विलापगीत ३:१-६६
א [आलेफ ]
३ मी त्याच्या क्रोधाच्या काठीमुळे दुःख सोसलेला माणूस आहे.
२ त्याने मला हाकलून लावलंय; तो मला उजेडात नाही, तर अंधारात चालायला लावतो.+
३ तो तर दिवसभर माझ्यावर पुन्हापुन्हा हात उगारतो.+
ב [बेथ ]
४ त्याने माझं मांस आणि माझी कातडी झिजवून टाकली आहे;त्याने माझी हाडं मोडून टाकली आहेत.
५ त्याने मला वेढा घातलाय; तो कडू विषाने+ आणि संकटाने मला घेरतो.
६ तो मला फार पूर्वी मेलेल्या माणसांप्रमाणे, अंधाऱ्या ठिकाणांत बसायला लावतो.
ג [गिमेल ]
७ मी पळून जाऊ नये, म्हणून त्याने माझ्याभोवती भिंत उभारली आहे.
त्याने मला तांब्याच्या बोजड बेड्यांनी जखडलंय.+
८ मी कळकळून विनंती करतो, तेव्हा तो माझी प्रार्थना झिडकारतो.*+
९ त्याने मोठ्या दगडांनी माझे मार्ग अडवले आहेत;त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत.+
ד [दालेथ ]
१० एखाद्या अस्वलासारखा, लपून बसलेल्या सिंहासारखा तो माझ्यासाठी टपून बसलाय.+
११ त्याने मला मार्गावरून बाजूला ओढून नेलंय आणि फाडून माझे तुकडेतुकडे केले आहेत;*त्याने मला उद्ध्वस्त केलंय.+
१२ त्याने आपलं धनुष्य वाकवलंय* आणि मला आपल्या बाणाचं निशाण बनवलंय.
ה [हे ]
१३ त्याने आपल्या भात्यातले बाण* माझ्या हृदयात* घुसवले आहेत.
१४ मी सर्व लोकांसाठी हसण्याचा विषय बनलोय; ते दिवसभर गाणी म्हणून माझी थट्टा करतात.
१५ त्याने मला कडू गोष्टी खायला दिल्या आहेत आणि तो सतत मला कडूदवणा* प्यायला लावतो.+
ו [वाव ]
१६ तो खड्यांनी माझे दात तोडतो;तो मला राखेत लोळायला लावतो.+
१७ तू माझी* शांती हिरावून घेतोस; सुख काय असतं, हे मी विसरून गेलोय.
१८ म्हणून मी म्हणतो: “माझं वैभव नष्ट झालंय, यहोवावरची माझी आशा धुळीला मिळाली आहे.”
ז [झाइन ]
१९ माझं दुःख आणि माझी बेघर स्थिती आठव,+ मी कडूदवणा आणि कडू विष खातोय,+ हे आठव.
२० तू नक्कीच हे आठवशील आणि खाली वाकून मला मदत करशील.+
२१ मी मनोमन या गोष्टी आठवतो, म्हणूनच मी धीराने वाट पाहीन.+
ח [हेथ ]
२२ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही,+कारण त्याची दया कधीच संपत नाही.+
२३ ती रोज सकाळी नवी होते;+ तुझा विश्वासूपणा अपार आहे.+
२४ मी म्हणालो: “यहोवा माझा वाटा आहे,+ म्हणून मी त्याची धीराने वाट पाहीन.”+
ט [तेथ ]
२५ जो यहोवावर आशा ठेवतो, जो* त्याची वाट पाहतो,+ त्याच्यावर तो कृपा करतो.+
२६ यहोवाकडून मिळणाऱ्या तारणाची शांतपणे* वाट पाहणं चांगलं आहे.+
२७ तरुणाने आपल्या तारुण्यात जू* वाहणं चांगलं आहे.+
י [योद ]
२८ देव त्याच्यावर जू लादतो, तेव्हा त्याने एकटं बसावं आणि शांत राहावं.+
२९ त्याने आपलं तोंड धुळीत खुपसावं;+ कदाचित त्याच्यासाठी अजूनही आशा असेल.+
३० त्याला मारणाऱ्याकडे त्याने आपला गाल पुढे करावा; करता येईल तितका अपमान त्याने सहन करावा.
כ [खाफ ]
३१ कारण यहोवा आपल्याला कायमचं सोडून देणार नाही.+
३२ जरी त्याने दुःख दिलं असलं, तरी त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे तो आपल्यावर दयाही करेल.+
३३ कारण मानवांवर संकटं आणणं, किंवा त्यांना दुःख देणं त्याला आवडत नाही.+
ל [लामेद ]
३४ पृथ्वीवरच्या सर्व कैद्यांना पायाखाली तुडवणं,+
३५ सर्वोच्च देवासमोर एखाद्यावर अन्याय करणं,+
३६ एखाद्याला खटल्यात न्याय न मिळू देणं,अशा गोष्टी यहोवा खपवून घेत नाही.
מ [मेम ]
३७ मग यहोवाने आज्ञा दिल्याशिवाय, कोण एखादी गोष्ट बोलून, ती घडवून आणू शकतं?
३८ सर्वोच्च देवाच्या तोंडून,चांगल्या गोष्टींसोबत, वाईट गोष्टी निघत नाहीत.
३९ माणसाने आपल्या पापाच्या परिणामांबद्दल तक्रार का करावी?+
נ [नून ]
४० आपण आपले मार्ग तपासून पाहू या, त्यांचं बारकाईने परीक्षण करू या+ आणि यहोवाकडे परत जाऊ या.+
४१ आपण आपल्या हातांसोबत आपलं हृदयसुद्धा स्वर्गातल्या देवापुढे उंचावू या.+
४२ “आम्ही अपराध आणि बंड केलंय,+ आणि तू क्षमा केली नाहीस.+
ס [सामेख ]
४३ तू क्रोधाने, तुझ्याकडे येण्याचा आमचा मार्ग रोखला आहेस;+आमचा पाठलाग करून, दयामाया न दाखवता तू आम्हाला ठार केलंस.+
४४ आमच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत येऊ नयेत,म्हणून तुझ्याकडे येण्याचा मार्ग तू मेघाने अडवला आहेस.+
४५ तू लोकांमध्ये आम्हाला गाळासारखं आणि केरकचऱ्यासारखं केलं आहेस.”
פ [पे ]
४६ आमचे सर्व शत्रू आमच्याविरुद्ध बोलतात.+
४७ दहशत आणि खाचखळगे;+ ओसाडी आणि विनाश+ आमच्या वाट्याला आले आहेत.
४८ माझ्या लोकांच्या मुलीचा नाश पाहून, माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात.+
ע [आयन ]
४९ माझ्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत, ते अखंड वाहत राहतात.+
५० जोपर्यंत यहोवा स्वर्गातून खाली वाकून आपल्या लोकांचं दुःख पाहत नाही,+ तोपर्यंत माझे अश्रू थांबणार नाहीत.
५१ माझ्या शहराच्या सर्व मुलींवर आलेल्या दुःखामुळे, माझ्या डोळ्यांनी मला* यातना दिल्या आहेत.+
צ [सादे ]
५२ माझ्या शत्रूंनी उगाचच माझा पाठलाग करून, पक्ष्यासारखी माझी शिकार केली आहे.
५३ त्यांनी मला खड्ड्यात टाकून कायमचं शांत केलंय; ते माझ्यावर दगड फेकत राहतात.
५४ पाणी माझ्या डोक्यावरून गेलंय; मी म्हणालो: “आता सर्वच संपलं!”
ק [खुफ ]
५५ हे यहोवा, मी खोल खड्ड्यातून तुझ्या नावाने तुला हाक मारली.+
५६ माझी प्रार्थना ऐक; मदतीसाठी आणि सुटकेसाठी केलेल्या माझ्या याचनेकडे दुर्लक्ष करू नकोस.
५७ मी हाक मारली त्या दिवशी तू माझ्याजवळ आलास. तू म्हणालास: “घाबरू नकोस.”
ר [रेश ]
५८ हे यहोवा, तू माझ्या बाजूने लढलास; तू माझ्या जिवाची सुटका केलीस.+
५९ हे यहोवा, माझ्यावर झालेला अन्याय तू पाहिला आहेस; कृपा करून मला न्याय दे.+
६० त्यांनी कसा माझा सूड घेतला, माझ्याविरुद्ध कशी कारस्थानं केली, हे सर्व तू पाहिलं आहेस.
ש [शिन ]
६१ हे यहोवा, तू त्यांचे टोमणे आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या दुष्ट योजना ऐकल्या आहेस.+
६२ माझ्या विरोधकांचे शब्द आणि दिवसभर ते माझ्याविरुद्ध कसे कुजबुज करतात, हे तू ऐकलं आहेस.
६३ त्यांच्याकडे पाहा! ते उठता-बसता त्यांच्या गाण्यांमधून माझी थट्टा करतात.
ת [ताव ]
६४ हे यहोवा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे तू त्यांची परतफेड करशील.
६५ त्यांना शाप देऊन, तू त्यांचं हृदय कठोर करशील.
६६ हे यहोवा, तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील आणि तुझ्या आकाशाखालून त्यांचा सर्वनाश करशील.
तळटीपा
^ किंवा “अडवतो.”
^ किंवा कदाचित, “मला पडीक राहू देतोस.”
^ शब्दशः “तुडवलंय.”
^ शब्दशः “मुलं.”
^ शब्दशः “गुरदे.”
^ एक कडू वनस्पती.
^ किंवा “माझ्या जिवाची.”
^ किंवा “ज्याचा जीव.”
^ किंवा “धीराने.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “माझ्या जिवाला.”