यिर्मया ८:१-२२

  • इतर जण चालतात त्याच मार्गावर चालण्याची लोकांची निवड (१-७)

  • यहोवाच्या वचनाशिवाय सुज्ञता नाही (८-१७)

  • यहूदाच्या जखमेमुळे यिर्मयाला झालेलं दुःख (१८-२२)

    • “गिलादमध्ये मलम नाही का?” (२२)

 यहोवा म्हणतो: “त्या वेळी, यहूदाच्या राजांची आणि अधिकाऱ्‍यांची हाडं, तसंच याजकांची व संदेष्ट्यांची आणि यरुशलेमच्या रहिवाशांची हाडं त्यांच्या कबरींमधून बाहेर काढली जातील. २  ती हाडं सूर्य, चंद्र आणि आकाशातल्या सगळ्या सैन्यासमोर पसरली जातील; त्यांनी ज्यांची आवड धरली आणि सेवा केली, ज्यांच्या मागे ते चालले, ज्यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला आणि ज्यांना त्यांनी नमन केलं त्यांच्यासमोर ती पसरली जातील.+ ती गोळा केली जाणार नाहीत किंवा पुरली जाणार नाहीत. तर ती जमिनीवर खत म्हणून पडून राहतील.”+ ३  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी या दुष्ट घराण्यातल्या उरलेल्या लोकांची जिथे जिथे पांगापांग करीन, तिथे तिथे हे लोक जीवन नाही तर मरण मागतील. ४  आणि तू त्यांना सांग, की ‘यहोवा असं म्हणतो: “ते पडले तर परत उठणार नाहीत का? कोणी आपल्या मार्गापासून मागे वळला, तर दुसराही मागे वळणार नाही का?  ५  मग यरुशलेमचे हे लोक माझ्याशी अविश्‍वासूपणे का वागत राहतात? ते खोट्या गोष्टींना धरून बसतात;आणि मागे वळायला नकार देतात.+  ६  मी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. पण ते जे बोलतात ते बरोबर नाही. कोणीही आपल्या दुष्ट कामांबद्दल पश्‍चात्ताप करत नाही, किंवा असं म्हणत नाही, की ‘मी हे काय केलं?’+ इतर जण चालतात त्या मार्गावर चालण्यासाठी प्रत्येक माणूस मागे वळत राहतो;घोडा जसा युद्धात बेधडक धावतो, तसा प्रत्येक माणूस त्या मार्गावर चालत राहतो.  ७  आकाशात उडणाऱ्‍या करकोचा पक्ष्यालाही आपल्या स्थलांतराची वेळ* माहीत असते;पारवे आणि इतर छोटे पक्षी, तसंच सारस पक्षी* यांनाही आपल्या परतण्याची* वेळ माहीत असते. पण माझ्या लोकांना यहोवाच्या न्यायाची वेळ समजत नाही.”’+  ८  ‘तुम्ही असं कसं म्हणू शकता, की “आम्ही सुज्ञ आहोत, आणि आमच्याकडे यहोवाचा नियम* आहे”? कारण, शास्त्र्यांची* खोटी लेखणी+ तर फक्‍त खोट्या गोष्टी लिहिण्यासाठीच वापरण्यात आली आहे.  ९  सुज्ञांना लज्जित केलं गेलंय.+ ते घाबरतील आणि त्यांना सापळ्यात अडकवलं जाईल. पाहा! त्यांनी यहोवाचं वचन नाकारलंय,मग त्यांच्याकडे सुज्ञता कशी असणार? १०  म्हणून मी त्यांच्या बायका इतर माणसांच्या हवाली करीन. त्यांची शेतं इतरांच्या मालकीची होतील.+ कारण लहानापासून मोठ्यापर्यंत, प्रत्येक जण बेइमानी करून धन कमवतोय;+संदेष्ट्यापासून याजकापर्यंत, प्रत्येक जण दुसऱ्‍याची फसवणूक करतोय.+ ११  ते माझ्या मुलीचं, माझ्या लोकांचं मोडलेलं हाड वरवर जोडायचा प्रयत्न करतात,आणि काहीही बरोबर नसताना, “सगळं ठीक आहे! सगळं ठीक आहे!” असं म्हणतात.+ १२  आपण केलेल्या घृणास्पद गोष्टींची त्यांना लाज वाटते का? नाही! त्यांना मुळीच लाज वाटत नाही! मुळात लाज काय असते, हेसुद्धा त्यांना माहीत नाही!+ म्हणूनच नाश झालेल्यांसोबत त्यांचाही नाश होईल. मी त्यांना शिक्षा करीन, तेव्हा ते ठेच लागून खाली पडतील,’+ असं यहोवा म्हणतो. १३  ‘मी त्यांना गोळा करीन, त्या वेळी त्यांचा नाश करीन. द्राक्षवेलींवर एकही द्राक्ष उरणार नाही, अंजिराच्या झाडावर एकही अंजीर उरणार नाही आणि सगळी पानंही सुकून जातील. मी त्यांना जे काही दिलं ते सगळं त्यांच्यापासून निघून जाईल.’ असं यहोवा म्हणतो.” १४  “आपण इथे का बसलो आहोत? चला आपण एकत्र येऊ आणि मजबूत भिंती असलेल्या शहरांमध्ये+ जाऊन मरू. कारण आपला देव यहोवा आपला नाश करेल. तो आपल्याला विषारी पाणी प्यायला देतो,+कारण आपण यहोवाविरुद्ध पाप केलंय. १५  आपण शांतीची आशा धरून होतो, पण काहीच चांगलं झालं नाही. आपण बरं होण्याची वाट पाहत होतो, पण आपण घाबरलेलोच आहोत.+ १६  दानमधून त्याच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज ऐकू येत आहे. त्याच्या दमदार घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने सगळी जमीन हादरत आहे. ते येतात आणि देश व त्यातलं सगळं काही खाऊन टाकतात,शहराचा आणि त्यातल्या रहिवाशांचा ते नाश करतात.” १७  “कारण पाहा! मी तुमच्यामध्ये साप पाठवतोय;मंत्रतंत्राने वश केले जाऊ शकत नाहीत, असे विषारी साप मी तुमच्यामध्ये पाठवतोय. ते तुम्हाला दंश करतील,” असं यहोवा म्हणतो. १८  माझ्या दुःखाचं सांत्वन होऊ शकत नाही;माझ्या मनाला फार वेदना होत आहेत. १९  दूरच्या देशातून मदतीची हाक ऐकू येत आहे;माझ्या मुलीकडून, माझ्या लोकांकडून मदतीची हाक ऐकू येत आहे: “यहोवा सीयोनमध्ये नाही का? तिचा राजा तिच्यामध्ये नाही का?” “त्यांनी आपल्या कोरीव मूर्तींनी आणि निरर्थक परक्या दैवतांनी माझा राग का भडकवला?” २०  “कापणीचा काळ निघून गेलाय, उन्हाळा संपून गेलाय. पण आमचा अजूनही बचाव झालेला नाही!” २१  माझ्या मुलीला, माझ्या लोकांना झालेल्या जखमांमुळे मी अतिशय दुःखी झालो आहे;+मी पूर्णपणे हताश झालो आहे. मला भितीने घेरलं आहे. २२  गिलादमध्ये मलम* नाही का?+ तिथे कोणी वैद्य नाही का?+ मग माझी मुलगी, माझे लोक अजूनपर्यंत का बरे झाले नाहीत?+

तळटीपा

किंवा “नियुक्‍त वेळ.”
किंवा कदाचित, “बगळा.”
किंवा “स्थलांतर करण्याची.”
किंवा “शिक्षण.”
किंवा “सचिवांची.”
किंवा “बाल्सम.”