धूप जाळण्याची पात्रं, कटोरे, राख काढायच्या बादल्या, दीपवृक्ष,*+ प्याले, इतर कटोरे आणि शुद्ध सोन्या-चांदीचं+ होतं नव्हतं तेवढं सगळं रक्षकांचा प्रमुख घेऊन गेला.
२० शलमोन राजाने यहोवाच्या मंदिरासाठी जे दोन स्तंभ, तांब्याच्या गाड्या, गंगाळ-सागर आणि त्याखाली असलेले तांब्याचे १२ बैल बनवले होते,+ त्या सगळ्यांच्या तांब्याचं वजन इतकं होतं की ते मोजताही येत नव्हतं.
२१ मंदिरातल्या दोन स्तंभांपैकी प्रत्येक स्तंभ १८ हात* उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.+ स्तंभाची जाडी चार बोटं* होती, आणि तो पोकळ होता.
२२ त्यावर पाच हात उंचीचा तांब्याचा कळस होता.+ कळसाभोवती असलेली जाळी व डाळिंबांची नक्षीसुद्धा तांब्याची होती. दुसरा स्तंभही असाच होता.
२३ कळसाच्या सर्व बाजूंवर ९६ डाळिंबं होती; कळसाभोवती असलेल्या जाळीला एकूण १०० डाळिंबं होती.+
२४ रक्षकांच्या प्रमुखाने मुख्य याजक सराया,+ सहायक याजक सफन्या+ आणि तीन द्वारपाल+ यांनाही बंदी बनवून नेलं.
२५ तसंच, त्याने सैनिकांवर अधिकारी असलेल्या दरबाऱ्याला आणि शहरात असलेल्या राजाच्या सात खास सल्लागारांनाही बंदी बनवून नेलं; याशिवाय, देशातल्या सैन्याची जमवाजमव करणाऱ्या सेनापतीच्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या ६० सामान्य माणसांनाही तो घेऊन गेला.
२६ या सगळ्यांना घेऊन रक्षकांचा प्रमुख नबुजरदान हा रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आला.
२७ तेव्हा, बाबेलच्या राजाने त्या सर्वांना हमाथ देशातल्या रिब्ला+ इथे मारून टाकलं. अशा प्रकारे, यहूदाच्या लोकांना त्यांच्या देशातून कैद करून बंदिवासात नेण्यात आलं.+
२८ नबुखद्नेस्सरने आपल्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी ३,०२३ यहुदी लोकांना बंदी बनवून नेलं.+
२९ नबुखद्नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी+ ८३२ लोकांना यरुशलेममधून बंदी बनवून नेण्यात आलं.
३० आणि नबुखद्नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या २३ व्या वर्षी, रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने ७४५ यहुदी लोकांना बंदिवासात नेलं.+
अशा प्रकारे एकूण ४,६०० लोक बंदिवासात गेले.
३१ यहूदाचा राजा यहोयाखीन+ याच्या बंदिवासाच्या ३७ व्या वर्षी, अवील-मरोदख हा बाबेलचा राजा बनला. त्याच वर्षाच्या १२ व्या महिन्याच्या २५ व्या दिवशी त्याने यहोयाखीनची सुटका केली आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढलं.+
३२ अवील-मरोदखने त्याला चांगली वागणूक दिली आणि त्याला बाबेलमधल्या इतर राजांपेक्षा जास्त मानाचं पद दिलं.
३३ यहोयाखीनने आपले तुरुंगातले कपडे बदलले आणि तो आयुष्यभर बाबेलच्या राजासोबत त्याच्या मेजावर जेवू लागला.
३४ यहोयाखीन जिवंत होता तोपर्यंत बाबेलचा राजा त्याला दररोज अन्न पुरवत राहिला; मरेपर्यंत त्याला राजाकडून अन्न मिळत राहिलं.
तळटीपा
^ एक प्रकारची समई.