योहानने सांगितलेला संदेश ७:१-५२

  • येशू मंडपांच्या सणाला जातो (१-१३)

  • येशू सणाला आलेल्या लोकांना शिकवतो (१४-२४)

  • ख्रिस्ताबद्दल वेगवेगळी मतं (२५-५२)

 यानंतर येशू गालीलमध्येच फिरू लागला. त्याला यहूदीयात जायचं नव्हतं, कारण यहुदी लोक त्याला ठार मारायची संधी शोधत होते.+ २  आता यहुद्यांचा मंडपांचा* सण+ जवळ आला होता. ३  त्यामुळे, त्याचे भाऊ+ त्याला म्हणाले: “तू करत असलेली कामं तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून इथून निघून यहूदीयात जा. ४  लोकांनी आपल्याला ओळखावं असं ज्याला वाटतं, तो गुप्तपणे काहीही करत नाही. तू या गोष्टी करत आहेस, तर मग स्वतःला जगापुढे प्रकट कर.” ५  खरंतर त्याचे भाऊ त्याच्यावर विश्‍वास ठेवत नव्हते.+ ६  म्हणून येशू त्यांना म्हणाला: “माझी वेळ अजून आलेली नाही.+ पण तुमच्यासाठी कोणतीही वेळ योग्य आहे. ७  जगाला तुमचा द्वेष करायचं काहीच कारण नाही. पण जगाची कामं दुष्ट आहेत अशी मी त्याबद्दल साक्ष देत असल्यामुळे जग माझा द्वेष करतं.+ ८  तुम्ही वर यरुशलेमला सणासाठी जा. पण माझी वेळ अजून आलेली नाही,+ त्यामुळे मी आताच या सणाला येणार नाही.” ९  त्यांना असं सांगितल्यावर तो गालीलमध्येच राहिला. १०  त्याचे भाऊ सणाला गेल्यावर तोही गेला. पण तो सर्वांच्या देखत गेला नाही, तर गुप्तपणे गेला. ११  त्यामुळे सणाच्या वेळी यहुदी त्याला शोधू लागले आणि म्हणाले: “तो माणूस कुठे आहे?” १२  जमलेल्या लोकांमध्येही त्याच्याबद्दल बरीच कुजबुज चालली होती. काही लोक म्हणत होते: “तो चांगला माणूस आहे.” तर इतर जण म्हणत होते: “नाही, तो लोकांना फसवतो.”+ १३  पण, यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही उघडपणे त्याच्याबद्दल काहीही बोलत नव्हतं.+ १४  सण अर्धा संपल्यावर येशू मंदिरात गेला आणि तिथे शिकवू लागला. १५  तेव्हा यहुदी आश्‍चर्यचकित झाले आणि विचारू लागले: “हा माणूस धर्मगुरूंच्या शाळांमध्ये* शिकला नाही. मग याला शास्त्राचं* इतकं ज्ञान कसं काय?”+ १६  येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे.+ १७  ज्याला देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं असेल, त्याला ओळखता येईल, की ही शिकवण देवाकडून आहे,+ की मी स्वतःच्या मनाने बोलतो. १८  जो स्वतःच्या मनाने बोलतो, तो स्वतःची स्तुती व्हावी असा प्रयत्न करतो. पण जो आपल्या पाठवणाऱ्‍याची स्तुती करायचा प्रयत्न करतो,+ तो खरा आहे आणि त्याच्यामध्ये कसलाच खोटेपणा नाही. १९  मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिलं,+ नाही का? पण तुमच्यापैकी कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही माझ्या जिवावर का उठला आहात?”+ २०  तेव्हा लोकांनी उत्तर दिलं: “कोण तुझ्या जिवावर उठलंय? तुला दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलंय.” २१  येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी फक्‍त एक चमत्कार केला तर तुम्हा सगळ्यांना त्याचं आश्‍चर्य वाटतंय. २२  म्हणून यावर विचार करा: मोशेने तुम्हाला सुंतेबद्दलची* आज्ञा दिली होती.+ पण ती मोशेच्या काळापासून नाही, तर आपल्या पूर्वजांच्या काळापासूनच आहे.+ आणि त्यामुळे तुम्ही शब्बाथाच्या दिवशीही सुंता करता. २३  मोशेची आज्ञा मोडली जाऊ नये, म्हणून तुम्ही शब्बाथाच्या दिवशीही माणसाची सुंता करता. मग, मी शब्बाथाच्या दिवशी एका माणसाला पूर्णपणे बरं केलं,+ तर तुम्ही माझ्यावर इतके का संतापला? २४  वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय करायचं सोडून द्या आणि खरेपणाने न्याय करा.”+ २५  तेव्हा यरुशलेममध्ये राहणारे काही लोक म्हणू लागले: “ते ज्याला ठार मारायचा प्रयत्न करत आहेत, तो हाच माणूस आहे ना?+ २६  तरी बघा तो सर्वांसमोर कसा उघडपणे बोलतोय. आणि ते त्याला काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, अशी अधिकाऱ्‍यांना खातरी पटली की काय? २७  हा माणूस कुठला आहे हे आपल्याला माहीत आहे.+ पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला आहे हे कोणालाही माहीत नसेल.” २८  मग मंदिरात शिकवत असताना येशू मोठ्याने म्हणाला: “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी स्वतःहून आलेलो नाही+ तर मला पाठवणारा खरा आहे. पण त्याला तुम्ही ओळखत नाही.+ २९  मी त्याला ओळखतो+ कारण मी त्याच्या वतीने आलो आहे आणि त्यानेच मला पाठवलंय.” ३०  तेव्हा ते त्याला पकडायची संधी शोधू लागले.+ पण कोणीही त्याला हात लावला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती.+ ३१  तरी जमलेल्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.+ कारण ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो काय या माणसापेक्षा जास्त चमत्कार* करेल?” ३२  लोकांमध्ये त्याच्याबद्दल चाललेली ही कुजबुज परूश्‍यांनी ऐकली. तेव्हा मुख्य याजक आणि परूशी यांनी त्याला पकडायला* शिपायांना पाठवलं. ३३  तेव्हा येशू म्हणाला: “मी तुमच्यासोबत आता थोडाच काळ असेन. मग मला पाठवणाऱ्‍याकडे मी परत जाईन.+ ३४  तुम्ही मला शोधाल, पण मी तुम्हाला सापडणार नाही. आणि जिथे मी असेन तिथे तुम्ही येऊ शकत नाही.”+ ३५  म्हणून यहुदी आपसात म्हणू लागले: “हा माणूस असा कुठे जायला निघालाय, की आपल्याला तो सापडणार नाही? ग्रीक लोकांमध्ये विखुरलेल्या यहुद्यांकडे तर याला जायचं नाही ना? याला ग्रीक लोकांना शिकवायचंय की काय? ३६  ‘तुम्ही मला शोधाल, पण मी तुम्हाला सापडणार नाही आणि जिथे मी असेन तिथे तुम्ही येऊ शकत नाही,’ या त्याच्या बोलण्याचा काय अर्थ?” ३७  शेवटच्या दिवशी, म्हणजे सणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी+ येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला: “जो तहानलेला असेल त्याने माझ्याकडे यावं, म्हणजे मी त्याला प्यायला पाणी देईन.+ ३८  जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो, ‘त्याच्या अंतःकरणातून जीवन देणाऱ्‍या पाण्याचे झरे वाहतील,’ हे शास्त्रात लिहिलेले शब्द खरे ठरतील.”+ ३९  पण त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना लवकरच मिळणार असलेल्या पवित्र शक्‍तीबद्दल* तो हे बोलला होता. आतापर्यंत त्यांना पवित्र शक्‍ती मिळाली नव्हती,+ कारण अजून येशूचा गौरव करण्यात आला नव्हता.+ ४०  हे शब्द ऐकून जमलेल्या लोकांपैकी काही म्हणू लागले: “हा खरंच भविष्यवाणीत सांगितलेला संदेष्टा आहे.”+ ४१  इतर जण म्हणाले: “हाच ख्रिस्त आहे.”+ पण काही जण म्हणाले: “ख्रिस्त गालीलमधून येणार नव्हता.+ ४२  तो तर दावीदच्या वंशातून+ आणि दावीदच्या गावातून+ म्हणजे बेथलेहेममधून+ येईल असं शास्त्रात सांगितलंय.” ४३  अशा रितीने, जमलेल्या लोकांत त्याच्यावरून वाद निर्माण झाला. ४४  काहींना त्याला पकडायची* इच्छा होती, पण कोणीही त्याला हात लावला नाही. ४५  मग शिपाई, मुख्य याजकांकडे आणि परूश्‍यांकडे परत गेले. तेव्हा ते शिपायांना म्हणाले: “तुम्ही त्याला का पकडून आणलं नाही?” ४६  शिपायांनी उत्तर दिलं: “आम्ही कोणालाही आजपर्यंत असं बोलताना ऐकलेलं नाही.”+ ४७  तेव्हा परूशी म्हणाले: “तुम्हीपण फसला की काय? ४८  अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परूश्‍यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवलाय का?+ ४९  पण या लोकांना नियमशास्त्राचं ज्ञान नाही, हे शापित लोक आहेत.” ५०  निकदेम जो पूर्वी येशूकडे आला होता आणि जो परूश्‍यांपैकी एक होता, तो त्यांना म्हणाला: ५१  “एखाद्याचं ऐकून घेतल्याशिवाय आणि तो काय करतो हे जाणून घेतल्याशिवाय आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याला दोषी ठरवता येत नाही, येतं का?”+ ५२  तेव्हा ते त्याला म्हणाले: “तूसुद्धा गालीलचा आहेस की काय? शास्त्रात शोधून पाहा, गालीलमधून कोणताही संदेष्टा येईल असं सांगितलेलं नाही.”*

तळटीपा

किंवा “मांडवांचा.”
म्हणजे, रब्बींच्या शाळांमध्ये.
शब्दशः “लिखाणांचं.”
शब्दशः “चिन्हं.”
किंवा “अटक करायला.”
किंवा “अटक करायची.”
बऱ्‍याचशा जुन्या आणि महत्त्वाच्या हस्तलिखितांतून, ५३ व्या वचनापासून अध्याय ८ च्या ११ व्या वचनापर्यंतचा मजकूर गाळलेला आहे.