लूकने सांगितलेला संदेश २१:१-३८
२१ मग येशू मंदिरातल्या दानपात्रांकडे पाहत होता, तेव्हा त्याला श्रीमंत लोक त्यांत आपापलं दान टाकताना दिसले.+
२ त्याला तिथे एक गरीब विधवाही दिसली. ती फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* दानपात्रात टाकत होती.+
३ तेव्हा तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, की इतर सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.+
४ कारण त्या सगळ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून दान टाकलं. पण ती खूप गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.”+
५ नंतर, काही जण मंदिराबद्दल आणि ते कसं सुंदर दगडांनी आणि समर्पित वस्तूंनी सजवलेलं आहे याबद्दल बोलू लागले.+
६ तेव्हा तो म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा तुम्ही पाहत असलेल्या या सगळ्या गोष्टी खाली पाडल्या जातील आणि एकाही दगडावर दगड राहणार नाही.”+
७ तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “गुरू, या गोष्टी नेमक्या केव्हा होतील आणि त्या घडणार असल्याचं चिन्ह काय असेल?”+
८ तो म्हणाला: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मीच तो आहे,’ आणि ‘ठरवलेली वेळ आली आहे’ असं म्हणतील. पण त्यांच्यामागे जाऊ नका.+
९ तसंच, तुम्ही लढायांबद्दल आणि दंगलींबद्दल* ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. कारण आधी या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण लगेचच अंत येणार नाही.”+
१० मग तो त्यांना म्हणाला: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र+ आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+
११ मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील.+ तसंच, भयानक दृश्यं आणि आकाशात मोठी चिन्हं दिसतील.
१२ पण या सगळ्या गोष्टी घडण्याआधी लोक तुम्हाला धरून तुमचा छळ करतील.+ ते तुम्हाला सभास्थानांच्या हवाली करतील आणि तुरुंगांमध्ये डांबतील. माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या आणि राज्यपालांच्या समोर नेलं जाईल.+
१३ आणि यामुळे तुम्हाला साक्ष द्यायची संधी मिळेल.
१४ पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की स्वतःच्या बचावात काय बोलायचं याची तुम्हाला आधीपासूनच तयारी करायची गरज नाही.+
१५ कारण मी तुम्हाला असे शब्द आणि बुद्धी देईन, की तुमचे सगळे विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही.+
१६ शिवाय तुमचे आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्रसुद्धा तुम्हाला धरून देतील* आणि तुमच्यापैकी काहींना ते ठार मारतील.+
१७ माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+
१८ पण तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.+
१९ जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.+
२० पण जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल,+ तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा.+
२१ त्या वेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी+ आणि जे यरुशलेममध्ये आहेत त्यांनी बाहेर जावं. तसंच, जे शेतांत आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
२२ कारण लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात, म्हणून ते न्यायदंड बजावण्याचे* दिवस असतील.
२३ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल.
२४ आणि ते तलवारीच्या धारेने पडतील आणि सगळी राष्ट्रं त्यांना बंदी बनवून नेतील.+ विदेश्यांसाठी* ठरवलेले काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेमला विदेश्यांच्या* पायांखाली तुडवलं जाईल.+
२५ तसंच सूर्य, चंद्र आणि तारे यांच्यात चिन्हं दिसून येतील.+ समुद्राच्या गर्जनेमुळे आणि उसळणाऱ्या लाटांमुळे पृथ्वीवरची राष्ट्रं संकटात सापडतील आणि त्यांना काही मार्ग सुचणार नाही.
२६ भीतीमुळे आणि संपूर्ण पृथ्वीवर येणार असलेल्या गोष्टींच्या धास्तीमुळे लोकांचे हातपाय गळून जातील. कारण आकाशातल्या शक्तींना हादरे बसतील.
२७ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगावर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+
२८ पण या गोष्टी घडू लागल्यावर तुम्ही डोकं वर करून ताठ उभे राहा. कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
२९ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं: “अंजिराचं झाड आणि इतर सगळी झाडं पाहा.+
३० त्यांना पालवी फुटते, तेव्हा तुम्ही ओळखता की आता उन्हाळा जवळ आलाय.
३१ त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहाल, तेव्हा देवाचं राज्य जवळ आलंय हे ओळखा.
३२ मी तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.+
३३ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+
३४ म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, नाहीतर अतिप्रमाणात खाणंपिणं+ आणि जीवनाच्या चिंता+ यांमुळे तुमचं मन भारावून जाईल आणि तो दिवस पाशाप्रमाणे अचानक तुमच्यावर येईल.
३५ कारण तो दिवस संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर येणार आहे.
३६ म्हणून, जागे राहा+ आणि घडणार असलेल्या या सगळ्या गोष्टींतून बचावून तुम्हाला मनुष्याच्या मुलासमोर उभं राहता यावं,+ अशी सतत याचना करत राहा.”+
३७ अशा प्रकारे येशू दिवसा मंदिरात शिकवायचा आणि रात्री जैतुनांच्या डोंगरावर जाऊन राहायचा.
३८ आणि सगळे लोक मंदिरात त्याचं ऐकायला सकाळीच यायचे.
तळटीपा
^ किंवा “अराजकतेबद्दल; बंडांबद्दल.”
^ किंवा “विश्वासघाताने धरून देतील.”
^ किंवा “सूड उगवण्याचे.”
^ किंवा “राष्ट्रांसाठी.”
^ किंवा “राष्ट्रांच्या.”