शास्ते १२:१-१५

  • एफ्राईमच्या लोकांसोबत झालेला वाद (१-७)

    • शिब्बोलेथ बोलायला लावून केलेली परीक्षा ()

  • न्यायाधीश इब्सान, एलोन आणि अब्दोन (८-१५)

१२  मग एफ्राईमची माणसं एकत्र आली आणि नदी पार करून साफोन इथे गेली.* ती माणसं इफ्ताहला म्हणाली: “तू अम्मोनी लोकांशी लढायला गेला तेव्हा आम्हाला का बोलावलं नाहीस?+ आता आम्ही तुला आणि तुझ्या घराला जाळून टाकू.” २  पण इफ्ताह त्यांना म्हणाला: “माझं आणि माझ्या लोकांचं अम्मोनी लोकांशी बऱ्‍याच काळापासून शत्रुत्व होतं, तेव्हा मी तुमच्याकडे मदत मागितली होती. पण तुम्ही मला त्यांच्या हातून वाचवलं नाही. ३  तुमची मदत मिळत नाही हे पाहून मी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि अम्मोनी लोकांशी लढायला गेलो.+ आणि यहोवाने त्यांना माझ्या हाती दिलं. मग आता का आलात माझ्याशी भांडायला?” ४  इफ्ताहने मग गिलादमधल्या+ सगळ्या माणसांना एकत्र केलं. ते एफ्राईमच्या लोकांशी लढले आणि त्यांनी त्यांना हरवून टाकलं. कारण एफ्राईमची माणसं गिलादी लोकांना म्हणायची: “तुम्ही जरी एफ्राईमच्या आणि मनश्‍शेच्या प्रदेशांत राहत असला, तरी एफ्राईमच्या नजरेत तुमची काहीच किंमत नाही.”* ५  मग गिलादच्या माणसांनी यार्देन नदीचे उतार ताब्यात घेतले.+ आणि एफ्राईमच्या लोकांनी नदी पार करून पळून जाऊ नये म्हणून काही माणसांना तिथे उभं केलं. कोणी एफ्राइमी माणूस आला आणि त्याने पलीकडे जाण्याची परवानगी मागितली, तर गिलादची माणसं त्याला विचारायची: “तू एफ्राइमी आहेस का?” तो जर नाही म्हणाला, ६  तर ते त्याला म्हणायचे, की “शिब्बोलेथ बोलून दाखव.” पण हा शब्द नीट उच्चारता येत नसल्यामुळे तो “सिब्बोलेथ” म्हणायचा. मग ते त्याला पकडायचे आणि यार्देनच्या उतारांवर मारून टाकायचे. त्या वेळी एफ्राईमचे ४२,००० लोक मारले गेले. ७  इफ्ताहने इस्राएलमध्ये सहा वर्षं न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर गिलादी इफ्ताहचा मृत्यू झाला आणि त्याला गिलाद या त्याच्या शहरात पुरण्यात आलं. ८  त्याच्यानंतर इस्राएलमध्ये इब्सान याने न्यायाधीश म्हणून काम केलं. तो बेथलेहेमचा राहणारा होता.+ ९  त्याला ३० मुलं आणि ३० मुली होत्या. त्याने आपल्या मुलींची लग्नं आपल्या कुळाबाहेर लावून दिली आणि आपल्या मुलांसाठी दुसऱ्‍या कुळातल्या ३० मुली आणल्या. इब्सानने इस्राएलमध्ये सात वर्षं न्यायाधीश म्हणून काम केलं. १०  मग त्याचा मृत्यू झाला आणि त्याला बेथलेहेममध्ये पुरण्यात आलं. ११  त्याच्यानंतर एलोन याने इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं. तो जबुलून वंशाचा असून त्याने दहा वर्षं इस्राएलचा न्याय केला. १२  मग जबुलून वंशाच्या एलोनचा मृत्यू झाला आणि त्याला जबुलूनच्या प्रदेशात, अयालोनमध्ये पुरण्यात आलं. १३  त्याच्यानंतर अब्दोन याने इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं. तो पिराथोनमध्ये राहणाऱ्‍या हिल्लेलचा मुलगा होता. १४  त्याला ४० मुलं व ३० नातू होते. आणि स्वारी करण्यासाठी त्यांच्याकडे ७० गाढवं होती. अब्दोनने इस्राएलमध्ये आठ वर्षं न्यायाधीश म्हणून काम केलं. १५  मग पिराथोनी हिल्लेलचा मुलगा अब्दोन याचा मृत्यू झाला. त्याला एफ्राईम प्रदेशात, अमालेकी+ लोकांच्या डोंगराळ भागातल्या पिराथोन इथे पुरण्यात आलं.

तळटीपा

किंवा कदाचित, “नदी पार करून उत्तरेकडे गेली.”
शब्दशः “तुम्ही एफ्राईममधून पळून आलेली माणसं आहात.”