लेवीय २१:१-२४

  • याजकांनी पवित्र आणि शुद्ध असावं (१-९)

  • महायाजकाने स्वतःला दूषित करू नये (१०-१५)

  • याजकांमध्ये शारीरिक दोष असू नयेत (१६-२४)

२१  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: “याजकांना, म्हणजे अहरोनच्या मुलांना असं सांग, ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या लोकांमधल्या एखाद्या मेलेल्या माणसासाठी* स्वतःला दूषित करू नये.+ २  पण तो आपल्या जवळच्या रक्‍ताच्या नातेवाइकांसाठी म्हणजे आपल्या आईसाठी, वडिलांसाठी, मुलासाठी, मुलीसाठी आणि भावासाठी असं करू शकतो. ३  तसंच, जर त्याची बहीण कुमारी असेल, म्हणजे तिचं लग्न झालं नसेल आणि ती त्याच्यासोबत राहत असेल,* तर ती मेल्यावर तो तिच्यासाठी शोक करून स्वतःला दूषित करू शकतो. ४  त्याने स्वतःला अशा स्त्रीसाठी दूषित करू नये, जी त्याच्या लोकांपैकी एखाद्या माणसाची बायको होती. ५  याजकांनी आपल्या डोक्यावरचे केस काढू नयेत+ किंवा आपले कल्ले कापू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत.+ ६  त्यांनी आपल्या देवाच्या दृष्टीत पवित्र असावं+ आणि आपल्या देवाच्या नावाचा अनादर करू नये.+ कारण ते यहोवासाठी अग्नीत जाळून केली जाणारी अर्पणं, म्हणजे देवाची भाकर* अर्पण करतात. त्यांनी पवित्र असलं पाहिजे.+ ७  त्यांनी वेश्‍येसोबत+ किंवा जिला भ्रष्ट करण्यात आलं आहे, किंवा जिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे, अशा स्त्रीशी+ लग्न करू नये. कारण याजक त्याच्या देवाच्या दृष्टीत पवित्र आहे. ८  तू त्याला पवित्र कर,+ कारण तो तुझ्या देवाची भाकर अर्पण करतो. तू त्याला पवित्र मानलं पाहिजे, कारण तुला पवित्र करणारा मी यहोवा पवित्र आहे.+ ९  एखाद्या याजकाच्या मुलीने वेश्‍या बनून स्वतःला अशुद्ध केलं, तर तिने आपल्या वडिलांचा अनादर केला आहे. तिला आगीत जाळून टाकावं.+ १०  याजकांच्या भावांपैकी जो महायाजक आहे, ज्याच्या डोक्यावर अभिषेकाचं तेल ओतण्यात आलं आहे+ आणि ज्याला याजकाची खास वस्त्रं घालण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं आहे,*+ त्याने आपले केस विस्कटू देऊ नयेत आणि आपली वस्त्रं फाडू नयेत.+ ११  त्याने कोणत्याही मृतदेहाजवळ* जाऊ नये.+ आपल्या वडिलांसाठी किंवा आपल्या आईसाठीही त्याने स्वतःला दूषित करू नये. १२  त्याने उपासना मंडपाच्या बाहेर जाऊ नये आणि आपल्या देवाच्या उपासना मंडपाचा अनादर करू नये.+ कारण समर्पणाचं चिन्ह, म्हणजे त्याच्या देवाचं अभिषेकाचं तेल त्याच्यावर आहे.+ मी यहोवा आहे. १३  त्याने कुमारी असलेल्या स्त्रीशीच लग्न करावं.+ १४  त्याने विधवेशी, घटस्फोट झालेल्या किंवा जिला भ्रष्ट करण्यात आलं आहे अशा स्त्रीशी किंवा वेश्‍येशी लग्न करू नये, तर त्याने आपल्या लोकांपैकी कुमारी असलेल्या स्त्रीशीच लग्न करावं. १५  त्याने आपल्या संततीला* आपल्या लोकांमध्ये दूषित करू नये,+ कारण त्याला पवित्र करणारा मी यहोवा आहे.’” १६  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १७  “अहरोनला सांग, ‘तुझ्या संततीच्या* येणाऱ्‍या सर्व पिढ्यांमध्ये, ज्याच्यात दोष असेल अशा कोणत्याही पुरुषाने आपल्या देवाची भाकर अर्पण करण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. १८  जर एखाद्या माणसामध्ये कोणताही दोष असेल तर त्याने वेदीजवळ येऊ नये; म्हणजे आंधळा, लंगडा किंवा ज्याचा चेहरा विद्रूप आहे* किंवा ज्याचा एक हात किंवा पाय लांब आहे, १९  ज्याचा हात किंवा पाय मोडला आहे, २०  कुबडा किंवा बुटका,* ज्याच्या डोळ्यांत दोष आहे, किंवा ज्याला इसब किंवा नायटा आहे, किंवा ज्याच्या अंडांत दोष आहे.+ २१  अहरोन याजकाच्या संततीपैकी,* ज्याच्यात दोष आहे अशा कोणत्याही माणसाने यहोवासाठी अग्नीत जाळून केलेली अर्पणं देण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. त्याच्यात दोष असल्यामुळे, त्याने आपल्या देवाची ही भाकर अर्पण करण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. २२  तो परमपवित्र+ आणि पवित्र+ गोष्टींमधून आपल्या देवाची भाकर खाऊ शकतो. २३  पण, त्याच्यात दोष असल्यामुळे त्याने पडद्याजवळ+ व वेदीजवळ+ येऊ नये आणि माझ्या उपासना मंडपाचा अनादर करू नये.+ कारण त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.’”+ २४  तेव्हा मोशेने अहरोनला, त्याच्या मुलांना आणि सर्व इस्राएली लोकांना या सर्व गोष्टी सांगितल्या.

तळटीपा

किंवा “जिवासाठी.”
शब्दशः “त्याच्या जवळची असेल.”
किंवा “अन्‍न,” जे अर्पणांना सूचित करतं.
शब्दशः “ज्याचा हात भरण्यात आला आहे.”
किंवा “मेलेल्या जिवाजवळ.” इथे वापरला गेलेला नेफेश हा हिब्रू शब्द “मेलेला” या अर्थाच्या हिब्रू शब्दाशी संबंधित आहे.
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “किंवा ज्याच्या नाकाला चीर आहे.”
किंवा कदाचित, “हडकुळा.”
शब्दशः “बीज.”