विलापगीत २:१-२२

  • यरुशलेमवर यहोवाचा क्रोध

    • दयामाया दाखवली नाही ()

    • यहोवा तिच्यासाठी शत्रूसारखा ()

    • सीयोनसाठी अश्रू (११-१३)

    • येणारे-जाणारे पूर्वीच्या सुंदर नगरीची थट्टा करतात (१५)

    • सीयोनच्या नाशामुळे शत्रू आनंदी (१७)

א [आलेफ ]  यहोवाने सीयोनच्या मुलीला आपल्या क्रोधाच्या मेघाने कसं झाकून टाकलंय! इस्राएलचं सौंदर्य त्याने आकाशातून पृथ्वीवर फेकून दिलंय.+ त्याच्या क्रोधाच्या दिवशी त्याने आपल्या पायांच्या आसनाची+ आठवण ठेवली नाही. ב [बेथ ]  २  यहोवाने याकोबच्या सगळ्या वस्त्या गिळून टाकल्या आहेत; त्याने दयामाया दाखवली नाही. त्याच्या क्रोधाच्या भरात त्याने यहूदाच्या सगळ्या तटबंद्या पाडून टाकल्या आहेत.+ त्याने यहूदाला आणि तिच्या अधिकाऱ्‍यांना धुळीला मिळवून त्यांना दूषित केलंय.+ ג [गिमेल ]  ३  त्याने संतापाच्या भरात इस्राएलचं सगळं सामर्थ्य* मोडून टाकलंय. शत्रूने हल्ला केला, तेव्हा त्याने आपला उजवा हात मागे घेतला.+ याकोबमध्ये तो आगीसारखा जळत राहिला आणि त्याने आपल्या आसपासचं सगळं काही भस्म केलं.+ ד [दालेथ ]  ४  त्याने शत्रूप्रमाणे आपलं धनुष्य वाकवलंय;* त्याचा उजवा हात वैऱ्‍यासारखा सज्ज आहे;+आमच्या दृष्टीने प्रिय असलेल्या सर्वांना त्याने ठार मारलं.+ त्याने सीयोनच्या मुलीच्या तंबूत+ आपला क्रोध आगीसारखा ओतला.+ ה [हे ]  ५  यहोवा शत्रूसारखा झालाय;+त्याने इस्राएलला गिळून टाकलंय. तिचे सगळे बुरूज त्याने गिळून टाकले आहेत. तिच्या तटबंद्यांचा त्याने नाश केलाय. त्याने यहूदाच्या मुलीचा शोक आणि आक्रोश वाढवलाय. ו [वाव ]  ६  बागेतली झोपडी असल्याप्रमाणे तो आपला मंडप उद्ध्‌वस्त करतो.+ त्याने आपला सण बंद केलाय.+ सीयोनमध्ये यहोवाने सणाचा आणि शब्बाथाचा विसर पाडलाय. त्याच्या तीव्र संतापापुढे त्याने राजाची आणि याजकाचीही गय केली नाही.+ ז [झाइन ]  ७  यहोवाने आपल्या वेदीकडे पाठ फिरवली आहे;त्याने आपलं पवित्र ठिकाण तुच्छ लेखलंय.+ त्याने तिच्या बुरुजांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.+ सणाच्या दिवशी जल्लोष करावा, तसा ते यहोवाच्या घरात गोंगाट करत आहेत.+ ח [हेथ ]  ८  यहोवाने सीयोनची भिंत जमीनदोस्त करायचं ठरवलंय.+ त्याने मोजण्याची दोरी ताणली आहे.+ त्याने नाश आणण्यापासून* आपला हात आवरला नाही. तो तटाला आणि बुरुजांना शोक करायला लावतो. ते सर्व कमजोर झाले आहेत. ט [तेथ ]  ९  तिची फाटकं जमिनीत खचली आहेत.+ त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत. तिचा राजा आणि तिचे अधिकारी राष्ट्रांमध्ये बंदिवान आहेत.+ कोणीच नियमशास्त्र* पाळत नाही; तिच्या संदेष्ट्यांनाही यहोवाकडून दृष्टान्त मिळत नाहीत.+ י [योद ] १०  सीयोनचे वडीलजन शांतपणे जमिनीवर बसले आहेत.+ ते आपल्या डोक्यावर धूळ घालत आहेत; त्यांनी गोणपाट घातलंय.+ यरुशलेमच्या मुलींनी वाकून जमिनीवर डोकं टेकलंय. כ [खाफ ] ११  अश्रू गाळून माझे डोळे थकले आहेत.+ माझ्या आतड्यांना पीळ पडलाय. माझ्या लोकांच्या मुलीच्या* विनाशामुळे, माझं काळीज तुटतंय.*+ शहराच्या चौकांत चिमुकली मुलं आणि तान्ही बाळं बेशुद्ध होऊन पडत आहेत.+ ל [लामेद ] १२  शहराच्या चौकांत ती जखमी माणसांप्रमाणे मरायला टेकलेली आहेत. आपल्या आईच्या कुशीत प्राण सोडताना,ती तिला विचारतात, “अन्‍न आणि द्राक्षारस कुठे आहे?”+ מ [मेम ] १३  हे यरुशलेमच्या मुली, मी तुला कोणतं उदाहरण देऊ? मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनच्या कुमारी, तुझं सांत्वन करण्यासाठी मी कोणाशी तुझी तुलना करू? कारण तुझा विनाश समुद्राइतका मोठा आहे.+ तुला कोण बरं करेल?+ נ [नून ] १४  तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्याबद्दल पाहिलेले दृष्टान्त खोटे आणि निरर्थक होते,+तुझे अपराध उघड करून त्यांनी तुला बंदिवासात जाण्यापासून वाचवलं नाही,+उलट, ते खोटे आणि भ्रमात पाडणारे दृष्टान्त सांगत राहिले.+ ס [सामेख ] १५  रस्त्यावरून येणारे-जाणारे सर्व जण तुझी थट्टा करण्यासाठी टाळ्या वाजवतात.+ ते यरुशलेमकडे पाहून शिट्ट्या वाजवतात*+ आणि माना डोलावून म्हणतात: “‘सर्वात सुंदर नगरी, सगळ्या पृथ्वीचा आनंद,’ असं जिच्याबद्दल म्हणायचे ती हीच ना?”+ פ [पे ] १६  तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध तोंड उघडलंय. ते शिट्ट्या वाजवतात, दातओठ खातात आणि म्हणतात: “आम्ही तिला गिळून टाकलंय.+ याच दिवसाची आम्ही वाट पाहत होतो!+ शेवटी तो आला; आम्ही आपल्या डोळ्यांनी तो पाहिला!”+ ע [आयन ] १७  यहोवाच्या मनात जे होतं, ते त्याने केलंय;+ त्याने आपले शब्द पूर्ण केले.+ फार पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे+ त्याने घडवून आणलंय. त्याने दयामाया न दाखवता तुला जमीनदोस्त केलंय.+ त्याने शत्रूला तुझ्याविरुद्ध विजयी करून त्याला आनंदी केलंय;त्याने तुझ्या वैऱ्‍यांचं सामर्थ्य* वाढवलंय. צ [सादे ] १८  हे सीयोन, तुझे लोक मनापासून यहोवाला हाक मारतात. तुझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रूंच्या धारा वाहू दे. थोडाही विसावा घेऊ नकोस आणि तुझ्या डोळ्यांना विश्रांती देऊ नकोस. ק [खुफ ] १९  ऊठ! रात्रभर* आक्रोश कर. पाणी ओतावं तसं यहोवासमोर आपलं मन मोकळं कर. दुष्काळामुळे तुझी मुलंबाळं प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्‍यावर भुकेने व्याकूळ होऊन पडली आहेत.+ त्यांचा जीव वाचावा म्हणून त्याच्यापुढे हात पसर. ר [रेश ] २०  हे यहोवा, तू ज्यांच्याशी इतक्या कठोरपणे वागलास त्यांच्याकडे पाहा. स्त्रियांनी आपली पोटची मुलं, आपली पूर्ण वाढलेली मुलं खात राहावीत का?+ याजकांना आणि संदेष्ट्यांना यहोवाच्या मंदिरात ठार मारलं जावं का?+ ש [शिन ] २१  तरुण आणि म्हातारा दोघंही रस्त्यांवर मरून पडलेले आहेत.+ माझ्या कुमारींचा* आणि तरुणांचा तलवारीने घात झालाय.+ तुझ्या क्रोधाच्या दिवशी तू त्यांना ठार मारलंस; तू दयामाया न दाखवता कत्तल केलीस.+ ת [ताव ] २२  सणाच्या दिवसासाठी बोलवावं,+ त्याप्रमाणे मला भीतिदायक वाटणाऱ्‍या गोष्टी तू सर्व दिशांवरून बोलावतोस. यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी, कोणीही निसटून जाऊ शकलं नाही किंवा वाचलं नाही;+मी ज्यांना जन्म दिला आणि वाढवलं, त्यांचा माझ्या शत्रूने नाश केला.+

तळटीपा

शब्दशः “प्रत्येक शिंग.”
शब्दशः “तुडवलंय.”
शब्दशः “गिळून टाकण्यापासून.”
किंवा “शिकवण.”
शब्दशः “माझं काळीज पृथ्वीवर ओतून टाकण्यात आलंय.”
दया आणि सहानुभूती व्यक्‍त करण्यासाठी इथे आलंकारिक भाषेत लोकांची तुलना मुलीशी करण्यात आली आहे.
यावरून कदाचित आश्‍चर्य किंवा तिरस्कार सूचित होत असावा.
शब्दशः “शिंग.”
शब्दशः “प्रहरांच्या सुरुवातीला.”
किंवा “तरुणींचा.”