लेवीय ४:१-३५

 मग यहोवा मोशेला म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, ‘यहोवाने ज्या गोष्टी करण्याची मनाई केली आहे, त्यांपैकी चुकून एखादी गोष्ट करून जर कोणी* पाप केलं+ तर असं केलं जावं: ३  जर अभिषिक्‍त याजकाने*+ पाप करून+ लोकांवर दोष आणला, तर त्याने आपल्या पापाबद्दल, कोणताही दोष नसलेला एक गोऱ्‍हा* पापार्पण म्हणून यहोवासाठी आणावा.+ ४  त्याने गोऱ्‍हा भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासमोर आणावा+ आणि गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग त्याने तो यहोवासमोर कापावा.+ ५  यानंतर अभिषिक्‍त याजकाने+ गोऱ्ह्याचं काही रक्‍त घेऊन ते भेटमंडपात आणावं. ६  याजकाने आपलं बोट त्या रक्‍तात बुडवून,+ काही रक्‍त पवित्र ठिकाणाच्या पडद्यासमोर यहोवापुढे सात वेळा शिंपडावं.+ ७  मग याजकाने काही रक्‍त भेटमंडपात यहोवासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांनाही लावावं;+ गोऱ्ह्याचं उरलेलं सगळं रक्‍त त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ ८  मग त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याची सगळी चरबी, म्हणजेच आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी काढावी. ९  तसंच, त्याने दोन्ही गुरदे व त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी आणि गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ १०  शांती-अर्पणाच्या+ गोऱ्ह्याच्या बाबतीत केलं जातं, तसंच या गोऱ्ह्याच्या बाबतीतही केलं जावं. मग याजकाने हे भाग होमार्पणाच्या वेदीवर जाळावेत. ११  पण गोऱ्ह्याची कातडी, त्याचं सगळं मांस, त्याचं डोकं, पाय, आतडी आणि शेण+ १२  म्हणजे गोऱ्ह्याचे उरलेले सगळे भाग त्याने छावणीच्या बाहेर, राख* फेकली जाते त्या स्वच्छ ठिकाणी नेऊन लाकडांवर ठेवून जाळावेत.+ राख फेकली जाते त्या ठिकाणी त्याने ते जाळावेत. १३  जर इस्राएलच्या सर्व लोकांनी चुकून एखादं पाप केल्यामुळे त्यांच्यावर दोष आला असेल;+ पण यहोवाने मनाई केलेली गोष्ट आपण केल्याचं मंडळीला* माहीत नसेल,+ १४  आणि नंतर ते पाप कळून आलं, तर मंडळीने* पापार्पण म्हणून एक गोऱ्‍हा भेटमंडपासमोर आणावा. १५  इस्राएली लोकांच्या वडीलजनांनी यहोवासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि मग तो यहोवासमोर कापावा. १६  यानंतर, अभिषिक्‍त याजकाने गोऱ्ह्याचं काही रक्‍त भेटमंडपात आणावं. १७  याजकाने त्या रक्‍तात आपलं बोट बुडवून, काही रक्‍त पडद्यासमोर यहोवापुढे सात वेळा शिंपडावं.+ १८  मग त्याने काही रक्‍त भेटमंडपात यहोवासमोर असलेल्या वेदीच्या+ शिंगांनाही लावावं; उरलेलं सगळं रक्‍त त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या+ पायथ्याशी ओतावं. १९  त्याने सगळी चरबी काढून ती वेदीवर जाळावी.+ २०  याजकासाठी दिलेल्या पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या बाबतीत केलं होतं, तसंच या गोऱ्ह्याच्या बाबतीतही केलं जावं. त्याने या गोऱ्ह्याच्या बाबतीतही तसंच करावं. अशा प्रकारे याजकाने लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावं+ म्हणजे त्यांना क्षमा केली जाईल. २१  मग त्याने आधीचा गोऱ्‍हा जाळला होता, तसाच हा गोऱ्‍हाही छावणीच्या बाहेर नेऊन जाळावा.+ हे मंडळीसाठी दिलेलं पापार्पण आहे.+ २२  आपला देव यहोवा याने मनाई केलेल्या सर्व गोष्टींपैकी एखादी गोष्ट चुकून केल्याबद्दल जर एक प्रधान+ दोषी ठरला, २३  किंवा, आपण एखादी आज्ञा मोडून पाप केल्याचं त्याला कळलं, तर त्याने कोणताही दोष नसलेला एक बकरा अर्पण म्हणून आणावा. २४  त्याने त्या बकऱ्‍याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू यहोवासमोर जिथे कापला जातो, तिथे त्याला कापावं.+ हे एक पापार्पण आहे. २५  मग, याजकाने आपल्या बोटाने या पापार्पणाचं काही रक्‍त घेऊन, ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं+ आणि उरलेलं सगळं रक्‍त त्याने होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ २६  त्याने शांती-अर्पणाच्या चरबीप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी वेदीवर जाळावी.+ अशा रितीने याजक प्रधानाच्या पापाचं प्रायश्‍चित्त करेल, म्हणजे त्याला क्षमा केली जाईल. २७  जर देशातल्या लोकांपैकी एखाद्याने* चुकून पाप केलं, आणि यहोवाने मनाई केलेली एखादी गोष्ट केल्याबद्दल तो दोषी ठरला,+ २८  किंवा आपण केलेल्या एखाद्या पापाबद्दल त्याला कळलं, तर त्याने दोष नसलेली एक बकरी आपल्या पापाबद्दल अर्पण म्हणून आणावी. २९  त्याने पापार्पण म्हणून आणलेल्या बकरीच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू कापतात तिथेच तिला कापावं.+ ३०  मग, याजकाने आपल्या बोटाने तिचं काही रक्‍त घेऊन, ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं आणि उरलेलं सगळं रक्‍त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ ३१  शांती-अर्पणाच्या चरबीप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी काढावी+ आणि याजकाने ती वेदीवर जाळावी; या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* अशा रितीने, याजक त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करेल म्हणजे त्याला क्षमा केली जाईल. ३२  पण जर त्याने पापार्पण म्हणून कोकरू आणलं, तर त्याने कोणताही दोष नसलेली मादी आणावी. ३३  त्याने पापार्पण म्हणून आणलेल्या पशूच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू जिथे कापला जातो, तिथे त्याला पापार्पण म्हणून कापावं.+ ३४  मग, याजकाने आपल्या बोटाने पापार्पणाचं काही रक्‍त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं+ आणि उरलेलं सगळं रक्‍त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं. ३५  शांती-अर्पणाच्या मेंढ्याप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी काढावी आणि याजकाने ती वेदीवर, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्‍या अर्पणांवर ठेवून जाळावी;+ अशा रितीने, त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजक प्रायश्‍चित्त करेल, म्हणजे त्याला क्षमा केली जाईल.+

तळटीपा

किंवा “एखाद्या जिवाने.”
हे महायाजकाला सूचित करतं.
किंवा “तरणा बैल.”
किंवा “चरबीयुक्‍त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
कदाचित हे मंडळीच्या वडीलजनांना सूचित करत असावं.
कदाचित हे मंडळीच्या वडीलजनांना सूचित करत असावं.
किंवा “एखाद्या जिवाने.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”