लेवीय २४:१-२३

  • उपासना मंडपाच्या दिव्यांसाठी तेल (१-४)

  • अर्पणाच्या भाकरी (५-९)

  • देवाच्या नावाची निंदा करणाऱ्‍याला दगडमार (१०-२३)

२४  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “दिवे सतत जळत राहावेत, म्हणून इस्राएली लोकांना शुद्ध जैतुनाचं तेल तुझ्याकडे आणण्याची आज्ञा दे.+ ३  अहरोनने भेटमंडपातल्या साक्षपेटीच्या पडद्याबाहेर, संध्याकाळपासून सकाळपर्यंत यहोवासमोर सतत दिवे जळत ठेवण्याची व्यवस्था करावी. हा तुमच्यासाठी पिढ्या न्‌ पिढ्या कायमचा नियम आहे. ४  त्याने यहोवासमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरच्या* दिव्यांची+ नेहमी काळजी घ्यावी. ५  तू चांगलं पीठ घेऊन त्याच्या १२ भाकरी भाज. प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा* पीठ वापरावं. ६  तू यहोवासमोर शुद्ध सोन्याच्या+ मेजावर त्या भाकरींच्या दोन थप्प्या रचून ठेव. प्रत्येक थप्पीत सहा भाकरी असाव्यात.+ ७  प्रत्येक थप्पीवर शुद्ध ऊद* ठेव. तो ऊद भाकरींच्या अर्पणाचं प्रतीक*+ असेल. तो अग्नीत जाळून यहोवाला अर्पण केला जाईल. ८  त्याने प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी, यहोवासमोर नियमितपणे भाकरी रचून ठेवाव्यात.+ हा इस्राएली लोकांसोबत माझा कायमचा करार आहे. ९  त्या भाकरी अहरोनसाठी आणि त्याच्या मुलांसाठी असतील.+ त्यांनी त्या एका पवित्र ठिकाणी खाव्यात,+ कारण कायमच्या नियमाप्रमाणे, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्‍या अर्पणांतला, हा याजकासाठी असलेला परमपवित्र भाग आहे.” १०  इस्राएली लोकांमध्ये एक असा मुलगा होता, ज्याची आई इस्राएली आणि वडील इजिप्तचे होते.+ एकदा छावणीत त्याचं एका इस्राएली माणसाशी भांडण झालं. ११  तेव्हा तो इस्राएली मुलगा देवाच्या नावाची* निंदा करू लागला आणि त्याच्या नावाला शाप देऊ लागला.+ म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणलं.+ त्या मुलाच्या आईचं नाव शलोमीथ होतं आणि ती दान वंशातल्या दिब्रीची मुलगी होती. १२  त्या मुलाबद्दल यहोवाचा निर्णय स्पष्ट होईपर्यंत, त्यांनी त्याला कैदेत ठेवलं.+ १३  मग यहोवा मोशेला म्हणाला: १४  “ज्याने शाप दिला त्याला छावणीबाहेर आणा आणि ज्यांनी त्याला शाप देताना ऐकलं, त्या सर्वांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवावेत. त्यानंतर इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याला दगडमार करावा.+ १५  इस्राएली लोकांना सांग, ‘जो कोणी आपल्या देवाला शाप देईल, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळेल. १६  म्हणून यहोवाच्या नावाची निंदा करणाऱ्‍याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ इस्राएली लोकांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत दगडमार करावा. देवाच्या नावाची निंदा केल्याबद्दल त्याला ठार मारलं जावं, मग तो तुमच्यात राहायला आलेला विदेशी असो, किंवा देशाचा रहिवासी. १७  जर एखाद्याने दुसऱ्‍या माणसाचा जीव घेतला, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ १८  जर कोणी एखाद्या पाळीव प्राण्याला मारल्यामुळे त्या प्राण्याचा जीव गेला, तर त्याने जिवाबद्दल जीव अशी त्याची भरपाई करावी. १९  जर एखाद्याने दुसऱ्‍या माणसाला दुखापत केली, तर त्याने दुसऱ्‍याला जसं केलं, तसंच त्यालाही केलं जावं.+ २०  मोडलेल्या हाडाबद्दल मोडलेलं हाड, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, याप्रमाणे त्याने जी काही दुखापत केली असेल, तीच त्यालाही केली जावी.+ २१  जर कोणी एखाद्या प्राण्याला मारल्यामुळे त्या प्राण्याचा जीव गेला, तर त्याने त्याबद्दल भरपाई करावी.+ पण जर कोणी एखाद्या माणसाला मारल्यामुळे त्या माणसाचा जीव गेला, तर त्याला ठार मारलं जावं.+ २२  तुमच्यातल्या प्रत्येकासाठी एकच न्याय-निर्णय असेल. तुमच्यात राहायला आलेला विदेशी आणि देशातला रहिवासी या दोघांसाठी एकच न्याय-निर्णय असेल,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.’” २३  तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी शाप देणाऱ्‍याला छावणीबाहेर आणून त्याला दगडमार केला.+ अशा प्रकारे, यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी केलं.

तळटीपा

एक प्रकारची समई.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
म्हणजे, १५ आणि १६ या वचनांवरून दिसून येतं त्याप्रमाणे यहोवा या नावाची.