लूकने सांगितलेला संदेश १३:१-३५

  • पश्‍चात्ताप केला नाही तर नाश (१-५)

  • फळ न देणाऱ्‍या अंजिराच्या झाडाचं उदाहरण (६-९)

  • वाकलेल्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं जातं (१०-१७)

  • मोहरीच्या दाण्याचं आणि खमिराचं उदाहरण (१८-२१)

  • अरुंद दारातून आत जाण्यासाठी प्रयत्न गरजेचे (२२-३०)

  • येशू हेरोदला ‘कोल्हा’ म्हणतो (३१-३३)

  • येशू यरुशलेमबद्दल दुःख व्यक्‍त करतो (३४, ३५)

१३  त्या वेळी तिथे असलेल्या काही जणांनी येशूला सांगितलं, की पिलातने गालीलच्या काही लोकांना बलिदानं अर्पण करताना ठार मारलं होतं. २  तेव्हा तो त्यांना म्हणाला: “गालीलच्या त्या लोकांना या गोष्टी सोसाव्या लागल्या, म्हणून ते गालीलच्या इतर सगळ्या लोकांपेक्षा जास्त पापी होते, असं तुम्हाला वाटतं का? ३  मी तुम्हाला सांगतो, ते नव्हते. पण तुम्ही जर पश्‍चात्ताप केला नाही तर तुमच्या सगळ्यांचाही अशाच प्रकारे नाश होईल.+ ४  किंवा, ज्या १८ जणांवर शिलोहचा बुरूज पडून त्यांचा मृत्यू झाला, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या इतर सगळ्या माणसांपेक्षा जास्त दोषी होते, असं तुम्हाला वाटतं का? ५  मी तुम्हाला सांगतो, ते नव्हते. पण तुम्ही जर पश्‍चात्ताप केला नाही तर तुमच्या सगळ्यांचाही त्यांच्यासारखाच नाश होईल.” ६  मग त्याने हे उदाहरण सांगितलं: “एका माणसाने आपल्या द्राक्षमळ्यात अंजिराचं एक झाड लावलं. त्याला फळ लागलं का, हे पाहायला तो आला पण त्याला एकही फळ दिसलं नाही.+ ७  तेव्हा तो माळ्याला म्हणाला, ‘मी तीन वर्षांपासून या अंजिराच्या झाडाला फळ लागतं का, हे पाहायला येतो. पण आजपर्यंत मला काहीच मिळालं नाही. म्हणून ते तोडून टाक! त्याने उगीच जागा का अडवावी?’ ८  माळी त्याला म्हणाला, ‘मालक, आणखी एक वर्षभर हे झाड राहू द्या. मी त्याच्याभोवतीची जमीन खणून खत घालीन. ९  जर पुढे त्याला फळ आलं तर ठीक, नाहीतर ते कापून टाका.’”+ १०  नंतर, तो शब्बाथाच्या दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. ११  तिथे एक स्त्री होती. तिला १८ वर्षांपासून दुष्ट स्वर्गदूताने* पछाडल्यामुळे ती आजारी होती. ती कमरेपासून वाकली होती आणि तिला सरळ उभं राहणं शक्यच नव्हतं. १२  येशूने तिला पाहिलं तेव्हा तो तिला म्हणाला: “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्‍त झालीस.”+ १३  मग त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ उभी राहिली आणि देवाची स्तुती करू लागली. १४  पण येशूने त्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं हे पाहून, सभास्थानाचा अधिकारी संतापला आणि जमलेल्या लोकांना म्हणाला: “काम करण्यासाठी सहा दिवस असतात.+ तेव्हा त्या दिवसांत येऊन तुमचे आजार बरे करून घेत जा, शब्बाथाच्या दिवशी नाही.”+ १५  पण प्रभूने त्याला उत्तर दिलं: “अरे ढोंग्यांनो,+ तुमच्यापैकी प्रत्येक जण शब्बाथाच्या दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला सोडून त्याला पाणी पाजायला नेत नाही का?+ १६  तर मग, अब्राहामची मुलगी असलेली ही स्त्री, जिला सैतानाने १८ वर्षांपासून बांधून ठेवलं होतं, तिला शब्बाथाच्या दिवशी या बंधनातून मोकळं करणं योग्यच नाही का?” १७  तो असं बोलला तेव्हा त्याचा विरोध करणाऱ्‍या सगळ्यांना लाज वाटली. पण जमलेल्या लोकांना त्याने केलेली अद्‌भुत कार्यं पाहून आनंद झाला.+ १८  तेव्हा तो म्हणाला: “देवाचं राज्य कशासारखं आहे आणि मी त्याची तुलना कशाशी करू? १९  ते एका माणसाने आपल्या शेतात पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे. तो दाणा वाढून त्याचं झाड झालं आणि आकाशातल्या पक्ष्यांनी त्याच्या फांद्यांत घरटी बांधली.”+ २०  मग तो पुन्हा म्हणाला: “देवाच्या राज्याची तुलना मी कशाशी करू? २१  ते अशा खमिरासारखं* आहे, जे एका स्त्रीने तीन मापं* पिठामध्ये घातलं आणि त्यामुळे सगळं पीठ फुगलं.”+ २२  मग तो शहरोशहरी आणि गावोगावी लोकांना शिकवत, यरुशलेमच्या दिशेने पुढे जाऊ लागला. २३  तेव्हा एक माणूस त्याला म्हणाला: “प्रभू, मोजक्याच लोकांचं तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला: २४  “अरुंद दारातून आत जायचा कसोशीने प्रयत्न करा.+ कारण मी तुम्हाला सांगतो, की बरेच जण आत जायचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता येणार नाही. २५  घरमालकाने उठून दार बंद केल्यानंतर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावाल आणि म्हणाल: ‘प्रभू, आमच्यासाठी दार उघड.’+ पण तो तुम्हाला उत्तर देईल: ‘तुम्ही कोण आहात, मला माहीत नाही.’ २६  मग तुम्ही त्याला म्हणाल, ‘आम्ही तुझ्यासोबत खातपीत होतो आणि तू आमच्या मुख्य रस्त्यांवर शिकवायचास.’+ २७  पण तो म्हणेल, ‘मी तुम्हाला ओळखत नाही. अरे अनीतीने वागणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा!’ २८  अब्राहाम, इसहाक, याकोब आणि इतर सगळे संदेष्टे देवाच्या राज्यात आहेत, पण आपल्याला तर बाहेर टाकून देण्यात आलंय, हे तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही रडाल आणि आक्रोश कराल.*+ २९  शिवाय पूर्वेकडून आणि पश्‍चिमेकडून, तसंच उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येतील आणि देवाच्या राज्यात एकाच मेजावर बसून जेवतील. ३०  आणि पाहा! जे शेवटचे त्यांच्यापैकी काही पहिले असतील आणि जे पहिले त्यांच्यापैकी काही शेवटचे असतील.”+ ३१  तेवढ्यात काही परूशी त्याच्याकडे येऊन म्हणाले: “इथून निघून जा कारण हेरोद तुला मारून टाकणार आहे.” ३२  तेव्हा तो त्यांना म्हणाला: “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, ‘पाहा! मी आज आणि उद्या दुष्ट स्वर्गदूत काढीन आणि लोकांना बरं करीन आणि तिसऱ्‍या दिवशी माझं काम पूर्ण होईल.’ ३३  पण आज, उद्या आणि परवा मला पुढे प्रवास करावा लागेल. कारण कोणत्याही संदेष्ट्याला यरुशलेमच्या बाहेर ठार मारलं जाणं शक्य नाही.*+ ३४  यरुशलेम, यरुशलेम, संदेष्ट्यांची हत्या करणारी आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारी नगरी!+ कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते, तसंच तुमच्या मुलांना एकत्र करण्याची माझी कितीतरी वेळा इच्छा होती! पण तुम्हाला ते नको होतं.+ ३५  म्हणून पाहा! देवाने तुमच्या घराचा* त्याग केलाय.+ कारण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही ‘यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो,’ असं म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही!”+

तळटीपा

म्हणजे, तीन सेया मापं, म्हणजे जवळजवळ १० किलो.
म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “दात खाल.”
किंवा “अशी कल्पनाही करता येत नाही.”
म्हणजे, मंदिराचा.
अति. क५ पाहा.