विलापगीत ४:१-२२
א [आलेफ ]
४ शुद्ध, चकाकतं सोनं+ कसं निस्तेज झालंय!
पवित्र ठिकाणाचे दगड+ कसे शहराच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर पडले आहेत!+
ב [बेथ ]
२ सीयोनची प्रिय मुलं, ज्यांची उत्तम प्रतीच्या सोन्याशी तुलना केली जायची,*त्यांना मातीच्या मडक्यांसारखं;कुंभाराने घडवलेल्या भांड्यांसारखं लेखण्यात आलंय!
ג [गिमेल ]
३ कोल्हीणसुद्धा आपल्या पिल्लांना पाजते,पण माझ्या लोकांची मुलगी ओसाड रानातल्या शहामृगींसारखी+ निर्दय झाली आहे.+
ד [दालेथ ]
४ तान्ह्या बाळाची जीभ तहानेमुळे त्याच्या टाळूला चिकटते.
मुलंबाळं भाकरीसाठी भीक मागतात,+ पण कोणी त्यांना तुकडासुद्धा देत नाही.+
ה [हे ]
५ जे एकेकाळी चमचमीत पदार्थ खायचे, ते रस्त्यांवर उपाशी* पडले आहेत.+
जे लहानपणापासून महागाचे कपडे घालायचे,+ त्यांनी राखेच्या ढिगाऱ्यांचा आश्रय घेतलाय.
ו [वाव ]
६ माझ्या लोकांच्या मुलीला मिळालेली शिक्षा,* सदोमच्या पापाबद्दल+ देण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा भयंकर आहे;त्या शहराचा एका क्षणात नाश झाला होता आणि कोणीही त्याला साहाय्य केलं नाही.+
ז [झाइन ]
७ तिचे नाझीर+ बर्फापेक्षा स्वच्छ, दुधापेक्षा शुभ्र होते.
त्यांची त्वचा पोवळ्यांपेक्षा लाल होती; ते चमकवलेल्या नीलमण्यांसारखे होते.
ח [हेथ ]
८ आता तर त्यांचे चेहरे काजळापेक्षा* काळे झाले आहेत;रस्त्यांवर त्यांना कोणीही ओळखत नाही.
त्यांची सुरकुतलेली कातडी, त्यांच्या हाडांना चिकटली आहे;+ ती सुकलेल्या लाकडासारखी झाली आहे.
ט [तेथ ]
९ ज्यांना तलवारीने मारण्यात आलं, ते दुष्काळाला बळी पडलेल्यांपेक्षा;+खंगत चाललेल्या आणि उपासमारीने घात झालेल्यांपेक्षा बरे आहेत.
י [योद ]
१० कोमल मनाच्या स्त्रियांनी आपल्या हातांनी स्वतःच्या मुलांना उकळलं.+
माझ्या लोकांच्या मुलीचा विनाश झाला, तेव्हा त्यांची मुलंच त्यांचं अन्न* झाली.+
כ [खाफ ]
११ यहोवाने आपला क्रोध प्रकट केलाय;त्याने त्याच्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केलाय.+
सीयोनमध्ये त्याने अशी आग पेटवली, जिने तिचे पाये भस्म केले आहेत.+
ל [लामेद ]
१२ शत्रू यरुशलेमच्या फाटकांतून आत गेला,यावर पृथ्वीच्या राजांचा आणि सर्व रहिवाशांचा विश्वास बसला नाही.+
מ [मेम ]
१३ तिच्या संदेष्ट्यांच्या पापांमुळे, तिच्या याजकांच्या अपराधांमुळे हे घडलं;+त्यांनी तिच्यात नीतिमान लोकांचं रक्त सांडलं.+
נ [नून ]
१४ ते रस्त्यांवर आंधळ्यांसारखे भटकत आहेत.+
ते रक्ताने माखले आहेत,+त्यामुळे कोणीही त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करू शकत नाही.
ס [सामेख ]
१५ लोक त्यांना म्हणतात, “अशुद्ध झालेल्यांनो, निघून जा! चालते व्हा! चालते व्हा! आम्हाला स्पर्श करू नका!”
ते बेघर झाले आहेत आणि भटकत राहतात.
राष्ट्रांतले लोक म्हणतात: “ते आमच्यामध्ये राहू शकत नाहीत.”*+
פ [पे ]
१६ यहोवाने त्यांची पांगापांग केली आहे;+तो यापुढे त्यांच्यावर कृपा करणार नाही.
लोक याजकांचा आदर करणार नाहीत+ आणि वडीलजनांची कदर करणार नाहीत.+
ע [आयन ]
१७ साहाय्यासाठी आम्ही उगीच वाट पाहत राहिलो आणि आमचे डोळे थकून गेले.+
आम्ही एका राष्ट्राकडून मदतीसाठी खूप वाट पाहिली, पण ते आम्हाला वाचवू शकलं नाही.+
צ [सादे ]
१८ त्यांनी सतत आमचा पाठलाग केला;+ आम्ही आपल्या चौकांतून चालूही शकत नाही.
आमचा अंत जवळ आला आहे; आमचे दिवस संपले आहेत, कारण आमचा शेवट आला आहे.
ק [खुफ ]
१९ आमचा पाठलाग करणारे आकाशातल्या गरुडांपेक्षाही वेगवान होते.+
त्यांनी डोंगरांवर आमचा पिच्छा पुरवला; ओसाड रानात ते आमचा घात करण्यासाठी टपून बसले.
ר [रेश ]
२० “त्याच्या छत्रछायेत आपण राष्ट्रांमध्ये राहू,” असं ज्याच्याबद्दल आम्ही म्हणायचो,तो आमच्या नाकपुड्यांतला श्वास, यहोवाचा अभिषिक्त,+ बंदी होऊन त्यांच्या मोठ्या खळग्यात अडकलाय.+
ש [शिन ]
२१ ऊस देशात राहणाऱ्या अदोमच्या मुली,+ आनंदी होऊन जल्लोष कर!
पण संकटाचा प्याला तुझ्या हातातही येईल+ आणि तू धुंद होऊन आपली नग्नता उघड करशील.+
ת [ताव ]
२२ हे सीयोनच्या मुली, तुझ्या अपराधाची शिक्षा पूर्ण झाली आहे.
तो तुला पुन्हा बंदिवासात नेणार नाही.+
पण हे अदोमच्या मुली, तुझ्या अपराधाकडे तो आपलं लक्ष वळवेल.
तो तुझी पापं उजेडात आणेल.+
तळटीपा
^ किंवा “सोन्याइतकी मौल्यवान होती.”
^ शब्दशः “उजाड.”
^ शब्दशः “अपराध.”
^ शब्दशः “काळेपणा.”
^ किंवा “शोकाचं अन्न.”
^ किंवा “विदेशी म्हणून इथे राहू शकत नाहीत.”