योना ४:१-११

  • योना रागावतो, मरण्याची विनंती करतो (१-३)

  • यहोवा योनाला दया दाखवायला शिकवतो (४-११)

    • “तुझं असं रागावणं बरोबर आहे का?” ()

    • भोपळ्याच्या वेलावरून धडा (६-१०)

 पण योनाला हे अजिबात आवडलं नाही, आणि त्याला खूप राग आला. २  म्हणून त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे यहोवा, मी माझ्या देशात होतो तेव्हा मला याचीच भीती नव्हती का? म्हणूनच तर मी तार्शीशला पळून जायचा प्रयत्न केला;+ कारण मला माहीत आहे, की तू एक दयाळू आणि कृपाळू* देव आहेस, तू सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहेस.+ आणि तुला संकटं आणायला आवडत नाही. ३  म्हणून हे यहोवा, आता माझा जीव घे; कारण अशा जगण्यापेक्षा मी मरून गेलेलो बरा.”+ ४  यहोवाने त्याला विचारलं: “तुझं असं रागावणं बरोबर आहे का?” ५  तेव्हा योना शहराबाहेर निघून गेला आणि शहराच्या पूर्वेकडे जाऊन बसला. त्याने तिथे स्वतःसाठी एक मांडव तयार केला. आणि त्या शहराचं काय होतं हे पाहण्यासाठी, तो त्याच्या सावलीत बसला.+ ६  मग योनाच्या डोक्याला सावली मिळावी आणि त्याचा त्रास थोडा कमी व्हावा, म्हणून यहोवाने भोपळ्याचा एक वेल* उगवायला लावला. योनाला तो भोपळ्याचा वेल पाहून खूप आनंद झाला. ७  पण, दुसऱ्‍या दिवशी पहाटेच, देवाने एक किडा पाठवला; किड्याने तो वेल खायला सुरुवात केली आणि तो वेल सुकला. ८  सूर्य वर आल्यावर देवाने पूर्वेकडून गरम वारा वाहायला लावला; सूर्य तापला, तेव्हा योनाच्या डोक्याला खूप ऊन लागलं आणि योना अगदी गळून गेला. मला मारून टाक, अशी तो देवाला विनंती करू लागला. तो म्हणाला, “असं जगण्यापेक्षा मी मेलेलो बरा.”+ ९  देवाने योनाला विचारलं: “भोपळ्याच्या वेलासाठी तुला इतका राग येणं बरोबर आहे का?”+ तेव्हा योना म्हणाला: “हो, माझं रागावणं बरोबरच आहे, मला इतका राग आलाय, की मला आता जगायचंच नाही.” १०  पण यहोवा म्हणाला: “या भोपळ्याच्या वेलासाठी तू काहीच मेहनत केली नव्हतीस आणि तो तू वाढवला नव्हतास; तो एका रात्रीत वाढला आणि एका रात्रीत सुकून गेला आणि तरी तुला त्याच्यासाठी इतकं वाईट वाटतंय. ११  मग चांगल्यावाइटाचा* फरक माहीत नसलेली १,२०,००० माणसं आणि त्यांची पुष्कळ गुरंढोरं ज्यात राहतात, त्या मोठ्या निनवे शहराबद्दल+ मला वाईट वाटायला नको का?”+

तळटीपा

किंवा “करुणामय.”
किंवा कदाचित, “एरंडाचं झाड.”
किंवा “उजव्याडाव्या हाताचा.”