लेवीय २३:१-४४

  • पवित्र दिवस आणि सण (१-४४)

    • शब्बाथ ()

    • वल्हांडण (४, ५)

    • बेखमीर भाकरींचा सण (६-८)

    • पहिल्या पिकातली अर्पणं (९-१४)

    • सप्ताहांचा सण (१५-२१)

    • कापणीची योग्य पद्धत (२२)

    • कर्णा वाजवण्याचा सण (२३-२५)

    • प्रायश्‍चित्ताचा दिवस (२६-३२)

    • मंडपांचा सण (३३-४३)

२३  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही यहोवाचे जे नेमलेले सण+ साजरे* केले पाहिजेत,+ ते पवित्र मेळावे आहेत. माझे नेमलेले सण हे आहेत: ३  सहा दिवस तुम्ही काम करू शकता. पण सातवा दिवस हा पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ*+ असेल. तो एक पवित्र मेळावा आहे. त्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी त्या दिवशी यहोवासाठी शब्बाथ पाळा.+ ४  हे यहोवाचे नेमलेले सण आहेत. हे पवित्र मेळावे आहेत. त्यांच्या नेमलेल्या वेळी तुम्ही ते साजरे* करावेत: ५  पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ संध्याकाळी* यहोवासाठी वल्हांडण सण+ असेल. ६  या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी बेखमीर* भाकरींचा सण+ असेल. सात दिवसांपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खा.+ ७  पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळावा ठेवा.+ तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ८  सात दिवसांपर्यंत तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. सातव्या दिवशी एक पवित्र मेळावा असेल. त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका.’” ९  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १०  “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात जेव्हा तुम्ही पोहोचाल आणि तिथे आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा आपल्या कापणीच्या पहिल्या पिकातली एक पेंढी+ तुम्ही याजकाकडे आणा.+ ११  तुमच्यासाठी ती स्वीकारली जावी म्हणून याजक ती यहोवापुढे ओवाळेल. याजकाने ती शब्बाथाच्या दुसऱ्‍या दिवशी ओवाळावी. १२  पेंढी ओवाळली जाईल त्या दिवशी, तुम्ही कोणताही दोष नसलेला एक वर्षाचा मेंढा यहोवासाठी होमार्पण म्हणून द्यावा. १३  त्यासोबत तुम्ही अन्‍नार्पण म्हणून तेलात मिसळलेलं दोन दशांश एफा* चांगलं पीठ, अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून यहोवाला द्यावं आणि त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* तसंच, पेयार्पण म्हणून तुम्ही एक हिन* द्राक्षारसाचा चौथा भागही द्यावा. १४  या दिवसापर्यंत, म्हणजे तुम्ही तुमच्या देवासाठी हे अर्पण आणेपर्यंत, कोणत्याही प्रकारची भाकर, भाजलेलं धान्य किंवा नवीन धान्य खाऊ नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या हा कायमचा नियम पाळला पाहिजे. १५  शब्बाथाच्या पुढच्या दिवसापासून, म्हणजे तुम्ही ओवाळण्याच्या अर्पणाची पेंढी आणाल त्या दिवसापासून सात शब्बाथ मोजा.+ ते पूर्ण सात आठवडे असले पाहिजेत. १६  सातव्या शब्बाथाच्या दुसऱ्‍या दिवसापर्यंत तुम्ही ५० दिवस+ मोजा आणि मग तुम्ही यहोवासाठी एक नवीन अन्‍नार्पण आणा.+ १७  तुम्ही ओवाळण्याचं अर्पण म्हणून आपल्या घरून दोन भाकरी आणा. त्या दोन दशांश एफा* चांगल्या पिठापासून बनवलेल्या असाव्यात. त्या यहोवासाठी पहिल्या पिकाचं अर्पण+ म्हणून खमीर* टाकून भाजलेल्या+ असाव्यात. १८  त्या भाकरींसोबत तुम्ही कोणताही दोष नसलेली, एकेका वर्षाची सात कोकरं, तसंच एक गोऱ्‍हा* आणि दोन मेंढेही आणावेत.+ तुम्ही ते यहोवाला होमार्पण म्हणून द्यावेत आणि त्यांसोबत दिलं जाणारं अन्‍नार्पण आणि पेयार्पणंही तुम्ही द्यावीत. ही अग्नीत जाळून केलेली अर्पणं आहेत आणि त्यांच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* १९  तुम्ही पापार्पण म्हणून एक बकरा+ आणि शांती-अर्पण म्हणून एकेका वर्षाचे दोन मेंढे आणावेत.+ २०  याजक त्या दोन मेंढ्यांसोबत पहिल्या पिकाच्या भाकरी, ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवापुढे ओवाळेल. हे अर्पण यहोवाच्या नजरेत पवित्र असून ते याजकासाठी असेल.+ २१  त्या दिवशी तुम्ही आपल्यासाठी पवित्र मेळावा जाहीर करा.+ तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी हा नियम पिढ्या न्‌ पिढ्या एक कायमचा नियम म्हणून पाळा. २२  तुम्ही आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या काठावरचं सगळं पीक कापू नका आणि कापणी करताना जे उरेल, ते उचलू नका.+ तुम्ही ते गरिबांसाठी*+ आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यासाठी+ तसंच राहू दया. मी तुमचा देव यहोवा आहे.’” २३  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २४  “इस्राएली लोकांना सांग, ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, तुम्ही पूर्ण विश्रांतीचा दिवस पाळावा. कर्णा वाजवून त्या दिवसाची आठवण करून दिली जावी.+ तो एक पवित्र मेळावा असेल. २५  तुम्ही त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका आणि अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवासाठी द्या.’” २६  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २७  “पण याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रायश्‍चित्ताचा दिवस+ असेल. तुम्ही त्या दिवशी पवित्र मेळावा ठेवा आणि शोक करा.*+ तसंच, तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवासाठी द्या. २८  या खास दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका; कारण तुमचा देव यहोवा याच्यासमोर तुमच्याबद्दल प्रायश्‍चित्त करण्यासाठी+ हा प्रायश्‍चित्ताचा दिवस असेल. २९  या दिवशी जो कोणी* शोक करणार नाही* त्याला ठार मारलं जाईल.+ ३०  आणि या दिवशी जो कोणत्याही प्रकारचं काम करेल, अशा प्रत्येकाचा* मी नाश करीन. ३१  तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी हा नियम पिढ्या न्‌ पिढ्या एक कायमचा नियम म्हणून पाळा. ३२  हा तुमच्यासाठी संपूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असेल आणि त्या महिन्याच्या नवव्या दिवशी संध्याकाळी तुम्ही शोक करा.+ तुम्ही त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत शब्बाथ पाळावा.” ३३  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ३४  “इस्राएली लोकांना सांग, ‘या सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी सात दिवस मंडपांचा* सण असेल.+ ३५  पहिल्या दिवशी एक पवित्र मेळावा असेल आणि तुम्ही त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ३६  सात दिवस तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. आठव्या दिवशी तुम्ही एक पवित्र मेळावा ठेवा+ आणि अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ही एक पवित्र सभा असेल. ३७  हे यहोवासाठी नेमलेले सण+ आहेत. तुम्ही ते पवित्र मेळावे म्हणून जाहीर करा+ आणि यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण, म्हणजेच होमार्पण,+ बलिदानासोबत द्यायचं अन्‍नार्पण+ आणि पेयार्पणं,+ ही प्रत्येक प्रसंगासाठी ठरलेल्या नियमाप्रमाणे द्या. ३८  या अर्पणांसोबतच तुम्ही यहोवाच्या शब्बाथांच्या दिवशी देत असलेली अर्पणं,+ तुमची दानं,+ नवसाची अर्पणं,+ तसंच तुमची स्वेच्छेने दिलेली बलिदानं+ यहोवाला देत राहावीत. ३९  पण, तुम्ही आपल्या शेतांतलं पीक गोळा केल्यावर, सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी सात दिवस सण साजरा करा.+ यांपैकी पहिला आणि आठवा दिवस हा पूर्ण विश्रांतीचा दिवस असेल.+ ४०  पहिल्या दिवशी तुम्ही सर्वात चांगली फळं, खजुराच्या झाडांच्या फांद्या,+ हिरव्यागार झाडांच्या फांद्या, तसंच दऱ्‍याखोऱ्‍यांतली झाडं घ्या आणि तुमचा देव यहोवा याच्यासमोर सात दिवस+ आनंद साजरा करा.+ ४१  तुम्ही वर्षातून सात दिवस यहोवासाठी हा सण साजरा करा.+ तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या एक कायमचा नियम म्हणून सातव्या महिन्यात हा सण साजरा केला पाहिजे. ४२  तुम्ही सात दिवस मंडपांमध्ये राहा.+ इस्राएलच्या सर्व रहिवाशांनी मंडपांमध्ये राहावं. ४३  असं केल्यामुळे तुमच्या पुढच्या पिढ्यांना कळेल,+ की मी इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणताना त्यांना मंडपांमध्ये राहायला लावलं.+ मी तुमचा देव यहोवा आहे.’” ४४  तेव्हा मोशेने यहोवाच्या नेमलेल्या सणांबद्दल इस्राएली लोकांना सांगितलं.

तळटीपा

किंवा “जाहीर.”
किंवा “जाहीर.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “तरणा बैल.”
किंवा “पीडितांसाठी.”
हा शोक उपास करून किंवा अशाच प्रकारची इतर बंधनं स्वतःवर लादून केला जात असावा.
किंवा कदाचित, “उपास करणार नाही.”
किंवा “जीव.”
किंवा “प्रत्येक जिवाचा.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”