योहानने सांगितलेला संदेश २:१-२५
२ मग तिसऱ्या दिवशी गालीलमधल्या काना इथे एका लग्नाची मेजवानी होती आणि येशूची आई तिथे होती.
२ येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही त्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं होतं.
३ मेजवानीत द्राक्षारस कमी पडला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
४ पण येशू तिला म्हणाला: “बाई, याच्याशी तुझं आणि माझं काय घेणंदेणं?* माझी वेळ अजून आली नाही.”
५ तेव्हा त्याची आई वाढणाऱ्यांना म्हणाली: “तुम्हाला तो जसं सांगेल तसं करा.”
६ तिथे यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या नियमांप्रमाणे+ सहा दगडी रांजण ठेवले होते. प्रत्येक रांजण ४४ ते ६६ लीटर* पाणी मावेल इतका मोठा होता.
७ येशू त्यांना म्हणाला: “रांजणांत पाणी भरा.” तेव्हा त्यांनी ते काठोकाठ भरले.
८ मग तो त्यांना म्हणाला: “आता त्यातलं थोडं काढून मेजवानीची देखरेख करणाऱ्याकडे न्या.” तेव्हा ते त्याच्याकडे घेऊन गेले.
९ मेजवानीची देखरेख करणाऱ्याने द्राक्षारसात बदललेलं ते पाणी चाखून पाहिलं. त्यांनी तो द्राक्षारस कुठून आणला होता, हे त्याला माहीत नव्हतं. (पण रांजणातून पाणी काढणाऱ्या सेवकांना ते माहीत होतं.) तेव्हा, त्याने नवऱ्या मुलाला बोलावलं.
१० तो त्याला म्हणाला: “सहसा लोक चांगला द्राक्षारस आधी देतात. मग लोकांना नशा चढल्यावर ते हलक्या प्रतीचा द्राक्षारस देतात. पण तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
११ अशा प्रकारे, येशूने गालीलमधल्या काना इथे पहिला चमत्कार* करून आपलं सामर्थ्य प्रकट केलं आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
१२ यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ+ आणि त्याचे शिष्य खाली कफर्णहूमला गेले.+ पण ते जास्त दिवस तिथे राहिले नाहीत.
१३ यहुद्यांचा वल्हांडण सण+ आता जवळ आला होता, म्हणून येशू वर यरुशलेमला गेला.
१४ तिथे त्याला गुरं, मेंढरं आणि कबुतरं+ विकणारे, तसंच पैसे बदलून देणारे मंदिरात बसलेले दिसले.
१५ तेव्हा त्याने दोऱ्यांचा चाबूक बनवून त्या सगळ्यांना त्यांच्या गुराढोरांसोबत मंदिरातून हाकलून लावलं. त्याने पैसे बदलून देणाऱ्यांची नाणी जमिनीवर टाकून दिली आणि त्यांचे मेज उलटून टाकले.+
१६ आणि कबुतरं विकणाऱ्यांना तो म्हणाला: “काढून टाका हे सगळं इथून! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!”+
१७ तेव्हा शिष्यांना त्याच्याबद्दल लिहिलेले हे शब्द आठवले, की “तुझ्या मंदिरासाठी असलेला आवेश मला झपाटून टाकेल.”+
१८ हे पाहून यहुदी त्याला म्हणाले: “तुला हे सगळं करायचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला एखादं चिन्ह दाखव.”+
१९ येशू त्यांना म्हणाला: “हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभं करीन.”+
२० तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “हे मंदिर बांधायला ४६ वर्षं लागली आणि तू ते तीन दिवसांत उभं करशील?”
२१ खरंतर मंदिर असं म्हणताना तो आपल्या शरीराबद्दल बोलत होता.+
२२ त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आल्यानंतर त्याच्या शिष्यांना हे आठवलं, की तो पूर्वी असं म्हणायचा+ आणि त्यांनी शास्त्रावर आणि येशूने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला.
२३ वल्हांडण सणाच्या वेळी तो यरुशलेममध्ये होता, तेव्हा तो करत असलेले चमत्कार पाहून बऱ्याच जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
२४ पण येशूने त्यांच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला नाही. कारण तो सगळ्यांना ओळखून होता.
२५ आणि लोकांबद्दल त्याला कोणी काही सांगायची गरज नव्हती. कारण माणसाच्या मनात काय आहे हे तो ओळखू शकत होता.+
तळटीपा
^ शब्दशः “बाई, मला आणि तुला त्याचं काय?” एखाद्या गोष्टीवर हरकत घेण्यासाठी या म्हणीचा वापर केला जायचा. “बाई” या शब्दातून अनादर व्यक्त होत नाही.
^ कदाचित हे बथ म्हटलेलं द्रव्य माप असावं. ते २२ लीटर इतकं होतं.
^ शब्दशः “चिन्ह.”