योहानने सांगितलेला संदेश ९:१-४१

  • जन्मापासून आंधळ्या माणसाला येशू बरं करतो (१-१२)

  • बऱ्‍या झालेल्या माणसाला परूशी प्रश्‍न विचारतात (१३-३४)

  • परूश्‍यांचा आंधळेपणा (३५-४१)

 मग तिथून जात असताना, येशूला जन्मापासून आंधळा असलेला एक माणूस दिसला. २  तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलं: “रब्बी,*+ हा माणूस कोणाच्या पापामुळे असा आंधळा जन्माला आला, याने केलेल्या पापामुळे की याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे?” ३  येशूने उत्तर दिलं: “याने किंवा याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे नाही, तर याच्या बाबतीत देवाचं सामर्थ्य* सगळ्यांना दिसावं म्हणून हा असा जन्माला आला.+ ४  ज्याने मला पाठवलं, त्याची कार्यं आपण दिवस असेपर्यंत केली पाहिजेत.+ कारण अशी रात्र येत आहे, जेव्हा कोणीही काम करू शकणार नाही. ५  या जगात असेपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”+ ६  या गोष्टी सांगितल्यावर येशू जमिनीवर थुंकला आणि थुंकीने मातीचा लेप तयार करून त्याने त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांवर लावला.+ ७  मग तो त्या माणसाला म्हणाला: “शिलोहच्या (म्हणजे, “पाठवलेला”) तळ्यात जाऊन डोळे धू.” तेव्हा तो गेला आणि त्याने आपले डोळे धुतले. तो परत आला तेव्हा त्याला दिसू लागलं होतं.+ ८  मग त्याचे शेजारीपाजारी आणि ज्यांनी त्याला पूर्वी भीक मागताना पाहिलं होतं, ते म्हणू लागले: “हा तोच माणूस आहे ना, जो बसून भीक मागायचा?” ९  काही म्हणाले: “हो, हा तोच आहे.” तर इतर जण म्हणाले: “नाही हा फक्‍त त्याच्यासारखा दिसतोय.” पण तो त्यांना सांगत होता की “मीच तो आहे.” १०  तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “मग, तुला कसं काय दिसू लागलं?” ११  त्याने उत्तर दिलं: “येशू नावाच्या एका माणसाने लेप बनवून माझ्या डोळ्यांवर लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहच्या तळ्यात जाऊन धू.’+ तेव्हा मी जाऊन डोळे धुतले आणि मला दिसू लागलं.” १२  यावर ते त्याला म्हणाले: “कुठे आहे तो माणूस?” तो म्हणाला: “मला माहीत नाही.” १३  मग पूर्वी आंधळ्या असलेल्या त्या माणसाला ते परूश्‍यांकडे घेऊन गेले. १४  येशूने ज्या दिवशी लेप तयार करून त्या माणसाला दृष्टी दिली होती,+ तो शब्बाथाचा दिवस होता.+ १५  म्हणून परूशीसुद्धा त्या माणसाला विचारू लागले, की तुला कसं काय दिसू लागलं? तो त्यांना म्हणाला: “त्याने माझ्या डोळ्यांवर एक लेप लावला, मग मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.” १६  तेव्हा परूश्‍यांपैकी काही जण म्हणू लागले: “तो माणूस देवापासून असू शकत नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.”+ पण इतर जण म्हणाले: “एक पापी माणूस इतके अद्‌भुत चमत्कार* कसे काय करू शकेल?”+ अशा रितीने त्यांच्यामध्ये फूट पडली.+ १७  मग ते पुन्हा त्या आंधळ्या माणसाला म्हणाले: “त्याने तुला दृष्टी दिली आहे, म्हणून तूच सांग, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?” तो माणूस म्हणाला: “तो संदेष्टा आहे.” १८  पण तो आंधळा होता आणि त्याला दृष्टी आली, यावर यहुद्यांचा विश्‍वास नव्हता. म्हणून, त्यांनी त्या माणसाच्या आईवडिलांना बोलावून आणलं. १९  त्यांनी त्यांना विचारलं: “हाच तुमचा मुलगा ना? तुम्ही म्हणता तो जन्मापासून आंधळा होता. मग आता याला कसं काय दिसतंय?” २०  त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिलं: “हो, हाच आमचा मुलगा आहे आणि हा जन्मापासून आंधळा होता, एवढंच आम्हाला माहीत आहे. २१  पण आता याला कसं काय दिसतंय, ते आम्हाला माहीत नाही. त्याला कोणी दृष्टी दिली, हेही आम्हाला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो समजदार आहे. तो स्वतःच सांगू शकतो.” २२  त्याचे आईवडील यहुद्यांच्या भीतीने असं बोलले.+ कारण यहुद्यांनी आधीच ठरवलं होतं, की येशू हा ख्रिस्त आहे असं जो कोणी म्हणेल त्याला सभास्थानातून बहिष्कृत केलं जाईल.+ २३  म्हणून त्याचे आईवडील म्हणाले: “तो समजदार आहे. त्यालाच विचारा.” २४  त्यामुळे त्यांनी पूर्वी आंधळ्या असलेल्या त्या माणसाला परत बोलावलं. ते त्याला म्हणाले: “देवाचा गौरव कर. आम्हाला माहीत आहे की तो माणूस पापी आहे.” २५  त्याने उत्तर दिलं: “तो पापी आहे की नाही ते मला माहीत नाही. मला इतकंच माहीत आहे, की आधी मी आंधळा होतो पण आता मला दिसतंय.” २६  तेव्हा ते त्याला म्हणाले: “त्याने काय केलं? तुझे डोळे कसे उघडले?” २७  तो म्हणाला: “मी तुम्हाला आधीच सांगितलं, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. मग, तुम्हाला पुन्हा तेच का ऐकायचंय? तुम्हालाही त्याचे शिष्य व्हायचंय की काय?” २८  तेव्हा ते तिरस्काराने त्याला म्हणाले: “तू असशील त्याचा शिष्य. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. २९  मोशेशी देव बोलला, हे आम्हाला माहीत आहे. पण हा कोण, कुठला ते आम्हाला माहीत नाही.” ३०  तो माणूस त्यांना म्हणाला: “याचंच मला आश्‍चर्य वाटतं, की तो कुठला हे तुम्हाला माहीत नाही, पण तरी त्याने मला दृष्टी दिली. ३१  आपल्याला माहीत आहे, की देव पापी लोकांचं ऐकत नाही.+ पण जो त्याला भिऊन वागतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचं तो ऐकतो.+ ३२  जुन्या काळापासून आजपर्यंत, कोणी जन्मापासून आंधळ्या माणसाला दृष्टी दिली, असं आपण कधीच ऐकलं नाही. ३३  जर हा माणूस देवापासून नसता, तर त्याला काहीच करता आलं नसतं.”+ ३४  तेव्हा ते त्याला म्हणाले: “तू तर पापातच जन्माला आलास आणि आम्हाला शिकवायला निघालास?” असं म्हणून त्यांनी त्याला हाकलून लावलं.+ ३५  त्यांनी त्या माणसाला हाकलून लावल्याचं येशूच्या कानावर आलं. मग, त्याला भेटल्यावर येशू म्हणाला: “मनुष्याच्या मुलावर तुझा विश्‍वास आहे का?” ३६  तो माणूस म्हणाला: “तो कोण आहे? मला सांगा, म्हणजे मी त्याच्यावर विश्‍वास ठेवीन.” ३७  येशू त्याला म्हणाला: “तू त्याला पाहिलं आहेस आणि खरंतर तुझ्याशी जो बोलतोय, तोच तो आहे.” ३८  तेव्हा तो म्हणाला: “प्रभू, माझा तुमच्यावर विश्‍वास आहे.” असं म्हणून त्याने त्याला नमन केलं. ३९  मग येशू म्हणाला: “याच न्यायासाठी मी जगात आलोय, की ज्यांना दिसत नाही, त्यांना दिसावं+ आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं.”+ ४०  हे ऐकून, तिथे असलेले परूशी म्हणाले: “आम्हीही आंधळे आहोत का?” ४१  येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही आंधळे असता, तर तुमच्यावर पापाचा दोष आला नसता. पण तुम्ही म्हणता की ‘आम्हाला दिसतं,’ त्यामुळे तुमचं पाप तसंच राहील.”+

तळटीपा

किंवा “गुरू.”
शब्दशः “देवाची कार्यं.”
शब्दशः “चिन्हं.”