रूथ ३:१-१८

  • नामी रूथला काही गोष्टी करायला सांगते (१-४)

  • रूथ आणि बवाज खळ्यात भेटतात (५-१५)

  • रूथ नामीकडे परत येते (१६-१८)

 मग रूथची सासू नामी तिला म्हणाली: “माझ्या मुली, तू सुखात राहावं म्हणून मी तुझ्यासाठी स्थळ पाहायला नको का?+ २  तू ज्या माणसाच्या शेतात त्याच्या काम करणाऱ्‍या बायकांसोबत होतीस, तो बवाज खरंतर आपला नातेवाईकच आहे.+ आज रात्री तो खळ्यात* जवाची पाखडणी* करणार आहे. ३  तर आता, अंघोळ करून सुगंधी तेल लाव; चांगले कपडे घालून तयार हो आणि खळ्यात जा. पण, त्याचं खाणंपिणं संपेपर्यंत त्याच्यासमोर जाऊ नकोस. ४  तो रात्री कुठे झोपतो ते पाहून घे; नंतर तिथे जाऊन त्याच्या पायांवरचं पांघरूण काढ आणि त्याच्या पायांजवळ पडून राहा. मग काय करायचं ते तोच तुला सांगेल.” ५  त्यावर ती म्हणाली: “तुम्ही जसं सांगितलं तसंच मी करीन.” ६  मग ती खळ्याकडे गेली आणि तिच्या सासूने सांगितल्याप्रमाणे तिने सर्व काही केलं. ७  बवाजने आपलं खाणंपिणं उरकलं. तो खूप आनंदी होता. मग तो धान्याच्या ढिगाऱ्‍याजवळ जाऊन झोपला. त्यानंतर रूथ गुपचूप तिथे आली आणि त्याच्या पायांवरचं पांघरूण काढून तिथे झोपली. ८  मग मध्यरात्री तो दचकून जागा झाला. त्याने पुढे वाकून पाहिलं, तेव्हा त्याला आपल्या पायांजवळ एक स्त्री झोपलेली दिसली. ९  त्याने तिला विचारलं: “कोण आहेस तू?” त्यावर ती म्हणाली: “मी रूथ, तुमची दासी. तुमच्या या दासीला आपल्या पदराखाली घ्या. कारण, आम्हाला सोडवण्याचा हक्क* तुम्हाला आहे.”+ १०  तेव्हा तो तिला म्हणाला: “माझ्या मुली, यहोवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो. तू आधी जितकं एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतंस,+ त्यापेक्षा जास्त या वेळी दाखवलं आहेस. कारण, तू गरीब किंवा श्रीमंत अशा कोणत्याही तरुण माणसाच्या मागे गेली नाहीस. ११  तेव्हा मुली, घाबरू नकोस. तू म्हणतेस ते सगळं मी करीन.+ कारण तू एक सद्‌गुणी स्त्री आहेस हे शहरातल्या सगळ्यांना माहीत आहे. १२  हे खरंय की तुम्हाला सोडवण्याचा हक्क मला आहे;+ पण माझ्यापेक्षाही जवळचा दुसरा एक नातेवाईक आहे, आणि सोडवण्याचा पहिला हक्क त्याचा आहे.+ १३  आज रात्री इथेच राहा. सकाळी जर तो तुला सोडवायला तयार झाला तर ठीक आहे; त्याने तुला सोडवावं.+ पण जर तो तयार झाला नाही, तर जिवंत देवाची, यहोवाची शपथ घेऊन मी सांगतो, की मी तुला सोडवीन. तेव्हा सकाळपर्यंत इथेच झोपून राहा.” १४  म्हणून ती सकाळपर्यंत तिथेच त्याच्या पायांजवळ झोपून राहिली. आणि कोणी तिला पाहू नये म्हणून पहाटे अंधार असतानाच ती उठली. तो म्हणाला: “खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणालाही कळायला नको.” १५  तो असंही म्हणाला: “तुझ्या अंगावरची चादर पसर.” तिने ती पसरली तेव्हा त्याने सहा मापं* जवाचं धान्य त्यात टाकलं आणि ते तिला उचलून दिलं. मग बवाज शहराकडे निघून गेला. १६  रूथ आपल्या सासूकडे गेली, तेव्हा तिची सासू तिला म्हणाली: “मुली, काय झालं सांग?”* तेव्हा बवाजने आपल्यासाठी जे काही केलं, ते सगळं तिने नामीला सांगितलं. १७  पुढे ती म्हणाली, की “त्याने मला सहा मापं जव दिलं आणि म्हटलं, ‘रिकाम्या हाती आपल्या सासूकडे जाऊ नकोस.’” १८  त्यावर नामी म्हणाली: “माझ्या मुली, आता पुढे काय होतं ते समजेपर्यंत वाट पाहा. कारण आजच्या आज या गोष्टीचा निकाल लावल्याशिवाय तो माणूस स्वस्थ बसणार नाही.”

तळटीपा

धान्याच्या दाण्यापासून भुसा वेगळा करण्याची प्रक्रिया.
शब्दार्थसूचीत “सोडवणारा” पाहा.
कदाचित सहा सेया मापं, किंवा जवळजवळ ४४ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “तू कोण आहेस?”