यिर्मया ९:१-२६
९ माझं डोकं पाण्याने भरलेली विहीर असतं,माझे डोळे अश्रूंचा झरा असते, तर किती बरं झालं असतं!+
म्हणजे मारल्या गेलेल्या माझ्या लोकांसाठी मी रात्रंदिवस रडलो असतो.
२ प्रवासी मुक्काम करतात अशी एखादी जागा माझ्याकडे ओसाड रानात असती, तर किती बरं झालं असतं!
म्हणजे मी माझ्या लोकांना सोडून तिथे दूर निघून गेलो असतो.
कारण ते सगळे व्यभिचारी आहेत,+विश्वासघातकी लोकांची ती टोळी आहे.
३ ते आपली जीभ धनुष्यासारखी वाकवतात;देशात विश्वासूपणाचं नाही, तर खोटेपणाचं वर्चस्व आहे.+
“ते एकानंतर एक दुष्ट काम करत राहतात,आणि माझ्याकडे लक्ष देत नाहीत,”+ असं यहोवा म्हणतो.
४ “प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यापासून सावध राहावं,आपल्या भावावरही विश्वास ठेवू नये.
कारण प्रत्येक भाऊ विश्वासघात करणारा,+आणि प्रत्येक शेजारी बदनामी करणारा आहे.+
५ प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याला फसवतो,कोणीही खरं बोलत नाही.
त्यांनी आपल्या जीभेला खोटं बोलण्याचं प्रशिक्षण दिलंय.+
ते चुकीची कामं करून पार दमून जातात.
६ तू विश्वासघातकी लोकांमध्ये राहतोस.
ते खोटं बोलतात आणि मला ओळखायला नकार देतात,” असं यहोवा म्हणतो.
७ म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:
“मी त्यांना धातूसारखं गाळून त्यांची पारख करीन.+
कारण माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या लोकांच्या बाबतीत मी याशिवाय दुसरं काय करू शकतो?
८ त्यांची जीभ जीव घेणाऱ्या बाणासारखी आहे; ती फसव्या गोष्टी बोलते.
ते तोंडाने तर आपल्या शेजाऱ्याशी शांतीच्या गोष्टी बोलतात,पण त्याला जाळ्यात कसं अडकवावं याविषयी मनात कट रचतात.”*
९ यहोवा म्हणतो, “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का?
या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का?+
१० मी डोंगरांसाठी अश्रू गाळीन आणि विलाप करीन,ओसाड रानातल्या कुरणांसाठी मी शोकगीत गाईन.
कारण ती जाळून टाकण्यात आली आहेत, आणि तिथून कोणीही ये-जा करत नाही.
तिथे गुराढोरांचा आवाज ऐकू येत नाही,आणि सर्व प्राणी व आकाशातले पक्षी तिथून निघून गेले आहेत; ते पळून गेले आहेत.+
११ मी यरुशलेमला दगडांचा ढिगारा+ आणि कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनवीन.+
मी यहूदाच्या शहरांना ओसाड करून टाकीन; तिथे एकही माणूस उरणार नाही.+
१२ हे सगळं समजण्याइतकं सुज्ञ कोण आहे?
हे सांगता यावं म्हणून यहोवा कोणाशी बोलला आहे?
देशाचा नाश का झालाय?
कोणालाही तिथून ये-जा करता येत नाही, अशा ओसाड रानासारखा तो रखरखीत का झालाय?”
१३ यहोवाने उत्तर दिलं: “कारण, मी त्यांना दिलेलं शिक्षण* त्यांनी नाकारलं, त्याप्रमाणे ते चालले नाहीत आणि त्यांनी माझं ऐकलं नाही.
१४ उलट ते हट्टीपणे आपल्या मनाला येईल तसं वागत राहिले.+ आणि त्यांच्या वाडवडिलांनी शिकवल्याप्रमाणे ते बआल मूर्तींच्या नादी लागले.+
१५ म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी या लोकांना कडूदवणा* खायला लावीन, आणि त्यांना विषारी पाणी प्यायला लावीन.+
१६ त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना माहीत नाही, अशा राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करीन.+ त्यांचा पूर्णपणे नाश करेपर्यंत मी त्यांच्यामागे तलवार पाठवीन.’+
१७ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो,‘समंजसपणे वागा.
शोकगीत गाणाऱ्या स्त्रियांना बोलवा,+कुशल स्त्रियांना आमंत्रित करा.
१८ म्हणजे त्या लवकर येतील आणि आपल्यासाठी शोकगीत गातील.
आपल्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतील,आणि आपल्या पापण्या आसवांनी भिजून जातील.+
१९ सीयोनमधून शोक करण्याचा आवाज ऐकू आला:+
“आमचा नाश झालाय!
आम्ही किती लज्जित झालोय!
कारण आम्हाला आमचा देश सोडावा लागलाय, आणि त्यांनी आमची घरंदारं जमीनदोस्त केली आहेत.”+
२० हे स्त्रियांनो! यहोवाचा संदेश ऐका.
त्याच्या मुखातून निघालेल्या संदेशाकडे कान द्या!
तुमच्या मुलींना हे शोकगीत शिकवा,आणि एकमेकींना हे विलापगीत शिकवा.+
२१ कारण आपल्या घराच्या खिडक्यांमधून मृत्यू आत शिरलाय;तो मजबूत बुरुजांमध्ये शिरलाय.
रस्त्यांवरून लहान मुलांना,आणि चौका-चौकांमधून तरुणांना घेऊन जायला तो आत शिरलाय.’+
२२ तू त्यांना सांग, की ‘यहोवा असं म्हणतो:
“कापणी करणारा शेतातली धान्याची कणसं कापून आपल्यामागे टाकतो,पण गोळा करायला कोणी नसल्यामुळे ती पडून राहतात,तशी लोकांची प्रेतं मैदानावर खत म्हणून पडून राहतील.”’”+
२३ यहोवा असं म्हणतो:
“सुज्ञ माणसाने आपल्या बुद्धीचा,+शक्तिशाली माणसाने आपल्या शक्तीचा,आणि श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये.”+
२४ “अभिमान बाळगायचाच असेल,तर त्याला माझ्याविषयी सखोल समज आणि ज्ञान आहे याचा अभिमान बाळगावा.+
मी यहोवा आहे आणि मी एकनिष्ठ प्रेम करणारा, पृथ्वीवर न्याय आणि नीती प्रस्थापित करणारा देव आहे,+ याचा अभिमान बाळगावा.
कारण याच गोष्टींमुळे मला आनंद होतो,”+ असं यहोवा म्हणतो.
२५ यहोवा म्हणतो “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अशा सगळ्यांकडून हिशोब घेईन, ज्यांची सुंता* झाली असूनही ते बेसुनत लोकांसारखे आहेत.+
२६ मी इजिप्त,+ यहूदा,+ अदोम,+ अम्मोन+ आणि मवाब+ यांच्याकडून हिशोब घेईन. तसंच, आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापणाऱ्या ओसाड रानातल्या सगळ्या रहिवाशांकडूनही हिशोब घेईन.+ कारण सगळी राष्ट्रं बेसुनत आहेत आणि इस्राएलचं सगळं घराणंही हृदयाने बेसुनत आहे.”+
तळटीपा
^ शब्दशः “मनात त्याच्याविरुद्ध टपून बसतात.”
^ किंवा “मी दिलेला नियम.”
^ एक कडू वनस्पती.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “कल्ले.”