रूथ २:१-२३

  • रूथ बवाजच्या शेतात धान्य गोळा करते (१-३)

  • रूथ आणि बवाज भेटतात (४-१६)

  • बवाजने दाखवलेल्या दयेबद्दल रूथ नामीला सांगते (१७-२३)

 नामीचा एक नातेवाईक होता. तो तिचा नवरा अलीमलेख याच्या घराण्यातला असून खूप श्रीमंत होता. त्याचं नाव बवाज+ होतं. २  मवाबी रूथ नामीला म्हणाली: “मी शेतांमध्ये जाऊ का? कोणी माझ्यावर दया केली तर मी त्याच्यामागे जाऊन शेतातून उरलेलं धान्य वेचून आणीन.”+ तेव्हा नामी तिला म्हणाली: “जा माझ्या मुली.” ३  मग ती शेतांत जाऊन कापणी करणाऱ्‍यांच्या मागे धान्याची उरलेली कणसं गोळा करू लागली. धान्य गोळा करता-करता ती अलीमलेखच्या+ घराण्यातला बवाज+ याच्या शेतात येऊन पोहोचली. ४  तितक्यात बवाज बेथलेहेममधून आपल्या शेतात आला. तो कापणी करणाऱ्‍यांना म्हणाला: “यहोवा तुमच्यासोबत असो!” ते त्याला म्हणाले: “यहोवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो!” ५  बवाजने कापणी करणाऱ्‍यांवर नेमलेल्या सेवकाला विचारलं: “ही मुलगी कोण?” ६  त्याने उत्तर दिलं: “ही मुलगी मवाबी+ आहे. ती नामीसोबत मवाब देशातून आली आहे.+ ७  ती मला म्हणाली, ‘मी कापणी करणाऱ्‍यांच्या मागे उरलेली कणसं* वेचू का?’+ ती सकाळी आल्यापासून धान्य वेचत आहे. आता कुठे ती जरा आराम करायला सावलीत बसली आहे.” ८  बवाज रूथला म्हणाला: “माझ्या मुली, ऐक. धान्य वेचायला दुसऱ्‍या कोणाच्या शेतात जाऊ नकोस. माझ्या शेतात काम करणाऱ्‍या बायकांसोबतच राहा.+ ९  त्या जिथे-जिथे कापणी करायला जातील तिथे-तिथे त्यांच्यासोबत जा. मी माझ्या माणसांना बजावलंय, की त्यांनी तुला त्रास देऊ नये. तुला तहान लागली तर माझ्या माणसांनी मडक्यांमध्ये पाणी भरून ठेवलंय, त्यांतून पी.” १०  हे ऐकल्यावर तिने जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमस्कार केला. मग ती म्हणाली: “मी परदेशी असूनही, माझ्याबद्दल काळजी दाखवून तुम्ही माझ्यावर दया का करत आहात?”+ ११  बवाज तिला म्हणाला: “तुझ्या पतीच्या मृत्यूनंतर तू आपल्या सासूसाठी जे काही केलंस, ते सर्व मी ऐकलंय. तू आपले आईवडील आणि आपला देश सोडून अनोळखी लोकांमध्ये कशी राहायला आलीस हेसुद्धा मला समजलंय.+ १२  या सर्व गोष्टींसाठी यहोवा तुला आशीर्वाद देवो.+ तू ज्याच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आलीस,+ तो इस्राएलचा देव यहोवा तुला पुरेपूर मोबदला देवो.” १३  यावर ती म्हणाली: “मालक, तुमची माझ्यावर अशीच दया राहू द्या. मी तुमच्या सेवकांपैकी नसतानाही तुम्ही माझ्याशी प्रेमळपणे बोलून मला दिलासा दिलाय.” १४  जेवणाच्या वेळी बवाज तिला म्हणाला: “इथे ये आणि थोडं खाऊन घे. तुझी भाकर या रसात* बुडवून खा.” तेव्हा ती कापणी करणाऱ्‍यांसोबत जेवायला बसली. मग त्याने तिला हुरडा* दिला. ती पोटभर जेवली आणि काही अन्‍न उरलंसुद्धा. १५  मग ती पुन्हा धान्य वेचायला उठली,+ तेव्हा बवाज आपल्या सेवकांना म्हणाला: “तिला कणसं* वेचू द्या. तिला त्रास देऊ नका.+ १६  उलट, पेंढ्यांमधली काही कणसं मुद्दामहून जमिनीवर टाका, म्हणजे तिला ती वेचता येतील; तिला अडवू नका.” १७  मग ती संध्याकाळपर्यंत शेतात धान्य वेचत राहिली.+ वेचलेल्या जवाची कणसं झोडून तिने धान्य गोळा केलं, तेव्हा ते जवळपास एक एफा* इतकं भरलं. १८  ते धान्य घेऊन ती शहरात गेली आणि तिने ते आपल्या सासूला दाखवलं. तसंच, पोटभर जेवल्यानंतर जे अन्‍न उरलं होतं+ तेसुद्धा तिने तिला काढून दिलं. १९  तेव्हा तिच्या सासूने विचारलं: “आज तू कोणाच्या शेतात धान्य वेचलंस? कुठे काम केलंस? ज्याने तुला दया दाखवली त्याला देव आशीर्वाद देवो.”+ यावर रूथ आपल्या सासूला म्हणाली: “आज मी बवाज नावाच्या एका माणसाच्या शेतात काम केलं.” २०  तेव्हा नामी आपल्या सुनेला म्हणाली: “जिवंतांवर आणि मरण पावलेल्यांवर एकनिष्ठ प्रेम दाखवण्याचं ज्याने सोडलं नाही, तो यहोवा देव त्याला आशीर्वाद देवो.”+ नामी पुढे म्हणाली: “हा माणूस आपला नातेवाईक आहे.+ आणि आपल्याला सोडवण्याचा हक्क* असणाऱ्‍यांपैकी तो एक आहे.”+ २१  मग मवाबी रूथ म्हणाली: “तो माणूस असंही म्हणाला, ‘पिकांची कापणी संपेपर्यंत माझ्या सेवकांसोबतच राहा.’”+ २२  नामी आपल्या सुनेला म्हणाली: “माझ्या मुली, तू त्याच्याच शेतात काम करणाऱ्‍या बायकांसोबत राहिलेलं बरं. तू दुसऱ्‍यांच्या शेतांत गेलीस, तर कदाचित तिथले लोक तुला त्रास देतील.” २३  म्हणून, जवाची आणि गव्हाची कापणी+ संपेपर्यंत रूथ बवाजच्याच शेतात काम करणाऱ्‍या बायकांसोबत धान्य गोळा करत राहिली. आणि तिने आपल्या सासूची साथ कधीही सोडली नाही.+

तळटीपा

किंवा कदाचित, “पेंढ्यांमधून पडलेली कणसं.”
किंवा “भाजलेलं धान्य.”
किंवा “आंबट द्राक्षारसात.”
किंवा कदाचित, “पेंढ्यांमधून पडलेली कणसं.”
२२ लीटरच्या भांड्यात मावेल इतकं धान्य. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूचीत “सोडवणारा” पाहा.