योहानने सांगितलेला संदेश १:१-५१

  • शब्द मानव बनला (१-१८)

  • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने दिलेली साक्ष (१९-२८)

  • येशू, देवाचा कोकरा (२९-३४)

  • येशूचे पहिले शिष्य (३५-४२)

  • फिलिप्प आणि नथनेल (४३-५१)

 सुरुवातीला शब्द होता+ आणि शब्द देवासोबत होता+ आणि शब्द देवासारखा होता.+ २  हाच सुरुवातीला देवासोबत होता. ३  सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारेच अस्तित्वात आल्या.+ अशी एकही गोष्ट नाही, जी त्याच्याद्वारे अस्तित्वात आली नाही. ४  त्याच्याद्वारे जीवन अस्तित्वात आलं आणि ते जीवन माणसांसाठी प्रकाश होतं.+ ५  तो प्रकाश अंधारात चमकत असला,+ तरी अंधार त्याच्यावर मात करू शकला नाही. ६  मग देवाने पाठवलेला एक माणूस आला. त्याचं नाव योहान होतं.+ ७  हा माणूस एक साक्षीदार होता. त्याच्याद्वारे सगळ्या प्रकारच्या लोकांनी विश्‍वास ठेवावा, म्हणून तो त्या प्रकाशाबद्दल साक्ष द्यायला आला.+ ८  हा माणूस स्वतः तो प्रकाश नव्हता,+ तर त्या प्रकाशाबद्दल साक्ष द्यायला आला होता. ९  जो सगळ्या प्रकारच्या लोकांना प्रकाश देतो, तो खरा प्रकाश लवकरच जगात येणार होता.+ १०  तो जगातच होता+ आणि जग त्याच्याद्वारेच अस्तित्वात आलं.+ पण जगाने त्याला ओळखलं नाही. ११  तो स्वतःच्या लोकांमध्ये आला, पण त्यांनी त्याला स्वीकारलं नाही. १२  पण ज्यांनी त्याचा स्वीकार केला, त्या सगळ्यांना त्याने देवाची मुलं व्हायचा अधिकार दिला.+ कारण, त्यांनी त्याच्या नावावर विश्‍वास असल्याचं दाखवलं.+ १३  आणि त्यांचा जन्म माणसांपासून* किंवा शरीराच्या इच्छेने किंवा कोणत्याही माणसाच्या इच्छेने नाही, तर देवापासून झाला.+ १४  मग शब्द मानव झाला.+ तो आपल्यामध्ये राहिला आणि आपण त्याचं तेज पाहिलं. पित्याच्या एकुलत्या एका मुलाचं+ ते तेज होतं. आणि तो देवाच्या कृपेने* आणि सत्याने परिपूर्ण होता. १५  (योहानने त्याच्याबद्दल साक्ष दिली. त्याने असं घोषित केलं: “मी याच्याविषयीच म्हणालो होतो, की ‘माझ्यामागून येणारा माझ्यापुढे निघून गेलाय. कारण तो माझ्याआधीच अस्तित्वात होता.’”)+ १६  आणि त्याच्या पूर्णतेतून आपल्या सगळ्यांवर अपार कृपेचा वर्षाव झाला.* १७  कारण देवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं.+ पण अपार कृपा+ आणि सत्य हे त्याने येशू ख्रिस्ताद्वारे दिलं.+ १८  कोणत्याही माणसाने कधीही देवाला पाहिलं नाही.+ पण देवासारखा असलेला एकुलता एक मुलगा,*+ जो पित्याच्या अगदी जवळ* आहे,+ त्याने पित्याला प्रकट केलं आहे.+ १९  यहुद्यांनी यरुशलेमहून याजकांना आणि लेव्यांना योहानकडे, “तू कोण आहेस?” असं विचारायला पाठवलं,+ तेव्हा त्याने ही साक्ष दिली. २०  त्याने उत्तर द्यायला नकार दिला नाही. उलट, “मी ख्रिस्त नाही,” असं त्याने उघडपणे मान्य केलं. २१  तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “मग तू कोण आहेस? एलीया?”+ तो म्हणाला: “नाही.” “मग ज्याच्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली होती, तो संदेष्टा आहेस का?”+ तो म्हणाला: “नाही!” २२  तेव्हा ते त्याला म्हणाले: “मग तू कोण आहेस ते आम्हाला सांग, म्हणजे ज्यांनी आम्हाला पाठवलं, त्यांना आम्ही जाऊन सांगू. तू स्वतःबद्दल काय म्हणतोस?” २३  तो म्हणाला: “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘यहोवासाठी* मार्ग मोकळा करा!’ अशी ओसाड रानात घोषणा करणाऱ्‍याचा मी आवाज आहे.”+ २४  योहानकडे आलेल्या या माणसांना परूश्‍यांनी* पाठवलं होतं. २५  त्यांनी त्याला विचारलं: “जर तू ख्रिस्त किंवा एलीया किंवा भविष्यवाणी केलेला संदेष्टाही नाहीस, तर मग बाप्तिस्मा* का देतोस?” २६  योहानने त्यांना उत्तर दिलं: “मी पाण्यात बाप्तिस्मा देतो. पण तुमच्यामध्ये असा एक जण आहे, ज्याला तुम्ही ओळखत नाही. २७  तो माझ्या मागून येतोय आणि त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.”+ २८  यार्देन नदीच्या पलीकडे बेथानीमध्ये, जिथे योहान बाप्तिस्मा देत होता तिथे या सगळ्या गोष्टी घडल्या.+ २९  दुसऱ्‍या दिवशी, येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला: “पाहा! जगाचं+ पाप दूर करणारा+ देवाचा कोकरा!+ ३०  हा तोच आहे ज्याच्याबद्दल मी असं म्हटलं होतं: ‘माझ्यामागून येणारा एक माणूस माझ्यापुढे निघून गेलाय. कारण तो माझ्याआधी अस्तित्वात होता.’+ ३१  मलाही त्याची ओळख नव्हती. पण तो इस्राएलसमोर प्रकट व्हावा, म्हणून मी पाण्यात बाप्तिस्मा देतोय.”+ ३२  योहानने अशीही साक्ष दिली, की “स्वर्गातून पवित्र शक्‍ती* कबुतराच्या रूपात उतरताना मला दिसली आणि ती त्याच्यावर स्थिर झाली.+ ३३  मलाही त्याची ओळख नव्हती. पण ज्याने मला पाण्यात बाप्तिस्मा द्यायला पाठवलं त्यानेच मला सांगितलं, की ‘ज्या कोणावर तू पवित्र शक्‍ती उतरताना आणि स्थिर होताना पाहशील,+ तोच पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा देणारा आहे.’+ ३४  आणि मी ते पाहिलंय आणि हाच देवाचा मुलगा आहे अशी साक्ष दिली आहे.”+ ३५  त्याच्या दुसऱ्‍या दिवशी पुन्हा, योहान आपल्या दोन शिष्यांसोबत उभा होता. ३६  येशूला तिथून जाताना पाहून तो म्हणाला: “पाहा, देवाचा कोकरा!”+ ३७  हे ऐकून ते दोन शिष्य येशूच्या मागे चालू लागले. ३८  तेव्हा येशूने वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहिलं आणि तो म्हणाला: “तुम्हाला काय हवंय?” ते त्याला म्हणाले: “रब्बी, (म्हणजे, “गुरुजी”) तुम्ही कुठे राहताय?” ३९  तो त्यांना म्हणाला: “या आणि बघा.” तेव्हा त्याच्यासोबत जाऊन तो कुठे राहत होता हे त्यांनी पाहिलं. त्या वेळी दुपारचे सुमारे चार वाजले होते.* त्या दिवशी ते त्याच्यासोबतच राहिले. ४०  योहानचे शब्द ऐकून जे दोघं येशूच्या मागे गेले होते, त्यांच्यापैकी एक जण शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया+ होता. ४१  तो सगळ्यात आधी आपल्या भावाला, शिमोनला भेटून म्हणाला: “आम्हाला मसीहा (म्हणजे, ख्रिस्त) सापडलाय.”+ ४२  मग तो त्याला येशूकडे घेऊन गेला. त्याला पाहून येशू म्हणाला: “तू योहानचा मुलगा, शिमोन+ आहेस. तुला केफा (म्हणजे, “पेत्र”) म्हटलं जाईल.”+ ४३  दुसऱ्‍या दिवशी येशूला गालीलला जायचं होतं. मग फिलिप्प+ भेटल्यावर तो त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” ४४  फिलिप्प हा बेथसैदाचा राहणारा होता. अंद्रिया आणि पेत्रसुद्धा याच शहरात राहायचे. ४५  फिलिप्पला नथनेल+ भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला: “मोशेने ज्याच्याबद्दल नियमशास्त्रात लिहिलं होतं आणि ज्याच्याबद्दल संदेष्ट्यांनीही लिहिलं होतं, तो आम्हाला सापडलाय. तो नासरेथ इथला योसेफचा मुलगा येशू आहे.”+ ४६  पण नथनेल त्याला म्हणाला: “नासरेथमधून कधी काही चांगलं येऊ शकतं का?” तेव्हा फिलिप्प त्याला म्हणाला: “तू स्वतः येऊन पाहा.” ४७  येशूने नथनेलला आपल्याकडे येताना पाहिलं तेव्हा तो त्याच्याबद्दल म्हणाला: “पाहा, हा एक खरा इस्राएली आहे. याच्यात जराही कपट नाही.”+ ४८  नथनेल त्याला म्हणाला: “तू मला कसं ओळखतोस?” येशू म्हणाला: “फिलिप्पने तुला बोलावण्याआधी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिलं होतं.” ४९  तेव्हा नथनेल त्याला म्हणाला: “रब्बी, तू देवाचा मुलगा, इस्राएलचा राजा आहेस!”+ ५०  येशू त्याला म्हणाला: “अंजिराच्या झाडाखाली असतानाच तुला पाहिलं, असं सांगितल्यामुळे तू विश्‍वास ठेवतोस का? तू यापेक्षाही महान गोष्टी पाहशील.” ५१  मग तो त्याला म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही स्वर्ग उघडलेला पाहाल आणि स्वर्गदूत मनुष्याच्या मुलाकडे खाली येताना आणि वर जाताना पाहाल.”+

तळटीपा

शब्दशः “रक्‍तापासून.”
किंवा “अपार कृपेने.”
शब्दशः “अपार कृपेवर अपार कृपा झाली.”
शब्दशः “एकुलता एक देव.”
किंवा “पित्याच्या उराशी.” यावरून पित्याची त्याच्यावर खास मर्जी आहे हे दिसून येतं.
अति. क५ पाहा.
म्हणजे, दहावा तास.