रोमकर यांना पत्र ६:१-२३
६ तर मग, आता आपल्याला काय म्हणता येईल? अपार कृपा वाढावी म्हणून आपण पाप करत राहावं का?
२ नक्कीच नाही! आपण पापाच्या बाबतीत मेलो आहोत.+ तर मग, यापुढे आपण पापात कसं काय जगू शकतो?+
३ ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा* झालेल्या आपल्या सगळ्यांचा+ त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?+
४ त्याच्या मरणात झालेल्या आपल्या बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला त्याच्यासोबत पुरण्यात आलं.+ हे यासाठी झालं, की पित्याच्या गौरवाद्वारे ज्या प्रकारे ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं, त्याच प्रकारे आपणही एक नवीन जीवन जगावं.+
५ त्याच्यासारखाच मृत्यू झाल्यामुळे आपण त्याच्यासोबत एक झालो आहोत.+ त्याचप्रमाणे, त्याच्यासारखं पुनरुत्थान* होण्याद्वारेही आपण नक्कीच त्याच्यासोबत एक होऊ.+
६ कारण आपल्याला माहीत आहे, की आपलं जुनं व्यक्तिमत्त्व ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आलं.+ आपल्या पापी शरीराचा आपल्यावरचा अधिकार संपून+ आपण यापुढे पापाचे दास राहू नये, म्हणून हे झालं.+
७ कारण जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे. *
८ शिवाय, जर आपण ख्रिस्तासोबत मेलो आहोत, तर आपला असा विश्वास आहे की आपण त्याच्यासोबत जगणारही आहोत.
९ कारण आपल्याला हे माहीत आहे, की आता ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं असल्यामुळे+ तो पुन्हा कधीही मरणार नाही.+ मृत्यूचा आता त्याच्यावर अधिकार राहिला नाही.
१० कारण जेव्हा ख्रिस्ताचा मृत्यू झाला, तेव्हा तो पापाच्या बाबतीत* एकदाच मेला.+ पण आता तो जे जीवन जगतो ते देवासाठी जगतो.
११ त्याच प्रकारे, तुम्हीही स्वतःला पापाच्या बाबतीत मेलेले, पण देवासाठी ख्रिस्त येशूद्वारे जिवंत झालेले असे समजा.+
१२ म्हणूनच, मरणाच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरात पापाला राजा म्हणून राज्य करू देऊ नका.+ आणि आपल्या शरीराच्या वासनांच्या आहारी जाऊ नका.
१३ तसंच, आपल्या शरीराला* अनीतीचं साधन* होण्यासाठी पापाच्या हाती सोपवू नका. तर मेलेल्यांतून जिवंत झालेले या नात्याने, आपलं शरीर* नीतिमत्त्वाचं साधन होण्यासाठी देवाच्या हाती सोपवा.+
१४ आता तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसून अपार कृपेच्या अधीन आहात.+ म्हणून आता तुमच्यावर पापाने अधिकार चालवू नये.+
१५ तर मग आता काय म्हणता येईल? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून, अपार कृपेच्या अधीन असल्यामुळे पाप करावं का?+ नक्कीच नाही!
१६ तुम्ही स्वतःला एखाद्याच्या स्वाधीन करून त्याच्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही त्याचे दास ठरता हे तुम्हाला माहीत नाही का?+ त्याच प्रकारे जर तुम्ही पापाचे दास झालात,+ तर त्याचा परिणाम मृत्यू असेल.+ पण जर तुम्ही देवाचे दास होऊन त्याच्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही नीतिमान ठराल.
१७ जरी एकेकाळी तुम्ही पापाचे दास होता, तरी देवाच्या कृपेने, तुम्हाला सोपवण्यात आलेल्या शिक्षणाच्या नमुन्याचं तुम्ही मनापासून पालन केलं.
१८ हो, तुम्हाला पापापासून मुक्त करण्यात आल्यामुळे+ तुम्ही नीतिमत्त्वाचे दास बनला.+
१९ तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे मी मानवांच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. पूर्वी तुम्ही आपल्या अवयवांना दास म्हणून अशुद्धतेच्या आणि अनीतीच्या स्वाधीन केलं आणि अनीतीने वागलात. त्याच प्रकारे, आता आपल्या अवयवांना दास म्हणून नीतिमत्त्वाच्या स्वाधीन करा, म्हणजे तुम्ही पवित्र कार्यं कराल.+
२० कारण पापाचे दास असताना नीतिमत्त्वाच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र होता.
२१ तर मग, त्या वेळी तुम्ही कोणतं फळ उत्पन्न करत होता? तुम्ही अशा गोष्टी करत होता, ज्यांची आता तुम्हाला लाज वाटते. कारण त्या गोष्टींचा परिणाम मृत्यू आहे.+
२२ पण तुम्हाला पापापासून मुक्त करण्यात आलं आहे आणि आता तुम्ही देवाचे दास बनला आहात. म्हणूनच तुम्ही पवित्रतेच्या मार्गात फळ उत्पन्न करत आहात+ आणि त्याचा परिणाम सर्वकाळाचं जीवन आहे.+
२३ कारण पापाची मजुरी तर मृत्यू आहे,+ पण देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे+ सर्वकाळाचं जीवन हे आहे.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मुक्त झाला आहे; त्याला क्षमा करण्यात आली आहे.”
^ म्हणजे, पाप काढून टाकण्यासाठी.
^ शब्दशः “अवयवांना.”
^ शब्दशः “शस्त्रं.”
^ शब्दशः “अवयव.”