लूकने सांगितलेला संदेश ८:१-५६
-
येशूसोबत गावोगावी जाणाऱ्या स्त्रिया (१-३)
-
बी पेरणाऱ्याचं उदाहरण (४-८)
-
येशूने उदाहरणांचा उपयोग का केला (९, १०)
-
शेतकऱ्याच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण (११-१५)
-
दिवा झाकून ठेवला जात नाही (१६-१८)
-
येशूची आई आणि भाऊ (१९-२१)
-
येशू वादळ शांत करतो (२२-२५)
-
येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (२६-३९)
-
याईरची मुलगी; येशूच्या कपड्यांना स्पर्श करणारी स्त्री (४०-५६)
८ याच्या काही काळानंतर, येशू गावोगावी आणि शहरोशहरी जाऊन देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करू लागला.+ त्याचे १२ प्रेषितही त्याच्यासोबत होते.
२ तसंच, ज्यांच्यामधून दुष्ट स्वर्गदूत* काढण्यात आले होते आणि ज्यांचे आजार बरे करण्यात आले होते अशा काही स्त्रियासुद्धा त्याच्यासोबत होत्या. जसं की, मरीया (तिला मग्दालीया म्हटलं जायचं आणि तिच्यामधून सात दुष्ट स्वर्गदूत निघाले होते),
३ हेरोदच्या घराचा कारभार पाहणारा खुजा याची बायको योहान्ना,+ सुसान्ना आणि इतर बऱ्याच स्त्रियाही त्याच्यासोबत होत्या. त्या स्वतःच्या संपत्तीतून येशूची आणि त्याच्या शिष्यांची सेवा करायच्या.+
४ मग त्याच्याबरोबर शहरोशहरी जाणाऱ्यांसोबतच, लोकांचा एक मोठा समुदायही जमला. तेव्हा, तो एक उदाहरण देऊन त्यांच्याशी बोलू लागला:+
५ “एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरणी करत असताना, काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि तुडवलं गेलं आणि आकाशातल्या पक्ष्यांनी ते खाऊन टाकलं.+
६ तर काही बी खडकाळ जमिनीवर पडून त्यांना अंकुर फुटले. पण ओलावा नसल्यामुळे ते बी वाळून गेलं.+
७ आणखी काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि त्यांच्यासोबत वाढणाऱ्या या काटेरी झुडपांनी रोपांची वाढ खुंटवली.+
८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि अंकुर फुटल्यावर त्यांनी शंभरपट फळ दिलं.”+ या गोष्टी सांगितल्यावर तो मोठ्याने म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+
९ मग, या उदाहरणाचा काय अर्थ होतो असं त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलं.+
१० तेव्हा तो म्हणाला: “देवाच्या राज्याच्या पवित्र रहस्यांची समज तुम्हाला देण्यात आली आहे. पण इतरांशी मी उदाहरणं देऊन बोलतो.+ त्यामुळे ते पाहतील, पण त्यांना दिसणार नाही आणि ते ऐकतील, पण त्यांना अर्थ समजणार नाही.+
११ या उदाहरणाचा अर्थ असा आहे: बी म्हणजे देवाचं वचन.+
१२ रस्त्याच्या कडेला पडलेलं बी म्हणजे असे लोक जे वचन ऐकतात, पण सैतान* येतो आणि त्यांच्या हृदयातून ते वचन काढून घेतो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांचं तारण होऊ नये.+
१३ तर खडकाळ जमिनीवर पडलेलं बी म्हणजे असे लोक, जे वचन ऐकून आनंदाने स्वीकारतात, पण मूळ धरत नाहीत. ते काही काळ विश्वास ठेवतात, पण परीक्षेच्या काळात विश्वास सोडून देतात.+
१४ आणि काटेरी झुडपांत पडलेलं बी म्हणजे असे लोक, जे वचन तर ऐकतात, पण जीवनातल्या चिंता, धनदौलत+ आणि चैनबाजी+ यांत ते गुरफटले जातात. यामुळे त्यांची वाढ पूर्णपणे खुंटते आणि ते फळ देत नाहीत.+
१५ तर चांगल्या जमिनीवर पडलेलं बी म्हणजे चांगल्या आणि प्रामाणिक मनाचे लोक.+ ते वचन ऐकून हृदयात ठेवतात आणि धीराने फळ देतात.+
१६ कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही. तर घरात येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून एखाद्या उंच ठिकाणी ठेवतो.+
१७ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी कायमची गुप्त राहील आणि उजेडात येणार नाही.+
१८ म्हणून, तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिलं जाईल.+ पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असं त्याला वाटतं तेसुद्धा काढून घेतलं जाईल.”+
१९ मग, त्याची आई आणि भाऊ+ त्याला भेटायला आले, पण लोकांच्या गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येत नव्हतं.+
२० म्हणून त्याला असा निरोप देण्यात आला, की “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय.”
२१ तेव्हा त्याने असं उत्तर दिलं: “जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”+
२२ एकदा तो आणि त्याचे शिष्य एका नावेत चढले आणि तो त्यांना म्हणाला: “चला, आपण पलीकडे, सरोवराच्या त्या किनाऱ्याला जाऊ.” तेव्हा ते निघाले.+
२३ पण नावेतून जात असताना त्याला झोप लागली. मग एक जोरदार वादळ आलं आणि नावेत पाणी शिरू लागलं आणि ती बुडू लागली.+
२४ म्हणून त्यांनी जाऊन त्याला उठवलं आणि ते त्याला म्हणाले: “गुरू, गुरू, आपण बुडतोय!” तेव्हा तो उठला आणि त्याने वाऱ्याला आणि उसळणाऱ्या लाटांना दटावलं. मग वादळ थांबलं आणि सगळं काही शांत झालं.+
२५ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्वास कुठे आहे?” पण ते घाबरले होते आणि थक्क होऊन एकमेकांना म्हणू लागले: “हा आहे तरी कोण? हा तर वाऱ्याला आणि पाण्यालाही हुकूम देतो आणि तेही त्याचं ऐकतात.”+
२६ मग ते गालीलच्या पलीकडच्या किनाऱ्यावर, गरसेकरांच्या प्रदेशात पोहोचले.+
२७ येशू नावेतून उतरून किनाऱ्यावर आला, तेव्हा जवळच्या शहरातला एक माणूस त्याला दिसला. त्याला दुष्ट स्वर्गदूताने पछाडलं होतं. बऱ्याच काळापासून त्याने कपडे घातले नव्हते. शिवाय तो घरात नाही, तर कबरस्तानात राहायचा.+
२८ येशूला पाहताच तो जोरात ओरडून त्याच्यासमोर पडला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”+
२९ (कारण येशू त्या दुष्ट स्वर्गदूताला त्या माणसातून निघून जायची आज्ञा करत होता. दुष्ट स्वर्गदूताने कित्येकदा त्या माणसाला धरलं होतं.*+ बऱ्याच वेळा, साखळ्यांनी आणि बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेलं असतानाही तो माणूस ती बंधनं तोडायचा आणि दुष्ट स्वर्गदूत त्याला एकांत ठिकाणी घेऊन जायचा.)
३० येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तो म्हणाला: “सैन्य.” कारण त्याच्यामध्ये बरेच दुष्ट स्वर्गदूत शिरले होते.
३१ आणि ते येशूला वारंवार विनंती करू लागले की आम्हाला अथांग डोहात* पाठवू नकोस.+
३२ त्याच वेळी, डुकरांचा+ एक मोठा कळप तिथे डोंगरावर चरत होता. आपल्याला त्या डुकरांमध्ये शिरण्याची परवानगी द्यावी अशी त्या दुष्ट स्वर्गदूतांनी त्याला विनवणी केली आणि त्याने ती मान्य केली.+
३३ तेव्हा, ते दुष्ट स्वर्गदूत त्या माणसातून निघून डुकरांमध्ये शिरले आणि तो कळप धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि बुडून मेला.
३४ पण कळप चारणाऱ्यांनी घडलेला प्रकार पाहिला, तेव्हा ते तिथून पळाले आणि त्यांनी शहरात आणि शेतांत जाऊन लोकांना ही बातमी सांगितली.
३५ तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहायला लोक निघाले. ते येशूकडे आले तेव्हा ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत निघाले होते, तो त्यांना येशूच्या पायाजवळ बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. हे पाहून लोक घाबरले.
३६ ज्यांनी ही घटना पाहिली होती त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला माणूस कसा बरा झाला हे त्यांना सांगितलं.
३७ तेव्हा, गरसेकरांच्या आसपासच्या प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी येशूला तिथून निघून जायला सांगितलं, कारण ते फार घाबरले होते. मग, येशू नावेत बसून परत जायला निघाला.
३८ पण ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत काढण्यात आले होते, तो येशूला विनंती करू लागला की आपल्यालाही सोबत येऊ द्यावं. पण येशूने त्याला असं म्हणून पाठवून दिलं,+
३९ “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी जे काही केलं ते सगळ्यांना सांगत राहा.” तेव्हा तो माणूस तिथून निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केलं होतं, त्याबद्दल तो संपूर्ण शहरात सांगू लागला.
४० येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने आनंदाने त्याचं स्वागत केलं. कारण ते सगळे त्याची वाट पाहत होते.+
४१ इतक्यात याईर नावाचा एक माणूस तिथे आला. तो सभास्थानाचा एक अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी यायची विनंती केली.+
४२ कारण सुमारे १२ वर्षांची त्याची एकुलती एक मुलगी मरायला टेकली होती.
येशू तिथे जायला निघाला तेव्हा लोकसमुदायाने त्याच्याभोवती गर्दी केली.
४३ तिथे अशी एक स्त्री होती, जिला १२ वर्षांपासून रक्तस्रावाचा+ आजार होता. कोणीही तिला बरं करू शकलं नव्हतं.+
४४ तिने मागून येऊन येशूच्या कपड्यांच्या काठाला हात लावला+ आणि त्याच क्षणी तिचा रक्तस्राव थांबला.
४५ तेव्हा येशू म्हणाला: “मला कोणी हात लावला?” सगळे नाही म्हणू लागले, तेव्हा पेत्र म्हणाला: “गुरू, बघतोस ना, तुझ्याभोवती लोकांची किती गर्दी आहे!”+
४६ पण, येशू म्हणाला: “कोणीतरी नक्कीच मला स्पर्श केला. कारण माझ्यातून शक्ती+ निघाल्याचं मला जाणवलं.”
४७ येशूला आपल्याबद्दल कळलं आहे हे त्या स्त्रीला समजलं, तेव्हा ती थरथर कापत आली आणि तिने त्याच्यापुढे गुडघे टेकले. आणि तिने येशूला का स्पर्श केला आणि कशा प्रकारे ती लगेच बरी झाली, हे तिने सगळ्यांसमोर सांगितलं.
४८ पण, येशू तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. जा, काळजी करू नकोस.”*+
४९ तो बोलत होता, इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याचा एक माणूस तिथे आला आणि म्हणाला: “तुमची मुलगी वारली. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”+
५० हे ऐकून येशू याईरला म्हणाला: “घाबरू नकोस, फक्त विश्वास ठेव म्हणजे ती वाचेल.”+
५१ येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने पेत्र, योहान, याकोब आणि त्या मुलीच्या आईवडिलांशिवाय कोणालाही आपल्यासोबत आत येऊ दिलं नाही.
५२ बाहेर सगळे लोक तिच्यासाठी रडत होते आणि छाती बडवून शोक करत होते. म्हणून, येशू त्यांना म्हणाला: “रडू नका,+ मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+
५३ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. कारण ती मेली आहे हे त्यांना माहीत होतं.
५४ पण त्याने तिचा हात धरून, “बाळा, ऊठ!” असं मोठ्याने म्हटलं.+
५५ तेव्हा, ती पुन्हा जिवंत झाली*+ आणि लगेच उठली.+ मग तिला काहीतरी खायला द्या, असं त्याने त्यांना सांगितलं.
५६ मुलीला जिवंत झाल्याचं पाहून तिच्या आईवडिलांना इतका आनंद झाला, की त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण येशूने त्यांना बजावून सांगितलं की जे काही घडलं होतं, ते त्यांनी कोणालाही सांगू नये.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
^ किंवा कदाचित, “बऱ्याच काळापासून त्याला आपल्या ताब्यात ठेवलं होतं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “शांतीने जा.”
^ किंवा “तिचा श्वास (जीवनशक्ती) परत आला.”