शास्ते १०:१-१८

  • न्यायाधीश तोला आणि याईर (१-५)

  • इस्राएलचं बंड आणि पश्‍चात्ताप (६-१६)

  • अम्मोनी लोक इस्राएलविरुद्ध उठतात (१७, १८)

१०  अबीमलेखनंतर, इस्राएलचं संरक्षण करण्यासाठी+ तोला नावाचा मनुष्य पुढे आला. तो पुवाचा मुलगा आणि दोदोचा नातू होता. तो इस्साखार वंशातला असून, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातल्या शामीर इथे राहायचा. २  त्याने २३ वर्षं इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर इथे पुरण्यात आलं. ३  त्याच्यानंतर गिलाद प्रदेशातला याईर नावाचा मनुष्य पुढे आला. त्याने २२ वर्षं इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं. ४  त्याला ३० मुलं होती आणि स्वारी करण्यासाठी त्यांच्याकडे ३० गाढवं होती. तसंच, गिलादच्या प्रदेशात त्यांची ३० शहरंही होती. ती आजपर्यंत हव्वोथ-याईर+ या नावाने ओळखली जातात. ५  त्यानंतर याईरचा मृत्यू झाला आणि त्याला कामोन इथे पुरण्यात आलं. ६  इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करू लागले.+ ते बआल दैवतांची,+ अष्टारोथच्या मूर्तींची, तसंच अराम,* सीदोन व मवाबच्या दैवतांची,+ आणि अम्मोनी+ व पलिष्टी लोकांच्या दैवतांची पूजा करू लागले.+ त्यांनी यहोवाकडे पाठ फिरवली आणि त्याची उपासना करण्याचं सोडून दिलं. ७  त्यामुळे इस्राएलवर यहोवाचा क्रोध भडकला आणि त्याने त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती दिलं.*+ ८  त्या वर्षी त्यांनी इस्राएली लोकांवर जुलूम करून त्यांचा भयंकर छळ केला. गिलादमध्ये राहणाऱ्‍या सगळ्या इस्राएली लोकांचा त्यांनी १८ वर्षं छळ केला. यार्देनच्या पूर्वेकडे असलेला गिलादचा हा प्रदेश एकेकाळी अमोरी लोकांचा प्रदेश होता. ९  अम्मोनी लोक यार्देन पार करून यहूदाच्या, बन्यामीनच्या आणि एफ्राईमच्या वंशजांशीही लढायचे. त्यामुळे इस्राएली लोकांना जीवन जगणं अगदी कठीण झालं होतं. १०  मग इस्राएली लोक मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ ते म्हणू लागले: “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलंय. आम्ही आमच्या देवाला सोडून बआल दैवतांची उपासना केली.”+ ११  पण यहोवा इस्राएली लोकांना म्हणाला: “मी तुम्हाला इजिप्तच्या हातून वाचवलं नाही का?+ जेव्हा अमोरी,+ अम्मोनी, पलिष्टी,+ १२  सीदोनी, अमालेकी आणि मिद्यानी लोकांनी तुमच्यावर जुलूम केले आणि तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे धावा केला, तेव्हा मी तुम्हाला त्यांच्या हातून वाचवलं नाही का? १३  पण तुम्ही मला सोडून दुसऱ्‍या दैवतांची उपासना केली.+ म्हणून आता मी परत तुम्हाला वाचवणार नाही.+ १४  तर आता जा, आणि ज्यांना तुम्ही आपले देव मानले त्यांच्याकडेच मदतीसाठी धावा करा.+ त्यांनाच तुम्हाला या संकटातून वाचवू द्या.”+ १५  पण इस्राएली लोक यहोवाला म्हणाले: “आम्ही खरंच पाप केलंय. आमच्या बाबतीत तुला जे योग्य वाटेल ते कर. पण कृपा करून आता आम्हाला वाचव.” १६  त्यांनी आपल्यामधली परकी दैवतं काढून टाकली आणि ते यहोवाची उपासना करू लागले.+ तेव्हा देवाला त्यांचं दुःख सहन झालं नाही.+ १७  काही काळानंतर अम्मोनी+ लोक युद्ध करायला एकत्र आले आणि त्यांनी गिलाद इथे छावणी केली. त्यामुळे इस्राएली लोकसुद्धा एकत्र आले आणि त्यांनी मिस्पा इथे छावणी केली. १८  तेव्हा गिलादचे लोक व प्रमुख एकमेकांना म्हणू लागले: “अम्मोनी लोकांविरुद्ध लढाई करण्यासाठी आपलं नेतृत्व कोण करेल?+ जो कोणी आपलं नेतृत्व करेल तो गिलाद प्रदेशातल्या सर्व लोकांचा प्रमुख होईल.”

तळटीपा

किंवा “सीरिया.”
शब्दशः “विकलं.”