योना ३:१-१०

  • योना देवाचं ऐकतो आणि निनवेला जातो (१-४)

  • योनाचा संदेश ऐकून निनवेच्या लोकांचा पश्‍चात्ताप (५-९)

  • देव निनवेचा नाश न करण्याचं ठरवतो (१०)

 मग योनाला दुसऱ्‍यांदा यहोवाकडून हा संदेश मिळाला:+ २  “ऊठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन+ मी तुला सांगितलेला संदेश घोषित कर.” ३  म्हणून यहोवाच्या आज्ञेप्रमाणे+ योना उठला आणि निनवेला गेला.+ निनवे फार मोठं शहर* होतं. त्या संपूर्ण शहराला पायी फेरी मारायला तीन दिवस लागायचे. ४  योना त्या शहरात गेला आणि एका दिवसाच्या अंतरापर्यंत चालत जाऊन त्याने हा संदेश घोषित केला: “फक्‍त ४० दिवस, मग निनवेचा नाश होईल.” ५  तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्‍वास ठेवला.+ त्यांनी उपास घोषित केला आणि त्यांच्यापैकी लहानमोठ्या सर्व माणसांनी गोणपाट घातलं. ६  निनवेच्या राजापर्यंत हा संदेश पोहोचला, तेव्हा तो आपल्या राजासनावरून उठला आणि त्याने आपली राजवस्त्रं काढून गोणपाट घातलं आणि तो राखेत बसला. ७  शिवाय, त्याने संपूर्ण निनवे शहरात ही घोषणा करण्याचा हुकूम दिला: “राजा आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांचा असा हुकूम आहे, की कोणत्याही माणसाने किंवा प्राण्याने, गुरांनी किंवा मेंढरांनी काहीही खाऊ नये. त्यांनी अन्‍न खाऊ नये किंवा पाणीही पिऊ नये. ८  माणसांनी आणि प्राण्यांनी गोणपाट घालावं; लोकांनी आपली दुष्ट आणि हिंसक कामं सोडून, देवाला कळकळून प्रार्थना करावी. ९  म्हणजे कदाचित खऱ्‍या देवाचा क्रोध शांत होईल आणि त्याने जे करायचं ठरवलंय, त्यावर तो पुन्हा विचार करेल* आणि आपला नाश होणार नाही.” १०  जेव्हा खऱ्‍या देवाने त्यांचं वागणं पाहिलं, म्हणजेच त्यांनी आपली दुष्ट कामं सोडून दिली आहेत हे त्याने पाहिलं,+ तेव्हा त्यांच्यावर जे संकट आणण्याबद्दल तो बोलला होता, त्यावर त्याने पुन्हा विचार केला* आणि त्याने ते संकट आणलं नाही.+

तळटीपा

शब्दशः “देवाच्या दृष्टीत मोठं शहर.”
किंवा “त्याला पस्तावा होईल.”
किंवा “त्याला पस्तावा झाला.”