यिर्मया ६:१-३०

  • यरुशलेमला लवकरच वेढा पडेल (१-९)

  • यरुशलेमवर यहोवाचा क्रोध (१०-२१)

    • काहीही बरोबर नसताना, ‘सगळं ठीक आहे!’ असं ते म्हणतात (१४)

  • उत्तरेकडून क्रूर लोकांचा हल्ला (२२-२६)

  • यिर्मया धातूची पारख करणाऱ्‍यासारखा (२७-३०)

 हे बन्यामीनच्या मुलांनो, यरुशलेमपासून दूर कुठेतरी आश्रय घ्या. तकोवामध्ये+ रणशिंग फुंका,+बेथ-हक्करेममध्ये निशाणी म्हणून आग पेटवा! कारण उत्तरेकडून एक मोठं संकट येत आहे,एक मोठा विनाश तिथून येत आहे.+  २  सीयोनची मुलगी एका नाजूक, सुंदर स्त्रीसारखी आहे.+  ३  मेंढपाळ आपले कळप घेऊन येतील. ते तिच्या सभोवती आपले तंबू ठोकतील,+आणि प्रत्येक मेंढपाळ तिथे आपला कळप चारेल.+  ४  “तिच्याशी युद्ध करायची तयारी करा! चला, आपण भरदुपारी तिच्यावर हल्ला करू!” “अरेरे! पण दिवस तर मावळत आलाय,आणि अंधार होऊ लागलाय!”  ५  “मग चला, आपण रात्री तिच्यावर हल्ला करू,आणि तिचे तटबंदी मनोरे* पाडून टाकू.”+  ६  कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “यरुशलेमवर हल्ला करायला झाडं कापा आणि त्यांपासून तिच्याभोवती चढ तयार करा.+ या शहराकडून हिशोब घेतला जाईल;कारण जाच-जुलमाशिवाय तिच्यात काहीच नाही.+  ७  विहिरीतून जसं नेहमी ताजं* पाणी येत राहतं,तसं या नगरीत नेहमी दुष्टपणाची नवनवीन कामं घडत राहतात. तिच्यातून हिंसेचा आणि नाशाचा आवाज ऐकू येतो;+तिथे मला सतत रोगराई आणि पीडा दिसते.  ८  हे यरुशलेम, भानावर ये! नाहीतर मला तुझी किळस येऊन मी तुझ्यापासून तोंड फिरवीन;+मी तुला ओसाड करून टाकीन;तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.”+  ९  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “द्राक्षवेलीवरून जसं उरलेली द्राक्षं गोळा करून नेतात,तसं इस्राएलमधल्या उरलेल्या लोकांना नेलं जाईल; एकही मागे उरणार नाही. आपला हात पुन्हा पुढे करून द्राक्षवेलींवरून द्राक्षं गोळा कर.” १०  “मी कोणाला सांगू? कोणाला इशारा देऊ? कोण माझं ऐकेल? पाहा! त्यांचे कान बंद आहेत, म्हणून ते लक्ष देत नाहीत.+ पाहा! ते यहोवाच्या वचनाची थट्टा करतात;+त्यांना ते वचन अजिबात आवडत नाही. ११  म्हणून यहोवाच्या क्रोधाची आग माझ्यात पेटली आहे,मी ती आणखी आवरून धरू शकत नाही.”+ “रस्त्यावरच्या मुलावर, एकत्र जमलेल्या तरुण मुलांवर ती ओतून टाक.+ त्या सगळ्यांना बंदी बनवलं जाईल;नवरा आणि बायको,म्हातारे आणि जख्ख म्हातारे,अशा सगळ्यांना बंदी बनवलं जाईल.+ १२  त्यांची घरं दुसऱ्‍यांना दिली जातील,त्यांची शेतीवाडी आणि त्यांच्या बायकाही दुसऱ्‍यांना दिल्या जातील.+ कारण मी देशातल्या लोकांवर आपला हात उगारीन,” असं यहोवा म्हणतो. १३  “कारण लहानापासून मोठ्यापर्यंत, प्रत्येक जण बेइमानी करून धन कमवतोय;+संदेष्ट्यापासून याजकापर्यंत, प्रत्येक जण दुसऱ्‍यांची फसवणूक करतोय.+ १४  ते माझ्या लोकांचं मोडलेलं हाड वरवर जोडायचा प्रयत्न करतात,आणि काहीही बरोबर नसताना, ‘सगळं ठीक आहे! सगळं ठीक आहे!’ असं म्हणतात.+ १५  आपण केलेल्या घृणास्पद गोष्टींची त्यांना लाज वाटते का? नाही! त्यांना मुळीच लाज वाटत नाही! मुळात लाज काय असते, हेसुद्धा त्यांना माहीत नाही!+ म्हणूनच नाश झालेल्यांसोबत त्यांचाही नाश होईल. मी त्यांना शिक्षा करीन, तेव्हा ते ठेच लागून खाली पडतील,” असं यहोवा म्हणतो. १६  यहोवा म्हणतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुन्या काळातल्या मार्गांबद्दल विचारा,चांगला मार्ग कोणता आहे ते विचारा आणि त्यावरून चाला,+आपल्या जिवाला विश्रांती द्या.” पण लोक म्हणतात: “आम्ही नाही चालणार त्या मार्गावर.”+ १७  “मी पहारेकरी नेमले.+ ते म्हणाले: ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’”+ पण लोक म्हणाले: “आम्ही नाही लक्ष देणार.”+ १८  “म्हणून हे राष्ट्रांनो, ऐका! आणि हे लोकांनो, त्यांच्यासोबत काय होईल ते जाणून घ्या. १९  हे पृथ्वी ऐक! मी या लोकांवर संकट आणतोय,+हे त्यांच्या दुष्ट विचारांचंच फळ आहे. कारण त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही,आणि माझा नियम पाळला नाही.”* २०  “तुम्ही माझ्यासाठी शबावरून ऊद* आणि दूरच्या देशातून अगरू* आणता,पण मला त्याने काहीच फरक पडत नाही. तुमची होमार्पणं मी स्वीकारत नाही,आणि तुमच्या बलिदानांमुळे मला आनंद होत नाही.”+ २१  म्हणून यहोवा म्हणतो: “पाहा! या लोकांच्या मार्गात मी अडखळणं ठेवीन. त्यांमुळे ते अडखळून पडतील,वडील आणि मुलं,शेजारी आणि त्याचा मित्र असे सगळे अडखळून पडतील आणि त्यांचा नाश होईल.”+ २२  यहोवा म्हणतो: “पाहा! उत्तरेच्या देशाकडून लोक येत आहेत. पृथ्वीच्या दूरच्या भागांतून एका मोठ्या राष्ट्राला जागं केलं जाईल.+ २३  ते आपल्या हातात धनुष्य आणि बरची* घेऊन येतील. ते अतिशय क्रूर लोक आहेत; ते कोणावरही दयामाया करणार नाहीत. समुद्राच्या गर्जनेसारखा त्यांचा आवाज असेल,आणि ते घोड्यांवर बसून येतील.+ हे सीयोनच्या मुली, ते योद्ध्यांसारखं सैन्यदल रचून तुझ्यावर हल्ला करतील.” २४  आम्ही ही बातमी ऐकली आहे. आमचे हात गळून गेले आहेत,+दुःखाने आम्हाला घेरलंय,प्रसूत होणाऱ्‍या स्त्रीला होतात,तशा वेदना आम्हाला होत आहेत.+ २५  शेतावर जाऊ नकोस,किंवा रस्त्यावर फिरू नकोस,कारण शत्रूच्या हातात तलवार आहे,आणि सगळीकडे दहशत पसरली आहे. २६  हे माझ्या लोकांनो, माझ्या मुली,गोणपाट घाल+ आणि राखेत लोळ. एकुलता एक मुलगा मेल्यावर शोक करतात, तसा शोक कर; मोठ्याने आक्रोश कर,+कारण नाश करणारा अचानक आपल्यावर हल्ला करेल.+ २७  “मी तुला* माझ्या लोकांमध्ये धातूची पारख करणाऱ्‍यासारखं बनवलंय,धातूची पारख करणारा जसा कसून पारख करतो,तसं तू त्यांच्या वागण्याकडे लक्ष दे आणि त्यांचं परीक्षण कर. २८  सगळेच्या सगळे अडेल वृत्तीचे आहेत,+ते इतरांची बदनामी करत फिरतात.+ ते तांब्यासारखे आणि लोखंडासारखे आहेत. ते सगळे भ्रष्ट आहेत. २९  धातू गाळणाऱ्‍याचे भाते* पार जळून गेलेत,पण आगीतून शिसंच बाहेर पडतं. धातू गाळणारा धातू शुद्ध करायचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.+ दुष्ट लोक काही केल्या वेगळे काढले जात नाहीत.+ ३०  त्यांना, ‘टाकून दिलेली चांदी’ असं म्हटलं जाईल,कारण यहोवाने त्या सगळ्यांना टाकून दिलंय.”+

तळटीपा

अतिशय उंच इमारत.
किंवा “गार.”
किंवा “माझं शिक्षण नाकारलं.”
एक सुगंधी वनस्पती.
म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.
म्हणजे, यिर्मयाला.
भट्टी पेटती ठेवण्यासाठी त्यात वारा भरण्याचं साधन.