लूकने सांगितलेला संदेश २:१-५२

  • येशूचा जन्म (१-७)

  • मेंढपाळांसमोर स्वर्गदूत प्रकट होतात (८-२०)

  • सुंता आणि शुद्धीकरण (२१-२४)

  • शिमोन ख्रिस्ताला पाहतो (२५-३५)

  • बाळ येशूबद्दल हन्‍ना बोलते (३६-३८)

  • नासरेथला परत येणं (३९, ४०)

  • मंदिरात १२ वर्षांचा येशू (४१-५२)

 त्या दिवसांत, कैसर* औगुस्त याने असा हुकूम काढला, की त्याच्या संपूर्ण साम्राज्यातल्या* लोकांच्या नावांची नोंदणी केली जावी. २  (क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल होता, तेव्हा पहिली नावनोंदणी करण्यात आली.) ३  त्यामुळे सगळे लोक नावनोंदणी करायला आपापल्या मूळ गावी गेले. ४  मग योसेफसुद्धा+ गालीलमधल्या नासरेथ शहरातून यहूदीयातल्या दावीदच्या बेथलेहेम+ शहरात गेला. कारण तो दावीदच्या घराण्यातला आणि कुळातला होता. ५  तो आपली बायको,+ मरीया हिच्यासोबत नावनोंदणी करायला गेला. ती गरोदर होती आणि लवकरच बाळाला जन्म देणार होती.+ ६  ते तिथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली ७  आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.+ तिने त्याला कापडांत गुंडाळून गव्हाणीत* ठेवलं,+ कारण मुक्काम करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळाली नाही. ८  त्याच भागात, काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपल्या कळपांची राखण करत होते. ९  अचानक यहोवाचा* दूत त्यांच्यासमोर उभा राहिला आणि यहोवाचं* तेज त्यांच्याभोवती चमकू लागलं. तेव्हा ते खूप घाबरले. १०  पण स्वर्गदूत त्यांना म्हणाला: “घाबरू नका, कारण पाहा! सगळ्या लोकांना जो मोठा आनंद होणार आहे, त्याबद्दलचा आनंदाचा संदेश मी तुम्हाला सांगतोय. ११  कारण आज दावीदच्या शहरात+ एका तारणकर्त्याचा+ जन्म झालाय. तो ख्रिस्त प्रभू आहे.+ १२  त्याला ओळखण्याची खूण म्हणजे, कापडांत गुंडाळलेलं आणि गव्हाणीत ठेवलेलं एक बाळ तुम्हाला दिसेल.” १३  मग अचानक, त्या स्वर्गदूतासोबत स्वर्गातलं मोठं सैन्य दिसलं+ आणि ते देवाची स्तुती करत होते आणि म्हणत होते: १४  “स्वर्गातल्या देवाचा गौरव असो आणि पृथ्वीवर तो ज्यांच्याविषयी संतुष्ट* आहे त्या लोकांना शांती मिळो!” १५  मग स्वर्गदूत तिथून निघून स्वर्गात परत गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ या आणि ज्या घटनेबद्दल यहोवाने* आपल्याला कळवलंय, ती पाहू या.” १६  तेव्हा, ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया आणि योसेफ, तसंच गव्हाणीत झोपलेलं बाळ दिसलं. १७  हे पाहिल्यावर, त्या लहान बाळाबद्दल स्वर्गदूताने जे काही म्हटलं होतं ते त्यांनी सगळ्यांना सांगितलं. १८  तेव्हा मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणारे सगळे लोक चकित झाले. १९  पण मरीयाने या सगळ्या गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या आणि त्यांचा काय अर्थ असेल याचा ती विचार करू लागली.+ २०  मग ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल देवाचा गौरव आणि स्तुती करून मेंढपाळ परत गेले. त्यांना जसं सांगण्यात आलं होतं, अगदी तसंच सगळं घडलं होतं. २१  आठ दिवसांनी बाळाची सुंता करायची वेळ आली,+ तेव्हा त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. हे नाव स्वर्गदूताने त्याची गर्भधारणा होण्याआधीच ठेवलं होतं.+ २२  मग, मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांच्या शुद्धीकरणाची वेळ आली+ तेव्हा ते त्याला यहोवापुढे* सादर करण्यासाठी यरुशलेमला घेऊन आले. २३  यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगितलेल्या या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं: “प्रत्येक पहिला जन्मलेला नर यहोवासाठी* वेगळा* केला जावा.”+ २४  आणि “दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं द्यावीत,”+ असं जे यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी बलिदान अर्पण केलं. २५  यरुशलेममध्ये शिमोन नावाचा एक नीतिमान आणि देवाची भीती बाळगणारा माणूस होता. देव इस्राएलचं सांत्वन करेल, त्या वेळेची तो वाट पाहत होता+ आणि त्याच्यावर पवित्र शक्‍ती* होती. २६  शिवाय, यहोवाने* पाठवलेल्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय त्याला मरण येणार नाही, हे पवित्र शक्‍तीद्वारे देवाने त्याला दाखवून दिलं होतं. २७  मग, पवित्र शक्‍तीच्या सामर्थ्याने तो मंदिरात आला. नियमशास्त्रात सांगितलेल्या रिवाजाप्रमाणे करण्यासाठी बाळ येशूचे आईवडील त्याला घेऊन आले,+ २८  तेव्हा शिमोनने त्या मुलाला आपल्या हातांत घेतलं आणि देवाची स्तुती करून तो म्हणाला: २९  “हे सर्वोच्च प्रभू, आता तुझा दास शांतीने मरू शकतो.+ कारण तू सांगितल्याप्रमाणे, ३०  ज्याच्याद्वारे तू तारण करणार आहेस त्याला मी पाहिलंय.+ ३१  सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांनी त्याला पाहावं म्हणून तू त्याला पाठवलं आहेस.+ ३२  तो राष्ट्रांच्या डोळ्यांवरचा पडदा दूर करणारा+ प्रकाश+ आणि तुझे लोक इस्राएल यांचा गौरव आहे.” ३३  बाळाबद्दल सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्‍चर्यचकित झाले. ३४  मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, म्हणजे मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये बऱ्‍याच जणांच्या पडण्याचं आणि पुन्हा उठण्याचं कारण ठरेल+ आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील.+ ३५  (आणि तुझ्याबद्दल म्हणावं, तर एक लांब तलवार तुझ्यातून* आरपार जाईल)+ आणि त्याद्वारे पुष्कळ लोकांच्या मनातले विचार प्रकट होतील.” ३६  तिथे हन्‍ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेर वंशातल्या फनूएलची मुलगी होती. ती खूप म्हातारी झाली होती. लग्नानंतर सात वर्षं आपल्या नवऱ्‍यासोबत राहिल्यावर ३७  ती विधवा झाली होती आणि आता ८४ वर्षांची होती. ती नेहमी मंदिरात असायची आणि उपास आणि याचना करून रात्रंदिवस पवित्र सेवा करायची. ३८  त्याच वेळी ती बाळाच्या आईवडिलांजवळ आली आणि देवाचे आभार मानू लागली. यरुशलेमच्या सुटकेची वाट पाहणाऱ्‍या सगळ्यांना ती त्या बाळाबद्दल सांगू लागली.+ ३९  मग, यहोवाच्या* नियमशास्त्राप्रमाणे सगळं काही पार पाडल्यानंतर,+ ते आपल्या शहरात म्हणजे गालीलमधल्या नासरेथला परत गेले.+ ४०  पुढे तो लहान मुलगा मोठा होत गेला. तो सुदृढ आणि बुद्धिमान बनत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.+ ४१  दरवर्षी, वल्हांडण सणासाठी यरुशलेमला जायची त्याच्या आईवडिलांची रीतच होती.+ ४२  त्यामुळे, तो १२ वर्षांचा असताना सणाच्या रिवाजाप्रमाणे ते वर यरुशलेमला गेले.+ ४३  सणाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ते परत जात असताना त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्येच मागे राहिला. पण हे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं नाही. ४४  तो प्रवास करणाऱ्‍या लोकांच्या घोळक्यातच असेल असा विचार करून, ते एक दिवसाचं अंतर पार करून गेले. मग ते नातेवाइकांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये त्याला शोधू लागले. ४५  पण तो सापडला नाही तेव्हा ते पुन्हा यरुशलेमला गेले आणि त्यांनी त्याला सगळीकडे शोधलं. ४६  तीन दिवसांनंतर त्यांना तो मंदिरात सापडला. तो गुरूजनांमध्ये बसून त्यांचं ऐकत आणि त्यांना प्रश्‍न विचारत होता. ४७  पण त्याचं बोलणं ऐकणारे सगळे जण त्याची समजशक्‍ती पाहून आणि त्याची उत्तरं ऐकून अगदी थक्क झाले होते.+ ४८  त्याच्या आईवडिलांनी त्याला तिथे पाहिलं तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटलं. त्याची आई त्याला म्हणाली: “बाळा, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे बाबा आणि मी किती काळजीत होतो. आम्ही तुला कुठे-कुठे शोधलं!” ४९  पण, तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला का शोधत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असेन हे तुम्हाला माहीत नव्हतं का?”+ ५०  पण तो काय म्हणत आहे हे त्यांना समजलं नाही. ५१  मग तो त्यांच्यासोबत खाली नासरेथला गेला आणि त्यांच्या आज्ञेत* राहिला.+ त्याच्या आईने या सगळ्या गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या.+ ५२  आणि येशू बुद्धीने आणि शरीराने वाढत गेला. तसंच, देवाच्या आणि माणसांच्या कृपेतही तो वाढत गेला.

तळटीपा

किंवा “रोमी सम्राट.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जगातल्या.”
गुराढोरांना चारापाणी घालायचं भांडं, किंवा मोठी टोपली.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “ज्यांच्यावर त्याची कृपा.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “पवित्र.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “तुझ्या जिवातून.”
अति. क५ पाहा.
किंवा “अधीन.”