लेवीय १०:१-२०

  • यहोवाकडून आलेल्या आगीमुळे नादाब आणि अबीहूचा मृत्यू (१-७)

  • याजकांसाठी खाण्यापिण्याबद्दल नियम (८-२०)

१०  मग नादाब आणि अबीहू या अहरोनच्या मुलांनी+ आपापलं धूप जाळण्याचं पात्र घेतलं आणि त्यात जळते कोळसे ठेवून त्यांवर धूप टाकला.+ यहोवाने आज्ञा दिली नसताना, त्यांनी नियमाविरुद्ध असलेला हा अग्नी त्याच्यासमोर नेला.+ २  तेव्हा, यहोवासमोरून आग निघाली आणि त्या आगीमुळे ते यहोवापुढे जळून मेले.+ ३  मग मोशे अहरोनला म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘जे माझ्या जवळ आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की मी पवित्र आहे,+ आणि सर्व लोकांसमोर माझा गौरव झाला पाहिजे.’” तेव्हा अहरोन शांतच राहिला. ४  मग मोशेने अहरोनचे काका उज्जियेल+ यांची मुलं मीशाएल आणि एलसाफान यांना बोलावून म्हटलं: “इकडे या आणि पवित्र ठिकाणासमोरून आपल्या भावांना उचलून छावणीबाहेर घेऊन जा.” ५  तेव्हा ते आले आणि मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या दोघांना त्यांच्या झग्यांसोबत उचलून छावणीबाहेर नेलं. ६  मग मोशे अहरोनला आणि एलाजार व इथामार या त्याच्या दुसऱ्‍या मुलांना म्हणाला: “तुम्ही मरू नये आणि इस्राएलच्या सर्व लोकांविरुद्ध देवाचा राग भडकू नये, म्हणून आपले केस विस्कटू देऊ नका आणि आपली वस्त्रं फाडू नका.+ यहोवाने ज्यांना आगीने ठार मारलं आहे, त्यांच्यासाठी तुमचे भाऊ, म्हणजे इस्राएलचं संपूर्ण घराणं शोक करेल. ७  तुम्ही भेटमंडपाच्या प्रवेशाजवळून बाहेर जाऊ नका, नाहीतर तुम्ही मराल; कारण यहोवाचं अभिषेकाचं तेल तुमच्यावर आहे.”+ तेव्हा त्यांनी मोशेने सांगितल्याप्रमाणे केलं. ८  मग यहोवा अहरोनला म्हणाला: ९  “तू आणि तुझी मुलं भेटमंडपात याल, तेव्हा तुम्ही द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नका,+ नाहीतर तुम्ही मराल. हा पिढ्या न्‌ पिढ्या तुमच्यासाठी कायमचा नियम आहे. १०  तो पवित्र व अपवित्र; आणि शुद्ध व अशुद्ध यांत फरक करण्यासाठी;+ ११  तसंच, यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना सांगितलेले सगळे नियम त्यांना शिकवण्यासाठी आहे.”+ १२  मग अहरोन आणि त्याची राहिलेली मुलं म्हणजे एलाजार आणि इथामार यांना मोशे म्हणाला: “यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्‍या अर्पणांतल्या अन्‍नार्पणातून जे उरलं, त्याच्या बेखमीर* भाकरी बनवून वेदीजवळ खा,+ कारण ते परमपवित्र आहे.+ १३  तुम्ही त्या पवित्र ठिकाणी खाव्यात,+ कारण यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्‍या अर्पणांतून हा तुला आणि तुझ्या मुलांना देण्यात आलेला हिस्सा आहे. कारण मला अशीच आज्ञा देण्यात आली आहे. १४  तसंच, तुम्ही ओवाळण्याच्या अर्पणातून छातीचा भाग आणि पवित्र भागातला पाय+ एका स्वच्छ ठिकाणी खावा. तू तो आपल्या मुलामुलींसोबत खावा,+ कारण हे भाग इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांतून तुला आणि तुझ्या मुलांना देण्यात आलेला हिस्सा आहे. १५  अग्नीत जाळून अर्पण केलेल्या चरबीसोबत पवित्र भागातला पाय आणि ओवाळण्याच्या अर्पणातला छातीचा भाग, यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी आणला जाईल; यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे हा तुझा आणि तुझ्या मुलांचा कायमचा हिस्सा असेल.”+ १६  मोशेने पापार्पणाच्या बकऱ्‍याचा कसून शोध घेतला,+ तेव्हा तो जाळून टाकण्यात आल्याचं त्याला कळलं. तेव्हा अहरोनच्या राहिलेल्या मुलांवर, म्हणजे एलाजार आणि इथामार यांच्यावर तो भडकला आणि म्हणाला: १७  “पापार्पण हे परमपवित्र आहे आणि तुम्ही लोकांच्या पापांची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांच्यासाठी यहोवासमोर प्रायश्‍चित्त करावं, म्हणून त्याने ते तुम्हाला दिलं आहे. मग तुम्ही ते पवित्र ठिकाणी खाल्लं का नाही?+ १८  त्याचं रक्‍त पवित्र ठिकाणाच्या आत आणण्यात आलेलं नाही.+ तुम्ही ते पवित्र ठिकाणी खायलाच हवं होतं, कारण मला अशीच आज्ञा देण्यात आली होती.” १९  अहरोनने मोशेला उत्तर दिलं: “आज त्यांनी यहोवासमोर त्यांचं पापार्पण आणि होमार्पण दिलं,+ आणि तरी या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. जर मी ते पापार्पण आज खाल्लं असतं, तर यहोवाला हे आवडलं असतं का?” २०  हे ऐकल्यावर मोशेचं समाधान झालं.

तळटीपा