शास्ते १:१-३६

  • यहूदा आणि शिमोन यांनी मिळवलेला विजय (१-२०)

  • यबूसी लोक यरुशलेममध्येच राहतात (२१)

  • योसेफ बेथेलवर कब्जा करतो (२२-२६)

  • कनानी लोकांना पूर्णपणे हाकलून दिलं जात नाही (२७-३६)

 यहोशवाच्या मृत्यूनंतर+ इस्राएली लोकांनी यहोवाला* विचारलं:+ “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी सगळ्यात आधी कोणी जावं?” २  त्यावर यहोवा म्हणाला: “यहूदाचे वंशज जातील.+ मी हा देश त्यांच्या हाती देत आहे.”* ३  तेव्हा यहूदाचे वंशज आपल्या भावांना, म्हणजे शिमोनच्या वंशजांना म्हणाले: “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यासोबत आम्हाला दिलेल्या* प्रदेशात चला.+ नंतर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत तुमच्या प्रदेशात येऊ.” त्यामुळे, शिमोनचे वंशज त्यांच्यासोबत गेले. ४  यहूदाचे वंशज लढायला गेले, तेव्हा यहोवाने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हाती दिलं;+ त्यांनी बेजेक इथे १०,००० माणसांना हरवलं. ५  कनानी+ आणि परिज्जी+ लोकांना हरवताना त्यांना बेजेकमध्ये अदोनी-बेजेक सापडला, आणि ते त्याच्याशी लढले. ६  पण, त्याने त्यांच्यापासून पळ काढला. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं, आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. ७  तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला: “मी ७० राजांच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले होते, आणि ते माझ्या मेजावरून पडलेलं अन्‍न उचलून खायचे. मी त्यांच्यासोबत जे केलं, तेच देवाने माझ्यासोबत केलंय.” त्यानंतर, त्यांनी त्याला यरुशलेममध्ये+ आणलं, आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. ८  मग, यहूदाच्या वंशजांनी यरुशलेमवरही+ हल्ला केला आणि त्यावर कब्जा मिळवला; त्यांनी तिथल्या लोकांना तलवारीने मारून टाकलं आणि शहराला आग लावली. ९  त्यानंतर, यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या, तसंच नेगेब आणि शेफीला+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांशी लढायला गेले. १०  यहूदाचे वंशज हेब्रोन इथल्या कनानी लोकांशी लढायला गेले (हेब्रोनचं पूर्वीचं नाव किर्याथ-अर्बा असं होतं); तिथे त्यांनी शेशय, अहीमान आणि तलमय यांना मारून टाकलं.+ ११  तिथून ते दबीरमध्ये राहणाऱ्‍या लोकांशी लढायला गेले.+ (दबीरचं पूर्वीचं नाव किर्याथ-सेफर असं होतं.)+ १२  मग कालेब+ म्हणाला: “जो कोणी किर्याथ-सेफरवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवेल त्याचं लग्न मी माझ्या मुलीसोबत, अखसासोबत लावून देईन.”+ १३  तेव्हा, अथनिएलने+ किर्याथ-सेफरवर कब्जा मिळवला; तो कालेबचा लहान भाऊ कनाज याचा मुलगा होता.+ मग, कालेबने आपली मुलगी अखसा हिचं अथनिएलसोबत लग्न लावून दिलं. १४  आपल्या नवऱ्‍याच्या घरी जात असताना तिने नवऱ्‍याकडे असा आग्रह धरला, की अथनिएलने तिच्या वडिलांकडून जमीन मागून घ्यावी. ती गाढवावरून उतरली,* तेव्हा कालेबने तिला विचारलं: “तुला काय हवंय?” १५  ती त्याला म्हणाली: “मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला दक्षिणेकडे* जमिनीचा एक तुकडा दिलाय; आता मला गुल्लोथ-माईमसुद्धा* द्या.” म्हणून मग कालेबने तिला वरचं गुल्लोथ आणि खालचं गुल्लोथ दिलं. १६  मोशेचा सासरा+ एक केनी माणूस होता.+ त्याचे वंशज यहूदाच्या लोकांसोबत खजुराच्या झाडांच्या शहरातून*+ आले होते; ते अरादच्या+ दक्षिणेकडे असलेल्या यहूदाच्या ओसाड रानात गेले आणि तिथल्या लोकांमध्ये राहू लागले.+ १७  मग, यहूदाचे वंशज आपल्या भावांसोबत, म्हणजे शिमोनच्या वंशजांसोबत सफातमध्ये गेले. तिथल्या कनानी लोकांवर हल्ला करून त्यांनी त्या शहराचा पूर्णपणे नाश केला;+ त्यामुळे त्यांनी त्या शहराचं नाव हर्मा* असं ठेवलं.+ १८  नंतर यहूदाच्या वंशजांनी गाझा,+ अष्कलोन+ व एक्रोन+ या शहरांवर आणि त्यांच्या प्रदेशांवर कब्जा केला. १९  यहोवा यहूदाच्या वंशजांसोबत होता; आणि त्यांनी डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला. पण, सपाट प्रदेशात राहणाऱ्‍या लोकांना मात्र ते हाकलून देऊ शकले नाहीत. कारण, त्यांच्याकडे युद्धाचे लोखंडी रथ असून त्यांच्या चाकांना लांब सुऱ्‍या होत्या.+ २०  मोशेने दिलेल्या वचनाप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आलं;+ त्याने तिथून अनाकच्या तीन मुलांना हाकलून लावलं.+ २१  पण, बन्यामीनच्या वंशजांनी यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी लोकांना घालवून दिलं नाही. त्यामुळे, आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेममध्ये बन्यामीनच्या वंशजांसोबत राहत आहेत.+ २२  यादरम्यान, योसेफचे वंशज+ बेथेल शहरावर हल्ला करायला गेले; आणि यहोवा त्यांच्यासोबत होता.+ २३  त्यांनी काही गुप्तहेरांना बेथेल शहर हेरण्यासाठी पाठवलं. (त्या शहराचं पूर्वीचं नाव लूज होतं.)+ २४  त्या गुप्तहेरांना शहरातून एक माणूस बाहेर येताना दिसला, तेव्हा ते त्याला म्हणाले: “कृपा करून आम्हाला शहरात घुसण्याचा मार्ग दाखव, आणि आम्ही तुझ्यावर दया करू.”* २५  तेव्हा त्याने त्यांना शहरात घुसण्याचा मार्ग दाखवला, आणि त्यांनी शहरातल्या लोकांना तलवारीने मारून टाकलं. पण, त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मात्र त्यांनी सोडून दिलं.+ २६  तो माणूस हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला. तिथे त्याने एक शहर बांधलं आणि त्याला लूज हे नाव दिलं; आजही ते शहर त्याच नावाने ओळखलं जातं. २७  मनश्‍शेच्या वंशजांनी बेथ-शान, तानख,+ दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही शहरं आणि त्यांच्या आसपासची नगरं+ ताब्यात घेतली नाहीत; कारण, कनानी लोक तिथून निघून जायला तयार नव्हते. २८  इस्राएली लोक शक्‍तिशाली झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपले गुलाम बनवलं;+ पण, त्यांनी त्यांना पूर्णपणे घालवून दिलं नाही.+ २९  तसंच, एफ्राईमच्या वंशजांनीसुद्धा गेजेरमध्ये राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही; म्हणून कनानी लोक गेजेरमध्ये एफ्राईमच्या वंशजांमध्ये राहिले.+ ३०  जबुलूनच्या वंशजांनी कित्रोन आणि नहलोल+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही. ते लोक त्यांच्यातच राहिले आणि जबुलूनच्या वंशजांनी त्यांना आपले गुलाम बनवलं.+ ३१  आशेरच्या वंशजांनी अक्को, सीदोन,+ अहलाब, अकजीब,+ हेल्बा, अफीक+ आणि रहोब+ इथे राहणाऱ्‍या लोकांना घालवून दिलं नाही. ३२  म्हणून, आशेरचे वंशज त्या देशातल्या कनानी लोकांमध्येच राहिले, कारण त्यांनी कनानी लोकांना घालवून दिलं नाही. ३३  नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही; ते त्या देशातल्या कनानी लोकांमध्येच राहिले.+ आणि त्यांनी बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथमधल्या लोकांना आपले गुलाम बनवलं. ३४  अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना खाली सपाट प्रदेशात येऊ दिलं नाही; त्यामुळे त्यांना डोंगराळ प्रदेशातच राहावं लागलं.+ ३५  अमोरी लोक हेरेस डोंगर, अयालोन+ आणि शालबीमचा+ प्रदेश सोडायला तयार नव्हते. पण योसेफचे वंशज शक्‍तिशाली झाले, तेव्हा त्यांनी अमोरी लोकांना आपले गुलाम बनवलं. ३६  अमोरी लोकांच्या प्रदेशाची सीमा अक्राब्बीमच्या+ चढापासून आणि सेलापासून वर जात होती.

तळटीपा

किंवा “दिला आहे.”
शब्दशः “माझ्या हिश्‍शाच्या.”
किंवा कदाचित, “लक्ष वेधून घेण्यासाठी गाढवावर बसलेली असताना तिने टाळी वाजवली.”
किंवा “नेगेबकडे.”
म्हणजे, “पाण्याचे झरे.”
म्हणजे, यरीहो शहरातून.
शब्दशः “नाशाच्या लायक ठरवणं.”
शब्दशः “एकनिष्ठ प्रेम दाखवू.”