रूथ ४:१-२२

  • बवाज जमीन सोडवणारा होतो (१-१२)

  • बवाज आणि रूथचा मुलगा ओबेद याचा जन्म (१३-१७)

  • दावीदची वंशावळ (१८-२२)

 मग बवाज शहराच्या दरवाजाजवळ जाऊन बसला.+ आणि ज्या जवळच्या नातेवाइकाबद्दल* तो बोलला होता,+ तो तिथून जात असल्याचा त्याला दिसला. तो त्या माणसाला* म्हणाला: “जरा इथे येऊन बस.” तेव्हा तो तिथे जाऊन बसला. २  मग बवाजने शहराच्या दहा वडीलजनांना+ बोलावून त्यांना म्हटलं: “जरा इकडे या आणि बसा.” तेव्हा तेही आले आणि येऊन बसले. ३  मग सोडवण्याचा हक्क* असलेल्या त्या माणसाला+ बवाज म्हणाला: “मवाब देशातून नामी परत आली आहे.+ आणि आपला नातेवाईक, अलीमलेख+ याची जमीन तिला विकावी लागत आहे. ४  ही गोष्ट तुझ्या कानावर घालावी असं मला वाटलं. कारण जमीन सोडवण्याचा पहिला हक्क तुझा आहे. म्हणून या शहरातल्या लोकांसमोर आणि वडीलजनांसमोर+ तुला ती विकत घेऊन सोडवायची असेल तर सोडव; नाहीतर मला सांग. कारण तुझ्यानंतर ती सोडवण्याचा हक्क मला आहे.” त्यावर तो माणूस म्हणाला: “मी ती सोडवायला तयार आहे.”+ ५  तेव्हा बवाज त्याला म्हणाला: “पण लक्षात घे, तू जेव्हा नामीकडून जमीन विकत घेशील, तेव्हा नामीच्या मुलाची विधवा, मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ती विकत घ्यावी लागेल; म्हणजे वारशाच्या जमिनीवर मृत व्यक्‍तीचं नाव कायम राहील.”+ ६  त्यावर सोडवण्याचा हक्क असलेला तो माणूस म्हणाला: “मी ती जमीन सोडवू शकत नाही. कारण, मी जर तसं केलं तर कदाचित माझंच* नुकसान होईल. माझा हक्क तू घे आणि तूच ती सोडव; मला ती सोडवता येणार नाही.” ७  त्या काळात इस्राएलमध्ये एक प्रथा होती. ती म्हणजे, सोडवण्याचा हक्क आणि देण्या-घेण्याचे व्यवहार कायद्याने पक्के करण्यासाठी एखाद्या माणसाला आपल्या पायातला जोडा काढून+ समोरच्या व्यक्‍तीला द्यावा लागायचा. इस्राएलमध्ये कराराला कायदेशीर स्वरूप देण्याची हीच पद्धत होती. ८  त्यामुळे सोडवण्याचा हक्क असलेल्या माणसाने जेव्हा बवाजला असं म्हटलं, की “तूच ती विकत घे,” तेव्हा त्याने आपल्या पायातला जोडा काढून त्याला दिला. ९  मग बवाज वडीलजनांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “अलीमलेख, खिल्योन आणि महलोन यांचं जे काही आहे, ते सगळं आज मी नामीकडून विकत घेतोय आणि याचे तुम्ही साक्षीदार आहात.+ १०  यासोबतच महलोनची विधवा, मवाबी रूथ हिला मी माझी बायको म्हणून स्वीकारत आहे. म्हणजे त्या मृत माणसाच्या वारशाच्या जमिनीवर त्याचं नाव कायम राहील;+ आणि त्याच्या नातेवाइकांतून व शहरातल्या लोकांमधून* त्याचं नाव नाहीसं होणार नाही. आज तुम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहात.”+ ११  त्यावर शहरातल्या दरवाजाजवळ असलेले वडीलजन आणि सगळे लोक म्हणाले: “हो, आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत! तुझ्या घरात तुझी बायको म्हणून जी स्त्री येत आहे, तिच्यावर यहोवाचा आशीर्वाद असो; आणि ज्यांच्यापासून इस्राएल राष्ट्र निर्माण झालं त्या राहेल आणि लेआ यांच्यासारखी ती होवो.+ एफ्राथामध्ये+ तुझी भरभराट होवो आणि बेथलेहेममध्ये+ तुझं नाव मोठं होवो. १२  या तरुण स्त्रीच्या पोटी यहोवा जे मूल तुला देईल+ त्याच्याद्वारे तुझं घराणं, तामारला यहूदापासून झालेल्या पेरेसच्या+ घराण्यासारखं होवो.” १३  त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केलं आणि ती त्याची बायको बनली. त्याने तिच्याशी संबंध ठेवले, आणि यहोवाच्या आशीर्वादाने तिला गर्भ राहिला व तिने एका मुलाला जन्म दिला. १४  तेव्हा इतर स्त्रिया नामीला म्हणाल्या: “यहोवाची स्तुती होवो! कारण त्याने आज तुम्हाला एक सोडवणारा दिलाय. संपूर्ण इस्राएलमध्ये त्या मुलाचं नाव होवो! १५  त्याच्यामुळे* तुला एक नवीन जीवन मिळालंय, आणि तुझ्या म्हातारपणात तो तुझा आधार होईल. कारण तुझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्‍या+ आणि तुझ्यासाठी सात मुलांपेक्षाही अधिक असलेल्या तुझ्या सुनेच्या पोटी तो जन्माला आलाय.” १६  नामीने मग त्या मुलाला आपल्या कुशीत घेतलं आणि ती त्याचा सांभाळ करू लागली.* १७  मग शेजारपाजारच्या स्त्रिया म्हणू लागल्या: “नामीला मुलगा झालाय.” त्यांनी त्या मुलाचं नाव ओबेद+ असं ठेवलं. ओबेद हा इशायचा+ पिता, आणि दावीदचा आजोबा होता. १८  पेरेसची+ वंशावळ ही: पेरेसला हेस्रोन+ झाला; १९  हेस्रोनला राम; रामला अम्मीनादाब;+ २०  अम्मीनादाबला+ नहशोन; नहशोनला सल्मोन; २१  सल्मोनला बवाज; बवाजला ओबेद; २२  ओबेदला इशाय+ आणि इशायला दावीद+ झाला.

तळटीपा

त्या माणसाचं नाव दिलेलं नाही.
शब्दशः “सोडवणाऱ्‍याबद्दल.”
शब्दार्थसूचीत “सोडवणारा” पाहा.
शब्दशः “माझ्या वारशाचं.”
शब्दशः “त्याच्या शहराच्या दरवाजातून.”
म्हणजे, नामीचा नातू.
किंवा “ती त्याची दाई बनली.”