रोमकर यांना पत्र ३:१-३१

  • “देव खरा ठरेल” (१-८)

  • यहुदी आणि ग्रीक असे सगळेच पापाच्या अधीन आहेत (९-२०)

  • विश्‍वासाद्वारे नीतिमान (२१-३१)

    • देवाचे गुण दाखवण्यात सगळेच कमी पडतात (२३)

 तर मग यहुदी असण्याचा आणि सुंतेचा काय फायदा? २  बरेच फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, देवाची पवित्र वचनं यहुद्यांनाच सोपवण्यात आली होती.+ ३  पण काहींनी विश्‍वास ठेवला नाही तर काय झालं? त्यांच्या अविश्‍वासामुळे देवाचा विश्‍वासूपणा व्यर्थ ठरेल का? ४  मुळीच नाही! उलट, प्रत्येक माणूस खोटा ठरला,+ तरी देव खरा ठरेल.+ कारण असं लिहिण्यात आलं आहे: “तुझ्या शब्दांनी तू नीतिमान ठरावं आणि ते तुझ्यावर आरोप लावतील, तेव्हा तू त्यांना खोटं सिद्ध करावं.”+ ५  पण आपल्या अनीतिमानपणाने जर देवाचं नीतिमत्त्व जास्त ठळकपणे दिसून येत असेल, तर काय म्हणता येईल? देव त्याचा क्रोध व्यक्‍त करून अन्याय करत आहे, असं म्हणता येईल का? (मी माणसांच्या दृष्टिकोनाने बोलत आहे.) ६  मुळीच नाही! नाहीतर, देव जगाचा न्याय कसा करेल?+ ७  पण जर मी खोटं बोलल्यामुळे देवाचं सत्य जास्त उठून दिसत असेल, आणि त्यामुळे जर त्याचा गौरव होत असेल, तर मग देव मला पापी का ठरवतो? ८  आणि, “चांगल्या गोष्टी घडून येत असतील तर चला, आपण वाईट गोष्टी करू,” असं आपण का म्हणू नये? खरंतर, आम्ही असं म्हणत असल्याचा खोटा आरोप काही जण आमच्यावर करतात. अशा माणसांवर येणारा न्यायदंड देवाच्या न्यायाला धरून आहे.+ ९  तर मग काय म्हणता येईल? आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असं म्हणता येईल का? मुळीच नाही! कारण आपण याआधीच सिद्ध केलं आहे, की यहुदी आणि ग्रीक असे सगळेच पापाच्या अधीन आहेत.+ १०  आणि असं लिहिलंही आहे, की “कोणीही माणूस नीतिमान नाही, एकसुद्धा नाही.+ ११  सखोल समज असलेला कोणीही नाही. एकही जण देवाचा शोध घेत नाही. १२  सर्व माणसं भरकटली आहेत, सर्व निरुपयोगी झाली आहेत. दयेने वागणारा कोणीही नाही, अगदी एकही नाही.”+ १३  “त्यांचं तोंड म्हणजे उघडी कबर! त्यांनी आपल्या जिभेने फसवणूक केली आहे.”+ “त्यांच्या तोंडात सापांचं जहर असतं.”+ १४  “आणि त्यांच्या तोंडात कायम शिव्याशाप आणि कडूपणा असतो.”+ १५  “त्यांचे पाय रक्‍तपात करण्याची घाई करतात.”+ १६  “त्यांचे सगळे मार्ग विनाशाचे आणि दुःखाचेच आहेत. १७  आणि त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.”+ १८  “त्यांच्या डोळ्यांत देवाची जराही भीती नाही.”+ १९  आपल्याला माहीत आहे, की नियमशास्त्रात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, नियमशास्त्र पाळणाऱ्‍यांना उद्देशून आहेत. यामुळे त्यांच्यापैकी कोणीही निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही आणि संपूर्ण जग देवाच्या न्यायदंडाला पात्र ठरतं.+ २०  म्हणून नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने पापाची जाणीव होते.+ २१  पण नियमशास्त्राशिवाय देवाच्या नजरेत नीतिमान ठरणं शक्य आहे, हे आता प्रकट करण्यात आलं आहे.+ आणि नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांमध्येही हे सांगण्यात आलं होतं.+ २२  हो, येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे, विश्‍वास ठेवणारे सगळेच देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतात. या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+ २३  कारण सगळ्यांनीच पाप केलं आहे आणि ते देवाचे गौरवशाली गुण दाखवण्यात कमी पडतात.+ २४  पण देव आपल्याला नीतिमान ठरवतो, ही त्याची अपार कृपा आहे+ आणि हे त्याच्याकडून मिळणारं मोफत दान आहे.+ ख्रिस्त येशूने आपल्या सुटकेसाठी भरलेल्या खंडणीद्वारे देव आपल्याला नीतिमान ठरवतो.+ २५  ख्रिस्ताच्या रक्‍तावर विश्‍वास ठेवण्याद्वारे+ प्रायश्‍चित्त* होण्यासाठी देवाने त्याला बलिदान म्हणून अर्पण केलं.+ पूर्वीच्या काळात घडलेल्या पापांची धीराने क्षमा करताना देव नीतिमान होता, हे दाखवण्यासाठी त्याने असं केलं. २६  तसंच, आजच्या काळात येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या माणसाला नीतिमान ठरवतानाही देव नीतिमान आहे, हे दाखवण्यासाठी त्याने असं केलं.+ २७  तर मग, बढाई मारायचं कारण काय? खरंतर त्यासाठी जागाच उरत नाही. कोणत्या नियमामुळे? कार्यांना महत्त्व देणाऱ्‍या नियमामुळे का?+ नाही, तर विश्‍वासाच्या नियमामुळे. २८  कारण माणूस हा नियमशास्त्रात सांगितलेली कार्यं केल्याने नाही, तर विश्‍वासाने नीतिमान ठरतो असं आम्ही मानतो.+ २९  देव काय फक्‍त यहुद्यांचाच आहे का?+ तो विदेशी लोकांचाही देव नाही का?+ हो, तो विदेशी लोकांचाही देव आहे.+ ३०  देव एकच आहे,+ त्यामुळे तो सुंता झालेल्या लोकांना विश्‍वासामुळे नीतिमान ठरवेल,+ आणि सुंता न झालेल्या लोकांनाही विश्‍वासाद्वारेच नीतिमान ठरवेल.+ ३१  तर मग, आपल्या विश्‍वासाद्वारे आपण नियमशास्त्र रद्द करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्राचं समर्थन करतो.+

तळटीपा

किंवा “देवासोबत समेट.”