लेवीय २७:१-३४
२७ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
२ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या माणसाने एका व्यक्तीची* ठरलेली किंमत यहोवाला देण्याचा खास नवस केला,+
३ तर २० ते ६० वर्षं वयाच्या पुरुषाची ठरलेली किंमत, ही पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* चांदीचे ५० शेकेल* असेल.
४ पण जर ती स्त्री असेल, तर तिची ठरलेली किंमत ही ३० शेकेल असेल.
५ जर मुलगा ५ ते २० वर्षं वयाचा असेल, तर त्याची ठरलेली किंमत २० शेकेल आणि मुलीची ठरलेली किंमत १० शेकेल असेल.
६ एक महिना ते पाच वर्षं वयाच्या मुलाची ठरलेली किंमत चांदीचे पाच शेकेल, तर मुलीची ठरलेली किंमत चांदीचे तीन शेकेल असेल.
७ जर पुरुषाचं वय ६० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याची ठरलेली किंमत १५ शेकेल आणि स्त्रीची ठरलेली किंमत १० शेकेल असेल.
८ पण जर नवस करणारा माणूस गरीब असेल आणि ठरलेली किंमत देण्याची त्याची ऐपत नसेल,+ तर तो त्या व्यक्तीला याजकासमोर उभं करेल आणि याजक तिची किंमत ठरवेल. नवस करणाऱ्या माणसाच्या ऐपतीप्रमाणे याजक किंमत ठरवेल.+
९ जर त्याने यहोवाला अर्पण करण्यासाठी योग्य असलेला एखादा प्राणी देण्याचा नवस केला असेल, तर यहोवाला दिलेला तो प्राणी पवित्र होईल.
१० त्याने चांगल्या प्राण्याच्या बदल्यात वाईट किंवा वाईट प्राण्याच्या बदल्यात चांगला, अशी अदलाबदल करू नये. पण जर त्याने अशी अदलाबदल केलीच, तर आधीचा आणि त्याच्या बदल्यात दिलेला असे दोन्ही प्राणी पवित्र मानले जातील.
११ जर त्याने यहोवाला अर्पण करण्यासाठी योग्य नसलेला एखादा अशुद्ध प्राणी आणला,+ तर तो त्या प्राण्याला याजकासमोर उभं करेल.
१२ मग तो प्राणी चांगला आहे की वाईट, यावरून याजक त्याची किंमत ठरवेल. याजक ठरवेल तीच त्याची किंमत असेल.
१३ पण जर कधी त्या माणसाला तो प्राणी परत विकत घ्यायचा असेल, तर त्याला ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा लागेल.+
१४ जर एखाद्या माणसाने आपलं घर यहोवासाठी पवित्र म्हणून अर्पण केलं, तर ते घर चांगलं आहे की वाईट, यावरून याजक त्या घराची किंमत ठरवेल. याजकाने ठरवलेली किंमत हीच त्या घराची किंमत असेल.+
१५ पण आपलं घर अर्पण करणाऱ्या माणसाला ते परत विकत घ्यायचं असेल, तर त्याने ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा आणि मग ते घर त्याचं होईल.
१६ जर एखाद्या माणसाला आपल्या मालकीच्या शेताचा काही भाग यहोवाला अर्पण करायचा असेल, तर त्याची किंमत ते शेत पेरायला जितकं बियाणं लागतं, त्या प्रमाणात ठरवली जाईल: एक होमर* जवाच्या बियाण्याची किंमत चांदीचे ५० शेकेल असेल.
१७ जर त्याने सुटकेच्या वर्षापासून* आपलं शेत अर्पण केलं,+ तर त्याच्या शेताची ठरवलेली किंमत तितकीच राहील.
१८ पण जर त्याने सुटकेच्या वर्षानंतर आपलं शेत अर्पण केलं, तर पुढच्या सुटकेच्या वर्षापर्यंत किती वर्षं उरली आहेत, हे मोजून याजक त्याच्या शेताची किंमत ठरवेल. मग मूळ किंमतीतून तेवढी रक्कम वजा केली जावी.+
१९ पण शेत अर्पण करणाऱ्याला ते पुन्हा विकत घ्यायचं असेल, तर त्याने शेताच्या ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा आणि मग ते शेत पुन्हा त्याच्या मालकीचं होईल.
२० जर त्याने ते शेत पुन्हा विकत घेतलं नाही आणि जर ते दुसऱ्याला विकण्यात आलं, तर त्याला ते परत विकत घेता येणार नाही.
२१ सुटकेच्या वर्षी जेव्हा ते शेत परत केलं जाईल, तेव्हा ते यहोवाला समर्पित केलेलं पवित्र शेत होईल. ते याजकांच्या मालकीचं होईल.+
२२ जर एखाद्या माणसाने त्याला वारशाने मिळालेल्या मालमत्तेतलं नाही, तर विकत घेतलेलं शेत यहोवाला अर्पण केलं,+
२३ तर याजक सुटकेच्या वर्षापर्यंत त्याची किती किंमत होते हे ठरवेल आणि तो माणूस त्याच दिवशी तितकी किंमत देईल.+ ती यहोवासाठी पवित्र आहे.
२४ सुटकेच्या वर्षी, ते शेत ज्या माणसाकडून त्याने विकत घेतलं होतं, म्हणजे मुळात ते ज्याच्या मालकीचं आहे, त्याला परत मिळेल.+
२५ पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवली जावी. एक शेकेल म्हणजे २० गेरे* असतील.
२६ कोणीही प्राण्यांमधून प्रथम जन्मलेल्यांना अर्पण करू नये, कारण प्रथम जन्मलेले असल्यामुळे ते आधीच यहोवाचे आहेत.+ बैल असो किंवा मेंढा, तो आधीच यहोवाचा आहे.+
२७ जर कोणी अशुद्ध प्राण्यांपैकी एखादा अर्पण केला असेल आणि जर त्याला ठरवलेल्या किंमतीप्रमाणे तो प्राणी सोडवून घ्यायचा असेल, तर त्याने त्याच्या ठरवलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा.+ पण त्याने तो प्राणी परत विकत घेतला नाही, तर ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकला जाईल.
२८ पण एखादा माणूस यहोवाला आपल्या मालकीच्या वस्तूंपैकी जे काही बिनशर्तपणे समर्पित करतो,* ते विकलं किंवा परत विकत घेतलं जाऊ शकत नाही. मग तो एखादा माणूस असो, प्राणी असो किंवा शेत. प्रत्येक समर्पित वस्तू यहोवासाठी परमपवित्र आहे.+
२९ शिवाय, ज्या माणसाला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे, म्हणजेच ज्याला नाशासाठी राखून ठेवण्यात आलं आहे, त्याला सोडवलं जाऊ शकत नाही.+ त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं.+
३० जमिनीच्या उत्पन्नातला प्रत्येक दहावा भाग,*+ मग तो शेताच्या पिकाचा असो किंवा झाडांच्या फळांचा असो, तो यहोवाचा आहे. तो यहोवासाठी पवित्र आहे.
३१ जर एखाद्याने दिलेला दहावा भाग त्याला परत विकत घ्यायचा असेल, तर त्याने त्याच्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा.
३२ मेंढरांच्या किंवा बकऱ्यांच्या कळपातला आणि गुराढोरांतला प्रत्येक दहावा प्राणी* तुम्ही यहोवाला द्यावा. मेंढपाळाने आपले प्राणी मोजताना प्रत्येक दहावा प्राणी देवासाठी राखून ठेवावा. प्रत्येक दहावा प्राणी पवित्र असेल.
३३ तो चांगला आहे की वाईट, हे त्या माणसाने पाहू नये किंवा त्याची अदलाबदलही करू नये. पण जर त्याला अशी अदलाबदल करायची असलीच, तर आधीचा आणि त्याच्या बदल्यात दिलेला, असे दोन्ही प्राणी पवित्र मानले जातील.+ त्यांना परत विकत घेतलं जाऊ शकत नाही.’”
३४ या आज्ञा यहोवाने सीनाय पर्वतावर+ मोशेद्वारे इस्राएली लोकांना दिल्या.
तळटीपा
^ किंवा “जिवाची.”
^ किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
^ किंवा “योबेल वर्षापासून.”
^ किंवा “नाशासाठी राखून ठेवतो.”
^ किंवा “प्रत्येक दशांश.”
^ किंवा “डोकं.” मेंढपाळ आपल्या प्राण्यांना मोजताना त्यांना आपल्या काठीखालून जायला लावायचे.