विलापगीत १:१-२२
א [आलेफ ]*
१ कशी एकाकी बसली आहे ती नगरी, जी एकेकाळी गजबजलेली होती!+
कशी विधवेसारखी झाली आहे, जी राष्ट्रांमध्ये महान होती!+
कशी सक्तीच्या मजुरीत जखडली आहे, जी प्रांतांमध्ये राजकन्या होती!+
ב [बेथ ]
२ ती रात्रभर रडत राहते,+ तिच्या गालांवरून अश्रू ओघळतात.
तिच्या सगळ्या प्रियकरांपैकी, एकही तिचं सांत्वन करायला तिच्याजवळ नाही.+
तिचे सगळे सोबती तिचे शत्रू बनले आहेत, त्यांनी तिचा विश्वासघात केलाय.+
ג [गिमेल ]
३ यहूदा बंदिवासात गेली आहे;+ तिला जुलूम आणि कठोर गुलामगिरी सहन करावी लागत आहे.+
तिला परक्या राष्ट्रांमध्ये राहावं लागेल;+ तिला विश्रांतीचं ठिकाण सापडत नाही.
तिचा छळ करणाऱ्या सर्वांनी, तिच्या संकटाच्या काळात तिला गाठलं.
ד [दालेथ ]
४ सीयोनला जाणारे रस्ते शोक करत आहेत, कारण कोणीही सणासाठी येत नाही.+
तिची सर्व फाटकं उजाड पडली आहेत;+ तिचे याजक उसासे टाकत आहेत.
तिच्या कुमारी* शोक करत आहेत आणि ती दुःखाने व्याकूळ आहे.
ה [हे ]
५ तिचे शत्रू आता तिचे मालक* बनले आहेत; तिचे वैरी बेपर्वा आहेत.+
कारण तिच्या पुष्कळ अपराधांमुळे यहोवाने तिच्यावर दुःख आणलंय.+
शत्रूने तिच्या मुलांना बंदिवासात नेलंय.+
ו [वाव ]
६ सीयोनच्या मुलीचं सर्व ऐश्वर्य नाहीसं झालंय.+
तिचे अधिकारी चारा न मिळालेल्या हरणांसारखे झाले आहेत,आपला पाठलाग करणाऱ्यांपुढे ते शक्तिहीन होऊन चालत आहेत.
ז [झाइन ]
७ यरुशलेम दुःखी आणि बेघर झाली,तेव्हा पूर्वी आपल्याजवळ असलेल्या सर्व मौल्यवान वस्तू तिला आठवल्या.+
तिचे लोक वैऱ्याच्या हाती सापडले आणि तिला कोणी सहायक नव्हता,+तेव्हा तिचा नाश झालेला पाहून तिचे शत्रू तिच्यावर हसले.+
ח [हेथ ]
८ यरुशलेमने भयंकर पाप केलंय.+
म्हणून ती घृणास्पद झाली आहे.
जे तिचा सन्मान करायचे, ते आता तिला तुच्छ लेखतात, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे.+
ती कण्हते+ आणि शरमेने तोंड लपवते.
ט [तेथ ]
९ तिची अशुद्धता तिच्या वस्त्रांत आहे.
तिने आपल्या भविष्याबद्दल जराही विचार केला नाही.+
तिचा नाश धक्कादायक होता; तिचं सांत्वन करणारं कोणीही नाही.
हे यहोवा, माझं दुःख पाहा, कारण शत्रू बढाई मारतोय.+
י [योद ]
१० शत्रूने तिचा सगळा खजिना लुटून नेलाय.+
ज्यांनी तुझ्या मंडळीत येऊ नये अशी तू आज्ञा दिली होतीस,त्या राष्ट्रांना तिने आपल्या पवित्र ठिकाणात पाऊल ठेवताना पाहिलंय.+
כ [खाफ ]
११ तिचे सगळे लोक उसासे टाकत आहेत; ते अन्न शोधत आहेत.+
जिवंत राहण्यासाठी काहीतरी खायला मिळावं, म्हणून त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू दिल्या आहेत.
हे यहोवा, पाहा, मी तुच्छ स्त्रीसारखी* झाले आहे.
ל [लामेद ]
१२ येणाऱ्या-जाणाऱ्यांनो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?
जरा माझ्याकडे पाहा!
यहोवाने आपल्या क्रोधाच्या दिवशी मला जे दुःख सोसायला लावलं,+त्यासारखं आणखी कोणतं दुःख आहे का?
מ [मेम ]
१३ त्याने स्वर्गातून माझ्यावर अग्नी पाठवून माझं प्रत्येक हाड जाळून टाकलं.+
माझ्या पायांसाठी त्याने जाळं पसरवलंय; त्याने मला माघार घ्यायला लावली आहे.
त्याने मला असाहाय्य स्त्रीसारखं केलं आहे.
दिवसभर मी दुःखीकष्टी* असते.
נ [नून ]
१४ त्याने आपल्या हाताने, माझे अपराध माझ्यावर जुवासारखे लादले आहेत.
ते माझ्या मानेवर ठेवण्यात आले आहेत; माझ्यात शक्ती उरलेली नाही.
मी ज्यांचा सामना करू शकत नाही, अशा लोकांच्या हाती मला यहोवाने दिलंय.+
ס [सामेख ]
१५ माझ्या सर्व शूरवीरांना यहोवाने बाहेर फेकून दिलंय.+
माझ्या तरुणांना चिरडण्यासाठी त्याने माझ्याविरुद्ध मोठा समुदाय जमा केलाय.+
यहोवाने यहूदाच्या कुमारीला द्राक्षकुंडात तुडवलंय.+
ע [आयन ]
१६ यामुळे मी रडत आहे;+ माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत.
माझं सांत्वन करणारं किंवा मला* दिलासा देणारं कोणीही माझ्याजवळ नाही.
माझी मुलं हताश आहेत, कारण शत्रूने त्यांच्यावर विजय मिळवलाय.
פ [पे ]
१७ सीयोनने आपले हात पसरले आहेत;+ तिला सांत्वन देणारं कोणीही नाही.
यहोवाने याकोबविरुद्ध त्याच्या आसपासच्या सर्व शत्रूंना आदेश दिलाय.+
यरुशलेम त्यांच्यासाठी घृणास्पद वस्तू झाली आहे.+
צ [सादे ]
१८ यहोवा नीतिमान आहे;+ मीच त्याच्या आज्ञांविरुद्ध बंड केलं.+
सर्व लोकांनो, ऐका आणि माझ्या यातना पाहा.
माझ्या कुमारी* आणि माझे तरुण बंदिवासात गेले आहेत.+
ק [खुफ ]
१९ मी माझ्या प्रियकरांना हाक मारली, पण त्यांनी माझा विश्वासघात केला.+
जिवंत राहण्यासाठी अन्न शोधत असताना,+माझ्या याजकांचा आणि वडीलजनांचा शहरात नाश झाला.
ר [रेश ]
२० हे यहोवा, पाहा मी मोठ्या संकटात आहे.
माझ्या आतड्यांना पीळ पडलाय.
माझ्या हृदयाला यातना होत आहेत, कारण मी फार बंडखोर झाले होते.+
बाहेर, तलवार माझ्या मुलांचा घात करते+ आणि घरातही मरण आहे.
ש [शिन ]
२१ लोकांनी माझे उसासे ऐकले आहेत; मला सांत्वन देणारं कोणीही नाही.
माझ्या सर्व शत्रूंनी माझ्यावर आलेल्या संकटाबद्दल ऐकलंय.
ते खूश आहेत, कारण तू ते आणलं आहेस.+
पण तू घोषित केलेला दिवस तू आणशील,+ तेव्हा त्यांचीही माझ्यासारखीच दशा होईल.+
ת [ताव ]
२२ त्यांचा सर्व दुष्टपणा तुझ्यापुढे येऊ दे,आणि माझ्या सर्व अपराधांमुळे जसा तू माझ्याशी कठोरपणे वागलास,तसाच तू त्यांच्याशीही कठोरपणे वाग.+
कारण मी उसासे टाकून थकले आहे आणि माझ्या हृदयाला यातना होत आहेत.
तळटीपा
^ अध्याय १-४ हिब्रू वर्णमालेतल्या अक्षरांच्या क्रमाने रचलेली शोकगीतं आहेत.
^ किंवा “तरुण स्त्रिया.”
^ शब्दशः “डोकं.”
^ यरुशलेमला सूचित करणारा भाषालंकार.
^ शब्दशः “आजारी.”
^ किंवा “माझ्या जिवाला.”
^ किंवा “तरुण स्त्रिया.”