योहानने सांगितलेला संदेश १३:१-३८
१३ येशूने वल्हांडण सणाच्या आधीच ओळखलं होतं, की आता हे जग सोडून पित्याकडे जायची+ त्याची वेळ आली आहे.+ त्यामुळे, जगात त्याचे स्वतःचे जे होते आणि ज्यांच्यावर त्याचं प्रेम होतं, त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.+
२ मग संध्याकाळचं जेवण चाललं होतं. आणि सैतानाने* शिमोनचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात, येशूला विश्वासघाताने पकडून द्यायचं+ आधीच घातलं होतं.+
३ आपल्या पित्याने सगळ्या गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या आहेत आणि आपण देवाकडून आलो आहोत आणि देवाकडे जात आहोत+ हे माहीत असून,
४ येशू जेवणावरून उठला आणि त्याने आपलं बाहेरचं वस्त्र काढून बाजूला ठेवलं. मग त्याने एक दुसरं वस्त्र आपल्या कंबरेला गुंडाळलं.*+
५ त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कंबरेला गुंडाळलेल्या* वस्त्राने ते पुसू लागला.
६ तो शिमोन पेत्रजवळ आला तेव्हा पेत्र त्याला म्हणाला: “प्रभू, तू माझे पाय धुणार?”
७ येशू त्याला म्हणाला: “मी जे करतोय ते तुला आताच समजणार नाही, पण नंतर समजेल.”
८ पेत्र त्याला म्हणाला: “मी तुला कधीच माझे पाय धुऊ देणार नाही.” तेव्हा येशू म्हणाला: “मी जर तुझे पाय धुतले नाहीत,+ तर तुझा माझा काही संबंध नाही.”
९ त्यावर पेत्र म्हणाला: “प्रभू तसं असेल, तर माझे पायच नाही, हात आणि डोकंसुद्धा धू.”
१० येशू त्याला म्हणाला: “ज्याने अंघोळ केली आहे त्याचे नुसतेच पाय धुतले तरी चालेल, कारण तो पूर्णपणे शुद्ध आहे. तुम्ही शुद्ध आहात, पण तुमच्यापैकी सगळेच नाही.”
११ आपला विश्वासघात करणारा कोण आहे हे माहीत असल्यामुळे तो असं म्हणाला:+ “तुमच्यापैकी सगळेच शुद्ध नाहीत.”
१२ मग त्यांचे पाय धुतल्यावर त्याने आपलं बाहेरचं वस्त्र घातलं आणि तो पुन्हा जेवणाच्या मेजावर बसला. तो त्यांना म्हणाला: “मी आताच जे केलं त्याचा अर्थ तुम्हाला समजला का?
१३ तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते योग्य आहे, कारण मी तो आहेच.+
१४ मग मी प्रभू आणि गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले,+ तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.*+
१५ कारण जसं मी तुमच्यासाठी केलं, तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुमच्यासमोर आदर्श ठेवलाय.+
१६ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. तसंच, पाठवलेला हा त्याला पाठवणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ नसतो.
१७ तुम्हाला जर या गोष्टी कळत असतील, तर त्यांचं पालन केल्यामुळे तुम्ही सुखी व्हाल.+
१८ मी तुम्हा सगळ्यांबद्दल बोलत नाही. कारण ज्यांना मी निवडलंय त्यांना मी ओळखतो. पण हे यामुळे घडलं की शास्त्रात दिलेले शब्द पूर्ण व्हावेत:+ ‘जो माझी भाकर खात होता, त्यानेच माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.’*+
१९ काय घडणार आहे हे मी तुम्हाला आतापासूनच सांगतो, म्हणजे जेव्हा ते घडेल तेव्हा ते माझ्याबद्दलच सांगितलं होतं, यावर तुम्ही विश्वास ठेवाल.+
२० मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मी ज्याला पाठवलं त्याला जो स्वीकारतो, तो मलाही स्वीकारतो.+ आणि जो मला स्वीकारतो, तो मला पाठवणाऱ्यालाही स्वीकारतो.”+
२१ या गोष्टी बोलल्यावर येशू दुःखाने खूप व्याकूळ झाला. तो स्पष्टपणे म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+
२२ तो नेमकं कोणाबद्दल बोलत आहे, हे न समजल्यामुळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.+
२३ शिष्यांपैकी ज्याच्यावर येशूचं खूप प्रेम होतं,+ तो जेवणाच्या मेजावर त्याच्याशेजारी* बसला होता.
२४ त्यामुळे शिमोन पेत्रने त्या शिष्याला मानेने इशारा करून विचारलं: “आम्हाला सांग, तो कोणाबद्दल बोलतोय?”
२५ तेव्हा योहान येशूकडे वळून म्हणाला: “प्रभू, कोण आहे तो?”+
२६ येशूने उत्तर दिलं: “ज्याला मी भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.”+ मग त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोन इस्कर्योतचा मुलगा, यहूदा याला दिला.
२७ यहूदाने भाकरीचा तो तुकडा घेतल्यावर सैतानाने त्याच्या मनाचा ताबा घेतला.+ त्यामुळे येशू त्याला म्हणाला: “तू जे काही करत आहेस ते लवकर कर.”
२८ पण त्याने असं का म्हटलं, हे मेजावर बसलेल्या दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हतं.
२९ काहींना वाटलं, की यहूदाजवळ पैशांचा डबा असल्यामुळे+ येशू त्याला, “सणासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घे,” किंवा गरिबांना काहीतरी दे, असं सांगत असावा.
३० भाकरीचा तुकडा घेतल्यावर यहूदा लगेच बाहेर गेला. ती रात्रीची वेळ होती.+
३१ तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला: “आता मनुष्याच्या मुलाचा गौरव केला जातोय+ आणि त्याच्याद्वारे देवाचा गौरव होतोय.
३२ देव स्वतः त्याचा गौरव करेल+ आणि लगेच करेल.
३३ बाळांनो, मी अजून थोडाच वेळ तुमच्यासोबत आहे. तुम्ही मला शोधाल; आणि जसं मी यहुद्यांना सांगितलं, की ‘जिथे मी जातो तिथे तुम्ही येऊ शकत नाही,’+ तसंच आता तुम्हालाही सांगतो.
३४ मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं,+ तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.+
३५ तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”+
३६ शिमोन पेत्र त्याला म्हणाला: “प्रभू, तू कुठे जात आहेस?” येशूने उत्तर दिलं: “मी जिथे जातोय, तिथे तू आताच माझ्यामागे येऊ शकत नाहीस, पण नंतर येशील.”+
३७ पेत्र त्याला म्हणाला: “प्रभू, मी आता तुझ्यामागे का येऊ शकत नाही? मी तर तुझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे.”+
३८ येशू त्याला म्हणाला: “तू खरंच माझ्यासाठी जीव देशील? मी तुला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस तोपर्यंत कोंबडा आरवणारच नाही.”+
तळटीपा
^ शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
^ किंवा “कंबर कसली.”
^ किंवा “ज्याने कंबर कसली होती त्या.”
^ किंवा “धुवावेत हे तुमचं कर्तव्य आहे.”
^ शब्दशः “माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली आहे.” किंवा “माझ्याविरुद्ध उठलाय.”
^ शब्दशः “त्याच्या उराशी.”