योना २:१-१०

  • माशाच्या पोटातून योनाची प्रार्थना (१-९)

  • योनाला जमिनीवर ओकून टाकलं जातं (१०)

 मग योनाने माशाच्या पोटातून आपला देव यहोवा याला प्रार्थना केली.+ २  तो म्हणाला: “मी संकटात सापडलो, तेव्हा मी यहोवाला हाक मारली आणि त्याने मला उत्तर दिलं.+ खोल कबरेतून* मी मदतीसाठी याचना केली.+ आणि तू माझा आवाज ऐकलास.  ३  तू मला महासागराच्या तळाशी टाकलंस,तेव्हा प्रवाहांनी मला घेरलं.+ तुझ्या प्रचंड मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या.+  ४  तेव्हा मी म्हणालो, ‘तू मला आपल्या नजरेसमोरून घालवून दिलं आहेस! आता मी तुझं पवित्र मंदिर कसं पाहू शकेन?’  ५  पाण्याने मला वेढलं; माझा प्राण धोक्यात होता;+मी खोल समुद्रात बुडालो. सागरातल्या वेलींनी माझ्या डोक्याला गुरफटलं.  ६  मी पर्वतांच्या अगदी तळाशी गेलो. पृथ्वीच्या फाटकांनी मला कायमचं कोंडलं असतं,पण हे यहोवा, माझ्या देवा, तू माझा जीव मृत्यूच्या गर्तेतून* वर आणलास.+  ७  माझा प्राण हळूहळू जाऊ लागला,*तेव्हा हे यहोवा, मी तुझी आठवण केली.+ मग माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत, तुझ्या पवित्र मंदिरात पोहोचली.+  ८  निरुपयोगी मूर्तींची भक्‍ती करणारे, एकनिष्ठ प्रेम* करायचं सोडून देतात.  ९  पण मी उपकारस्तुती करून तुला बलिदान अर्पण करीन. मी जो नवस केला आहे, तो मी फेडीन.+ हे यहोवा, तारण करणारा तूच आहेस.”+ १०  मग, यहोवाने माशाला आज्ञा दिली आणि माशाने योनाला जमिनीवर ओकून टाकलं.

तळटीपा

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कबरेतून.”
किंवा “माझ्या प्राणाला ओहोटी लागली होती.”
किंवा कदाचित, “त्यांची निष्ठा.”