योएल २:१-३२
२ “सीयोनमध्ये शिंग फुंका!+
माझ्या पवित्र पर्वतावर युद्धाची घोषणा करा.
देशातल्या* सगळ्या रहिवाशांचा थरकाप उडो!
कारण यहोवाचा दिवस येत आहे!+ तो जवळ आहे!
२ तो घोर अंधकाराचा दिवस आहे,+तो ढगांचा आणि दाट काळोखाचा दिवस आहे,+पर्वतांवर पसरणाऱ्या पहाटेच्या प्रकाशासारखा तो दिवस आहे.
असंख्य लोक असलेलं एक शक्तिशाली राष्ट्र आहे;+त्यासारखं राष्ट्र पूर्वी कधी झालं नव्हतं,आणि यापुढेही त्यासारखं राष्ट्रपिढ्या न् पिढ्या होणार नाही.
३ त्यांच्यापुढे अग्नी नाश करतो,आणि त्यांच्यामागे ज्वाला भस्म करते.+
त्यांच्यापुढे असलेला देश एदेन बागेसारखा आहे,+पण त्यांच्यामागचा प्रदेश ओसाड रानासारखा आहे.
त्यांच्यापासून काहीच वाचू शकत नाही.
४ ते घोड्यांसारखे दिसतात,आणि युद्धाच्या घोड्यांसारखे धावतात.+
५ जेव्हा ते पर्वताच्या माथ्यांवर उड्या मारतात, तेव्हा रथांसारखा,+आणि आगीत जळणाऱ्या गवताच्या तडतडण्यासारखा आवाज होतो.
ते युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान सैन्यासारखे आहेत.+
६ त्यांच्यामुळे लोकांना पीडा होतील.
सगळ्यांचे चेहरे पांढरे पडतील.
७ ते योद्ध्यांसारखे हल्ला करतात,सैनिकांसारखे भिंतीवर चढतात,प्रत्येक जण आपापल्या मार्गावर चालतो,कोणीही आपली रांग सोडत नाही.
८ ते एकमेकांना ढकलत नाहीत;प्रत्येक जण आपल्या मार्गाने वाटचाल करतो.
जरी त्यांच्यापैकी काही शस्त्रांनी पडले,तरी इतर जण आपली रांग सोडत नाहीत.
९ ते शहरांमध्ये शिरतात आणि भिंतीवर धावतात.
ते घरांवर चढतात आणि चोरासारखे खिडक्यांमधून घुसतात.
१० त्यांच्यापुढे देश कापतो आणि आकाश थरथरतं.
सूर्य आणि चंद्र काळवंडले आहेत,+ताऱ्यांचं तेज नाहीसं झालं आहे.
११ यहोवा आपल्या सैन्यापुढे मोठ्याने घोषणा करेल,+ कारण त्याचं सैन्य खूप मोठं आहे.+
त्याचा शब्द पूर्ण करणारा* शक्तिशाली आहे.
यहोवाचा दिवस महान आणि भयानक आहे.+
त्या दिवशी कोण टिकेल?”+
१२ यहोवा म्हणतो: “अजूनही संधी आहे, पूर्ण मनाने माझ्याकडे परत या,+उपास करून,+ रडत आणि आक्रोश करत माझ्याकडे परत या.
१३ आपले कपडे नाही,+ तर हृदय फाडा,+आणि तुमचा देव यहोवा याच्याकडे परत या,कारण तो करुणामय,* दयाळू आणि सहनशील* आहे;+ तो एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आहे,+तो हे संकट आणण्याबद्दल पुन्हा विचार करेल.*
१४ काय माहीत, कदाचित तो आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करेल*+आणि तुम्हाला आशीर्वाद देईल,त्यामुळे तुम्ही आपला देव यहोवा याला अन्नार्पण आणि पेयार्पण देऊ शकाल!
१५ सीयोनमध्ये शिंग फुंका!
उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+
१६ लोकांना गोळा करा; मंडळीला पवित्र करा.+
वृद्ध लोकांना* जमा करा आणि लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना गोळा करा.+
वराने आणि वधूने आपल्या आतल्या खोलीतून बाहेर यावं.
१७ यहोवाची सेवा करणाऱ्या याजकांनीवऱ्हांडा आणि वेदी+ यांच्यामध्ये रडून असं म्हणावं:
‘हे यहोवा, आपल्या लोकांना दया दाखव;तुझ्या लोकांचा अपमान होऊ देऊ नको,आणि राष्ट्रांना त्यांच्यावर राज्य करू देऊ नको.
“यांचा देव कुठे आहे,” असं लोकांनी का म्हणावं?’+
१८ मग यहोवा आपल्या देशासाठी आवेशी होईल,आणि आपल्या लोकांना दया दाखवेल.+
१९ यहोवा आपल्या लोकांना असं उत्तर देईल:
‘मी तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देईन,आणि तुम्ही तृप्त व्हाल;+यापुढे इतर राष्ट्रं तुमची निंदा करणार नाहीत.+
२० उत्तरेकडून हल्ला करणाऱ्याला मी हाकलून लावीन;मी त्याला एका कोरड्या आणि ओसाड प्रदेशात विखरून टाकीन,त्याच्या सैन्याचा पुढचा भाग* पूर्वेच्या समुद्राकडे*आणि मागचा भाग पश्चिमेच्या समुद्राकडे* असेल.
त्याच्या प्रेताला दुर्गंधी येईलआणि ती सबंध देशात पसरेल;+कारण देव अद्भुत गोष्टी करेल.’
२१ हे देशा, घाबरू नकोस.
खूश हो आणि आनंद साजरा कर, कारण यहोवा महान कार्यं करणार आहे.
२२ रानातल्या पशूंनो, घाबरू नका,कारण रानातली कुरणं हिरवीगार होतील,+आणि झाडांना फळं लागतील;+अंजिराचं झाड आणि द्राक्षवेल भरपूर फळं देतील.+
२३ सीयोनच्या मुलांनो, तुम्ही खूश व्हा आणि तुमचा देव यहोवा याच्यामुळे आनंद साजरा करा;+कारण तो तुम्हाला योग्य प्रमाणात शरद ऋतूतला पाऊस देईल,तो तुमच्यावर पाऊस पाडेल,आणि आधीप्रमाणेच, तो तुम्हाला शरद आणि वसंत ऋतूंतला पाऊस देईल.+
२४ खळी* धान्याने भरलेली असतील,आणि कुंडे नवीन द्राक्षारसाने आणि तेलाने भरून वाहतील.+
२५ ज्या वर्षांमध्ये मी माझ्या मोठ्या सैन्याला,म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, बिनपंखांचे टोळ, अधाशी टोळ आणि कुरतडणारे टोळ यांना तुमच्यामध्ये पाठवलं आणि त्यांनी तुमचं पीक खाल्लं,त्या वर्षांच्या नुकसानाची मी भरपाई करीन.+
२६ तुम्ही नक्कीच खाऊन तृप्त व्हाल,+आणि तुमचा देव यहोवा याच्या नावाची स्तुती कराल,+त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक कार्यं केली आहेत;माझ्या लोकांना पुन्हा कधीच लज्जित व्हावं लागणार नाही.+
२७ तेव्हा तुम्हाला कळेल, की मी इस्राएली लोकांमध्ये आहे+आणि मी तुमचा देव यहोवा आहे;+ माझ्याशिवाय इतर कोणीही देव नाही!
माझ्या लोकांना पुन्हा कधीच लज्जित व्हावं लागणार नाही.
२८ मग मी माझी पवित्र शक्ती* सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन,+आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील,तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील,आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.+
२९ त्या दिवसांत मी माझ्या दासांवर आणि दासींवरहीमाझी पवित्र शक्ती ओतीन.
३० मी आकाशात आणि पृथ्वीवर अद्भुत गोष्टी* दाखवीन,रक्त, अग्नी आणि धुराचे लोट दिसतील.+
३१ यहोवाचा महान आणि भयानक दिवस येण्याआधी+सूर्य काळवंडेल आणि चंद्र रक्तासारखा लाल होईल.+
३२ आणि जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल;+कारण यहोवाने सांगितल्याप्रमाणे, सीनाय पर्वतावर आणि यरुशलेममध्ये वाचलेले लोक,+म्हणजे ज्यांना यहोवाने बोलावलं आहे, ते वाचलेले लोक असतील.”
तळटीपा
^ किंवा “पृथ्वीच्या.”
^ किंवा “हुकूम बजावणारा.”
^ किंवा “कृपाळू.”
^ किंवा “लगेच न रागावणारा.”
^ किंवा “त्याला पस्तावा होईल.”
^ किंवा “पस्तावा होईल.”
^ शब्दशः “पवित्र करा.”
^ किंवा “वडीलजनांना.”
^ शब्दशः “तोंड.”
^ म्हणजे, मृत समुद्र.
^ म्हणजे, भूमध्य समुद्र.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “चमत्कार.”